७/१२ आयुष्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 08:41 PM2018-09-01T20:41:35+5:302018-09-01T20:42:17+5:30
अनिवार : अनंतअम्मा कृष्णय्या तिरनगरी हे तिचे माहेरचे नाव जे आता अनु प्रसाद मोहिते आहे. अनु एम. ए., एम.एस.डब्ल्यू. झाली. मेंदूत, मनात सातत्याने समाजाचाच विचार. त्याच विचाराचा प्रसाद फील्डवर्कच्या निमित्तानं तिला भेटला. विचार जुळले, खांद्याला खांदा लावून दोघांनी काम सुरूही केले. आज त्यांच्या वंचितांच्या शाळेत ११० मुले आहेत. प्रार्थना बालगृहात १० निवासी मुले आहेत. मनोबल अंतर्गत रस्त्यावरच्या रुग्णांना उपचारार्थ ते सर्व सेवाही पुरवतात.
- प्रिया धारूरकर
अंनंतअम्मा सांगत होती, वंचितांच्या शाळेतील एक ६ वर्षाची मुलगी आणि तिचा ७ वर्षाचा भाऊ यांची आई लहानपणीच वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं, मुलांना वाऱ्यावर सोडलं. ही मुलं आपल्या शाळेत येऊन शिकण्याचा प्रयत्न करतात; पण मुलांची आत्या त्यांना भीक मागायला लावते. त्यांना मी प्रेमानं जवळ घेतलं, म्हणाले आजपासून मी तुमची आई होईन, चालेल? दोघेही खुदकन हसली; पण सध्या ही भावंडं आत्यामुळे शाळेत येत नाहीत. भीक मागायला जातात. ७ वर्षाचा चिमुकला परिस्थितीमुळे चोऱ्या करतोय. या मुलांचं भविष्य काय? ही मुलं अशीच भीक मागणार का? त्यांना माया प्रेम देणारं कोणीच नाही का? पुढे ही मुलं दरोडे घालतील का? यांची परिस्थिती, भविष्य घडवण्यासाठी कोणीच नाही का? हे प्रश्न मला पडायचे; पण आता या मुलांची जबाबदारी प्रार्थना फाऊंडेशन घेईल. मुलांना हक्काचं घर, शिक्षण, सेवा-सुविधा पुरवेल आणि त्यांचं भविष्य घडविण्यास ‘प्रार्थना’ मदत करेल.
खरं सांगू तर माझी मुलगी जन्मत:च आम्हाला सोडून गेली. आम्ही तिचे देहदान केलेय तेवढंच तिच्या बाबतीतले आम्हाला समाधान. ती गेली आणि मी ठरवलं आमची मुलगी जरी गेली तरी मी पोरक्या मुलांची आई होईन. ते दोन चिमुकलेही आपल्या निवासी प्रकल्पात लवकरच दाखल होतील. आम्ही आत्यांचं समुपदेशन करतोय. प्रसाद शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातला. जगण्यासाठी खूप भोगलेलं. सासूबाई दुसऱ्याच्या कामाला जायच्या,स्वत:ची शेती पाहायच्या,रात्री-अपरात्री लाईट आले की, रानात उसाला दार देण्यासाठी जायच्या. प्रसादच्या शिक्षणासाठी दागिने, मंगळसूत्रही विकावे लागले. लहानपणी आपण भोगलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रसाद प्रयत्न करीत असतात. त्यांचेही बी.ए.एम.एस.डब्ल्यू.झालेय.
आम्ही, रस्त्यावर भीक मागणारी, अनाथ, भटकंती करणारी शाळाबाह्य, वंचित अशा मुलांसोबत काम करतोय. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणे, चांगले संस्कार करणे, चोऱ्या, माऱ्या, व्यसनं यांच्यापासून दूर ठेवणे. चांगले शिक्षण देऊन देशाचा सक्षम नागरिक बनवणे हा आमचा हेतू आहे. आम्ही, मनोरुग्ण, रस्त्यावर राहणारे आजी-आजोबा यांच्यासोबत काम करतोय. भविष्यात स्थायी स्वरूपाचा प्रकल्पच सुरू करणार आहोत. प्रसाद म्हणतात, ‘लहानपणीच कोवळ्या हाताने स्वत:च्या बापाच्या चितेला अग्नी द्यावा लागला यापेक्षा जगात मोठं दु:ख काय असू शकतं. वडिलांनी आत्महत्या केल्यावर आईचा धीर खचला असता, तर आज आमच्यावर अशीच भीक मागायची वेळ आली असती’. सासूबार्इंनीच त्यांना इथपर्यंत शिकवलं. त्यांच्या धाडसामुळेच यांना जगण्याची हिम्मत आली आणि आज आम्ही हे काम करू शकतोय ते आमच्या दोघांच्या पालकांमुळेच. आमचा विवाह आंतरजातीय पण माझी आणि प्रसादची समाजाप्रतीची तळमळ आणि त्यासाठी आमचं एकत्र येणं त्यांनी मान्य केलं. त्यामुळेच काही विधायक घडतंय.
