१८ तास अभ्यास : विद्यार्थ्यांसमोर असावा बाबासाहेबांचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:58 PM2018-04-12T23:58:29+5:302018-04-13T00:02:18+5:30
बाबासाहेबांचा आदर्श पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर राहावा, यासाठी २००५ पासून दरवर्षी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम अखंडितपणे राबविला जातो
- विजय सरवदे
बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खडतर प्रसंगांना सामोरे जाऊन त्या काळात सतत १८-१८ तास अभ्यास केला व या देशाला आदर्श संविधान दिले. आजच्या इंटरनेटच्या मायाजालमध्ये विद्यार्थी अडकल्यामुळे ते वाचन- लिखाणात मागे पडत चालले आहेत. बाबासाहेबांचा हा आदर्श पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर राहावा, यासाठी २००५ पासून दरवर्षी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम अखंडितपणे राबविला जातो, असे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १० एप्रिल रोजी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम राबविण्यात आला. यासंदर्भात प्राचार्य डॉ. वाडेकर सांगतात, या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन रजिस्ट्रेशन’राबविले जाते. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची १६० विद्यार्थी एवढीच क्षमता असताना यंदा या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आम्हाला नाईलाजाने नोंदणी थांबवावी लागली.
वाडेकर पुढे सांगतात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना दिवसाच्या चोवीस तासांपैकी १८- १८ तास अभ्यास करीत असत. विद्येच्या या उपासकाने कठोर ज्ञानसाधना केली, त्यामुळेच एवढे यश आणि कीर्ती त्यांना मिळाली. माणूस शिक्षण घेत असताना थोड्या थोड्या गोष्टीचा बाऊ करून आपल्या ध्येयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत असतो. पण, बाबासाहेबांचे संपूर्ण जीवनच हे संघर्षाने भरलेले होते. त्यांनी समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण केले. केवळ कठोर परिश्रमाच्या बळावर अशक्य बाब ही शक्य करून दाखविली.
बाबासाहेबांची विद्वत्ता अद्वितीय होती. त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला तर अत्यंत खडतर, कठीण परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला. त्यांनी उच्चशिक्षण तर घेतलेच; पण उत्तम संशोधनही केले. दररोज त्यांनी १८-१८ तास अभ्यास केला. शिक्षण घेतल्यामुळे प्रगती होईल. विकासाची दारे खुली होतील, हे सूत्र त्यांना पूर्णपणे माहीत होते.
अलीकडच्या काळात एकाही विद्यार्थ्याच्या वाट्याला बाबासाहेबांसारखी बिकट परिस्थिती आलेली नाही. तरीही आज अनेक विद्यार्थी नैराश्येत, कधी चैनीत, तर कधी आत्महत्येकडे वळत असल्याचे आपण वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी सहन केलेले दु:ख, त्यांनी केलेला १८-१८ तास अभ्यास, त्यांनी अंगीकारलेली चिकाटी, जिद्द, स्वाभिमान, विद्या, शील, प्रज्ञा, करुणा, मैत्री या महत्त्वपूर्ण गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून एक आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच या उपक्रमाच्या आयोजनामागची महाविद्यालयाची भूमिका आहे, असे प्राचार्य डॉ. वाडेकर म्हणाले.