स्नेहशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:40 PM2018-07-14T19:40:35+5:302018-07-14T19:41:16+5:30
अनिवार : ‘ज्याचं जीवन स्नेहशील सौजन्यानं भरून जातं त्याच्या माणूसपणाची पातळी ओतप्रोत होऊन वाहू लागते आणि त्याच्या निष्ठा सामाजिक होऊ लागतात. माझे-तुझेपणातून बाहेर पडून त्याची प्रत्येक कृती समाजसार्थकी होऊ लागते आणि नेमक्या अशाच व्यक्तीची मी सहचारिणी आहे, याचा मला मनस्वी अभिमान आहे.’ विनया, महेश निंबाळकर यांच्या पत्नी बोलत होत्या.
- प्रिया धारूरकर
विनयाचं डी. एड. झालं तसं शिक्षक असणाऱ्या महेश यांच्याशी लग्न ठरलं. दोघेही शिक्षक, पण दोघांनीही सौख्यदायी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपलं आयुष्य भटक्या जमातीच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी वेचायचं ठरवलं. हे सामाजिक भान माझ्यात महेशजींमुळेच आलं. आधी या कार्यात मला फारसा इंटरेस्ट नव्हता, पण जेव्हा मी जवळून या मुलांना बघितलं, त्यांचा दोष नसतानाही त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. अगदी बालवयापासूनच विविध व्यसनांच्या आहारी गेलेलं त्यांचं आयुष्य बघितलं, अनुभवलं आणि ठरवलं यांच्याबरोबर पावलं टाकत स्वत:लाही इथेच रुजवायचं.
मुळात यांच्या या सामाजिक कार्याची सुरुवात म्हणजे एकदा ते लातूरला जाताना प्रवासादरम्यान त्यांनी बार्शीतील भटक्यांच्या वस्तीत २५-३० मुलांना स्वच्छंद फिरताना पाहिले. त्यांच्यातला शिक्षक जागा झाला व त्यांनी वस्तीतल्या आबालवृद्धांशी संवाद साधला. त्यांना शैक्षणिक प्रबोधन केले. वस्तीत कठोरपणे दमदाटी करून ते घरी परतले, पण आपण नेमकं काय केलं? हा प्रश्न त्यांना सतावू लागला. वस्तीत प्रबोधन केलं की कायद्याचा बडगा उगारला? मनस्वी कळकळ होती, पण मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कोणतेच प्रभावी प्रयत्न आपल्याकडून झाले नाहीत, याची सल होतीच. पुन्हा एकदा एक-दोन महिन्यांतच त्या मार्गानं जायची वेळ आली. त्यावेळी पुन्हा ही वस्ती पाहिली, त्यांचं भीषण वास्तव अनुभवलं. १००-१२५ मुलांचा घोळका पालांभोवती घुटमळत होता.
कोणत्याच भ्रांतीशिवाय काही जण अर्धनग्न अवस्थेत तर काही शिळ्या भाकरीचे तुकडे चघळतायेत. चुली पेटल्या होत्या, रोजच्या सवयीप्रमाणे वडीलधारी म्हणवणारी झिंगलेली. तेव्हा यांनी परत बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलांना शाळेत दाखल करायचंच, हे पक्क ठरवूनच टाकलं. दुसऱ्या दिवशीही वस्ती गाठली, सर्वे केला. मुलांची फोटोसह सविस्तर माहिती संकलित केली. ती प्रशासनात दाखल केली. न. पा. शाळेत कशीबशी मुलांना बसायची संमती मिळाली. शासनस्तरावर सतत संघर्ष, पाठपुरावाही केला. वस्तीचे मुळेकरांना हे म्हणाले, उद्यापासून पोरांना शाळेत पाठवा, हाकेच्याच अंतरावर शाळा आहे. तर ते म्हणाले, मुलांना मी घेऊन येतो, पण मला बिगारी द्या. मुलं यांची, शाळाही शिकणार यांचीच मुलं आणि यांनी दिवसाची हजेरी द्यायची? या विचारानं हे प्रचंड संतापले व रागानं म्हणाले, काका आता फक्त या वस्तीत येऊन शिकवायचं तेवढं राहिलंय.
काका लगेच म्हणाले, लय बेस हुईन, तुमी इथंच शिकवा. त्यांनाही हा विचार पटला. कारण शाळेत या मुलांना पटावर घेण्यासंबंधी कुणीही अनुकूलता दर्शवली नव्हती. सकारात्मकपणे विचार केला. खरंच इथंच शाळा सुरू केली तर? आणि २० सप्टेंबर २००७ ला अनौपचारिक शाळा सुरू झाली. मुलांच्या शाळेचं नावही ‘भटक्यांची शाळा’ ठेवलं. मानवनिर्मित आणि असंख्य अडचणी पार करीत खांडवी ते बार्शी तालुक्यातील आजची ही कोरफळास्थित स्नेहग्राम मजल पार केली. पुढे एक लेख वाचून कौस्तुभ विकास आमटे ही जोडले गेले.
इथल्या ४० मुलांची आई होताना मुलांना फक्त संगोपन, निवारा या मर्यादेत बांधून न घेता पिढ्या घडवण्याचं काम व्हावं, भिंतीची नाही तर मुक्तविहारी शाळा असावी. या उद्देशाने आम्ही सतत प्रयोगशील आहोत. जी मुलं भीक मागत होती, खेळणी, टिकल्या-पिना विकणे, केस गोळा करणे यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला पोसणारी मुले होती. ती आता शिक्षण घेत आहेत.
( priyadharurkar60@gmail.com )