इयत्ता दहावी - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 05:29 PM2019-02-08T17:29:34+5:302019-02-08T17:30:10+5:30
हा लेख वाचताना आपणा सर्वांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. उजळणी करणे, पाठातील महत्त्वाचे मुद्दे नजरेखाली घालणे आणि उर्वरित दिवसांसाठी स्वअभ्यासाचे नियोजन करणे.
प्रिय विद्यार्थी,
हा लेख वाचताना आपणा सर्वांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. उजळणी करणे, पाठातील महत्त्वाचे मुद्दे नजरेखाली घालणे आणि उर्वरित दिवसांसाठी स्वअभ्यासाचे नियोजन करणे.
आपल्या परीक्षेसाठी सुमारे ४० दिवस शिल्लक आहेत आणि ९ किंवा १० विषयांचे पेपर म्हणजे प्रत्येक विषयाला ४ दिवस. दडपण आले ना! पण अजिबात घाबरु नका. अजूनही रोज सुमारे ६-८ तास अभ्यास केलात तरी भरपूर गुण मिळवता येतील. फक्त अभ्यास नियोजनपूर्ण, पद्धतशीरपणे व न कंटाळता करायला हवा. असा सर्व हिशोब करता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ या विषयाला रोज सुमारे २ तास पुरेसे होतील. आता या वेळेत काय अभ्यास करायचा!
प्रथम आपल्या बोर्डाच्या परीक्षेचे कृतिपत्रिकेचे स्वरुप व गुणनिहाय विभाजन.
प्र. १ अ) १ गुणाचे ५ प्रश्न - एकूण गुण (५)
ब) १ गुणाचे ५ प्रश्न - एकूण गुण (५)
(प्र. १ ‘ब’ हा बहुपर्यायी प्रकारचा प्रश्न प्रात्यक्षिक कार्य व उपक्रमातील आकलन व उपयोजनांवर आधारित असेल)
प्र. २) २ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे
एकूण गुण (१०)
प्र. ३) ३ गुणांच्या ७ प्रश्नांपैकी ५ प्रश्न सोडविणे
एकूण गुण (१५)
प्र. ४) ५ गुणांच्या २ प्रश्नांपैकी १ प्रश्न सोडविणे
एकूण गुण (०५)
प्रश्न क्रमांक २ ते ४ यात प्रामुख्याने मुक्तोत्तरी विचारप्रवर्तक प्रश्नांचा समावेश असेल.
अर्थात कृतिपत्रिकेचे हे स्वरुप तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला समजावून सांगितले आहेच आणि त्या प्रकारच्या सराव परीक्षा तुम्ही दिल्या आहात. त्यातील गुणांवरुन आपण नेमका कोणत्या भागाचा अभ्यास जास्त करायला पाहिजे हे समजून घ्या.
रिकाम्या जागा भरणे, चूक की बरोबर ओळखणे, जोड्या जोडणे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे योग्य व समर्पक आणि निश्चित शब्दात लिहावी लागतात. या प्रश्नांचे पुरेपूर (सर्वच) गुण मिळवण्यासाठी पाठांचे सूक्ष्म वाचन करणे अत्यावश्यक आहे. शास्त्रीय कारणे, दीर्घोत्तरी प्रश्न यासाठी धडा समजून घेऊन वाचन करावे.
गणितीय भागासाठी पाठातील सूत्रे व एकके पाठांतर असावीत. तसेच रसायनशास्त्राच्या धड्यांसाठी पदार्थाची रेणूसूत्रे व रासायनिक सूत्रे पाठांतर असणे गरजेचे आहे व त्यांच्या लेखनाचा सराव महत्त्वाचा. याशिवाय सर्व आकृत्या (नामनिर्देशित) संग्रह करावा. तसेच सर्वच प्रकरणांवरील सारणी व ओघतक्ते यांचा एकत्रित संग्रह करावा म्हणजे एकाचवेळी आपल्याला त्यांचा अभ्यास करता येतो.
आपण विज्ञानाच्या अभ्यासासाठी जो वेळ ठरवला आहे, त्यामध्ये हे सर्व भाग आठवणीे वाचायचे आहेत. काही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये मार्कांच्या दुप्पट मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. तसेच सविस्तर उत्तरे लिहिण्याच्या प्रश्नांसाठी आकृत्यांची आवश्यकता असते.
तुम्हा सर्वांना हे माहीत आहेच की, आपल्या कृतिपत्रिकेमध्ये ९वी विज्ञान पुस्तकातील आशयावर २० टक्के भारांश आहे. म्हणून पुन्हा एकदा ९वीची पुस्तके वाचन करावीत.
शेवटी जाता जाता असे सांगावेसे वाटते की लिखाणात जास्त वेळ न घालवता भरपूर वाचन करा. पाठ्यपुस्तके, वहीतील प्रश्नोत्तरे, आपल्याकडे उपलब्ध असलेले इतर साहित्य व त्यातील सोडवलेले प्रश्नोत्तरे या सर्वांचे भरपूर वाचन करा. वाचलेले आठवण्याचा प्रयत्न करा. एक लक्षात घ्या की, कृतिपत्रिकेमध्ये नवीन काहीच नसते. प्रत्येक प्रश्नांचे वाचन आधी झालेले असतेच. दिवसातील काहीवेळ साधारण अर्धा तास मैदानी खेळासाठी आणि आपल्या छंदासाठी जरुर द्या. म्हणजेच परीक्षेचा ताण येणार नाही.
तुम्हा सर्वांना या महत्त्वाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
- सुवर्णा नितीन टिकेकर
फाटक हायस्कूल, रत्नागिरी