आम्ही मेस चालवतो. प्रसाद संध्याकाळी रिक्षाही चालवतात. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्याने सरकारने आईच्या नावे रिक्षा परमिट दिलं होतं. रिक्षाग्राहकाचा एक अनुभव तिने सांगितला. रात्री ११ वाजता प्रसाद सैफुलवरून स्टँडचे सीट भरत होते, तर मार्केटकडून एक दाम्पत्य येताना दिसले. नवरा डाव्या पायाने थोडा अपंग होता. त्यांना विचारलं कुठे जायचं? त्यांनी सांगितलं रेल्वे स्टेशन. दिवसा १५ रु, रात्री १० नंतर २० रु , तसं २० रु सांगितले. ते म्हणाले १५ रु देतो. शेजारचा रिक्षावाला म्हणाला २० रु च्या कमी होत नाही. ते म्हणाले, आज अडीच तीन हजारांचा तोटा झालाय अजून तुम्हाला पैसे देऊन काय करू, हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कसनुसे भाव होते. यांनी ठरवलं,आणखीन २, ३ जण आले की त्यांना कमी पैशात नेऊ. ते दाम्पत्य तिथून पुढे गेले, एका व्यक्तीला काही विचारलं. अजून पुढेच निघाले. लगेच जाऊन यांनी विचारलं तो माणूस तुम्हाला काय विचारत होता. त्यांनी सांगितलं की इथं फुटपाथवर नाहीतर पलीकडे दवाखान्याजवळ झोपले तर चालेल का; पण मी सांगितलं, रात्री पोलीस येतात राऊंडला. त्यामुळे ते निघून गेले.
यांना अस्वस्थ वाटायला लागलं. काय झालं? कोण असतील हे? फुटपाथवर का झोपत असतील? पुरुष कुठे पण झोपू शकेल पण एक स्त्री? स्त्रीनं असं कुठंही झोपावं, मनाला पटेना. रिक्षा त्यांच्याकडे नेली, म्हणाले स्टेशनवर सोडतो, तर ते म्हणाले तेवढे पैसे नाहीत. हे म्हणाले चला तसंच सोडतो. रिक्षात बसल्यावर विचारलं, काय झालं? त्यांनी सांगितले,आम्ही शेतकरीच,शेती कोरडवाहू,म्हणून अवघड. शाळेत जाणारी दोन पोरं आहेत. आधाराला म्हणून आजपासून भाजीपाल्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. पहिलाच दिवस, पहिल्याच दिवशी अडीच तीन हजारांचा घाटा झाला. मार्केटमधून घेतलेली १२,१३ रु ची पेंडी शेवटी शेवटी ५ रु विकावी लागली. व्यापाऱ्यांकडून घेतात पण शेतकऱ्यांकडून घासाघीस करतात. शेवटी शेवटी तर खूप मनस्ताप झाला. जेवढे पैसे गुंतवले तेवढे तर नाहीतच, वरून घाटाच झाला. अन्न-पाणी गोड लागेना, चहासुद्धा घेतला नाही. ते सांगत होते हे नि:शब्दपणे ऐकत होते. यांनी विचारलं मग आता कुठे जाणार? ते म्हणाले रेल्वे स्टेशनला जाऊन झोपणार. त्यांची कहाणी ऐकून यांचं मन द्रवलं. यांनी त्यांना घरीच आणले. मला सगळं सांगितलं. मी गरम जेवण बनवलं. ताई, शेतकऱ्याचं जीवन किती वेदनामय असतं हेच पुन्हा दिसून आलं. ते सकाळी आभार मानून आनंदी चेहऱ्याने गेले. ताई, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, त्यांचा ७/१२ कोरा झालाही असेल; पण कर्जमाफी हा उपाय नाही तो एक पर्याय आहे. आम्ही जेव्हा आमच्यामुळे कोणाला आनंदित बघतो तेव्हा आयुष्याचा ७/१२ सुखाने भरून जातो.
-priyadharurkar60@gmail.com