‘शिवसंग्राम’च्या गडास भाजपानेच लावला सुरुंग..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 08:04 PM2018-09-05T20:04:40+5:302018-09-05T20:07:01+5:30
राजकारणात टोकाची भूमिका घेत एकमेकाला शिवराळ भाषा वापरणारे कधी एका ताटात जेवतील, याचा नेम नसतो. इथेही तसेच वाटले होते परंतु, घडले विपरितच.
- सतीश जोशी
बेलगावच्या बेलेश्र्वरमध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे संस्थापक तथा विधान परिषद सदस्य विनायक मेटे एकाच व्यासपीठावर दिसले, तेव्हा दोघांतील वाद मिटले असे वाटले होते. राजकारणातील वाद फार काळ टिकत नाहीत, याचे प्रत्यंतर बीड जिल्ह्यात तरी अनेकदा आले होते. राजकारणात टोकाची भूमिका घेत एकमेकाला शिवराळ भाषा वापरणारे कधी एका ताटात जेवतील, याचा नेम नसतो. इथेही तसेच वाटले होते परंतु, घडले विपरितच.
विनायक मेटे यांनी आपल्या अनेक भाषणात मुख्यमंत्र्यांशी आपली कशी घनिष्ट मैत्री आहे, याचा उल्लेख केला होता परंतु, पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो, त्यांच्या सहीशिवाय डीपीडीसीच्या निधीतील एक दमडी देखील खर्च करता येत नाही, हे मेटेंच्या उशिरा लक्षात आले असावे, असे वाटले. घरात भांड्याला भांडे लागतच असते, विकास निधी वाटप करताना आमच्याकडेही लक्ष द्या, असे मेटेंनी या कार्यक्रमात सुतोवाच केले होते परंतु, पालकमंत्र्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. ‘शिवसंग्राम’मध्ये सावलीसारखे सोबत असणारे प्रदेश युवा अध्यक्ष राजेंद्र म्हस्के हे मुंडे-मेटे यांच्यातील ताणतणावापासून मेटेंपासून अलिप्त राहून भाजपाशी जवळिक साधत होते. बेलेश्र्वरच्या कार्यक्रमात तर बीडचे भावी आमदार म्हणून राजेंद्र मस्के यांच्या नावाने घोषणाही पेरण्यात आल्या होत्या.
भाजपाच्या कोंडाळ्यात आपला जिवाभावाचा सहकारीही सामील झालेला पाहूनची मनातील खदखद मेटेंच्या भाषणात प्रकर्षाने जाणवली. असे कदापिही होणार नाही, बीडचा भावी उमेदवार मीच असेन, हे जाहीरपणे सांगण्याची वेळ मेटेंवर आली होती. घोषणाबाजी करणारे शिवसंग्रामचे कार्यकर्ते असूच शकत नाहीत, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. ही घोषणाबाजी व्यासपीठावरील मान्यवरांसाठी अनपेक्षित होती. तीन चार महिने शांत राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्केच्या रुपाने मेटेंवरच पलटवार करताना बीड विधानसभा मतदार संघातून युवकास संधी दिली जाईल, असे सांगताना राजेंद्र मस्के यांची तोंड भरून स्तुती केली होती.
जिल्ह्यातील असो की जिल्हाबाहेरील कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमास विनायक मेटेंचे बोट धरून जाणारे राजेंद्र मस्के या कार्यक्रमास मात्र पंकजा मुंडेंसोबत आले होते तर विनायक मेटे हे जवळपास पाऊण तास अगोदर कार्यक्रमस्थळी येऊन पालकमंत्र्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. इतके अंतर या मध्यंतरीच्या काळात पडले होते. आपले भावी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या टीका करताना स्वत:चेच हित जोपासल्यामुळेच घर फुटले असा उल्लेख मेटेंनी केला होता, परंतु पंकजा मुंडेंनी मात्र आमचे आणि इतरांचे घर फोडण्याचे कुटील कारस्थान बारामतीनेच केले, असे सांगून मेटेंचा मुद्दा खोडून काढला.
विकासाच्या प्रश्नावर भाजपाइतकेच शिवसंग्रामचेही कार्यकर्ते, पदाधिकारी जवळचे आहेत, त्यांच्यात भेदभाव करत नाही. राजेंद्र मस्के यांचे घर माझ्या जिल्ह्यातील राजकारणासाठी लकी आहे. त्यांच्याच घरी बसून जि.प.ची सत्ता खेचून आणली आणि भविष्यातील निर्णयही त्यांच्याच घरी बसून घेतले जातील, असे सुतोवाच करताना भावी राजकारणासंदर्भात मेटेंना इशाराही दिला होता. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, याचा पहिला धडा विनायक मेटेंना मिळाला होता. कार्यक्रम रस्ताकामाच्या भूमिपूजनाचा असला तरी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामच्या गडासच सुरुंग लावून आ. विनायक मेटेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या शहास मेटे कसा काटशह देतात, याबद्दल उत्सुकता लागली आहे.