‘आलिया भोगासी’ प्रगल्भ आत्मकथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:19 PM2018-04-28T18:19:32+5:302018-04-28T18:20:41+5:30
बुकशेल्फ : दलित साहित्याची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील आत्यंतिक अशी महत्त्वाची घटना आहे. या चळवळीने साहित्यातच नव्हे तर एकूण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही स्फोट घडवून आणला. या चळवळीच्या माध्यमातून शतकानुशतके दलित समाज ज्या ग्रांथिक संस्कृतीपासून वंचित राहिलेला होता त्याचीही साहित्यनिर्मिती क्षेत्रातील बंडखोरी होती. परंपरेने जो समाज अन्यायग्रस्त जीवन जगत होता. त्याला शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारस्रोतामुळे तीव्र वाचा प्राप्त झाली होती. त्यांचे विचार, कृती आणि प्रचारामुळे दलित समाजाला जे प्रखर आत्मभान प्राप्त झाले त्याची ही परिणिती होती. या चळवळीमुळे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या एका नव्या पर्वालाच प्रारंभ झाला.
- डॉ. वासुदेव मुलाटे
ललित साहित्य चळवळीच्या प्रारंभीच्या काळात वैफल्याने कविता लिहिल्या गेली. त्यापाठोपाठ कथा, कादंबरी, नाटक हे ललित साहित्याचे प्रकार हाताळल्या गेले. मात्र, १९७८ च्या सुमारास ग्रंथ स्वरूपात आलेला आत्मकथन हा साहित्य प्रकार दलित जीवनाचे वास्तव मुखर करणारा अत्यंत चिंतनशीलता, प्रांजळपणा आणि अंतर्मुखता यांचे दर्शन घडविणारा साहित्य प्रकार होय. मराठी साहित्यातील आत्मचरित्र या साहित्य प्रकारापासून स्वत:ची प्रथगात्मकता रेखांकित करणारा हा साहित्य प्रकार आहे.
‘आलिया भोगासी’ या हरिदास अडसुळे यांच्या आत्मकथनाची नोंद याचदृष्टीने केली पाहिजे. अर्थात या आत्मकथनाचे शीर्षक वाचतानाच मनातल्या मनात ज्या संताच्या काव्यसमारंभातून या ओळी घेतल्या आहेत. तो आणि ‘आलिया भोगासी’च्या पुढच्या ओळी सहजच आठवतात, ‘आलिया भोगासी। असावे सादर।। चित्ती असू द्यावे समाधान।।’ या ओळींमधील गर्भितार्थ बघितला तर असे लक्षात येते की, जे अपरिहार्यपणे वाट्याला आले त्याला सामोरे जाताना मनात असंतोष असता कामा नये. तर त्याबद्दल समाधानच बाळगले पाहिजे आणि संतवृत्तीच्या माणसाचे हेच सांगणे असेल तर, आणि तोच अर्थ ध्वनित करायचा असेल तर हे लेखन उपरीर्निदिष्ट आत्मकथनांच्या रांगेत कसे काय बसू शकते? म्हणून ‘आलिया भोगासी’ला नीट समजून घ्यावे लागले. आमच्या वाट्याला आलेल्या भोगांमध्ये आमचे पूर्वसंचित वगैरे काही नसून वर्णाधिष्ठित, धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेने केलेला तो कट आहे, हेच तर लेखकांना सांगायचे आहे.
परंतु हजारो वर्षांच्या काळात, हजारो पिढ्यांनी आपले पूर्वसुकृत म्हणून भोगले आणि त्यातच ते संपलेही हे नाकारता येत नाही. म्हणून आत्मभान येण्याआधीची अवस्था सांगत सांगत नंतरचा प्रकाशाच्या दिशेने केलेला प्रवास सांगावा लागेल. तेच इथे लेखकाने केले. त्यांचे वडील (दादा) हे एक संतवृत्तीचे गृहस्थ होते. तेरच्या संत गोरोबाचे ते निस्सीम भक्त होते. हे खरं असलं तरी त्यांच्या ठिकाणी जी पुढच्या पिढीच्या स्वावलंबी असण्याविषयीची तळमळ होती, तीच खरी दास्यमुक्तीची प्रेरणा होती.
या आत्मकथनाच्या मनोगतातच याचा निर्वाळा येतो. ते लिहितात, ‘मी माझ्या एकाही मुलाला कुणाच्या दारी-वळचणीला, दावणीला, गुरावर राकोळी ठेवणार नाही. का कुणाला, कुणाच्या कोरड्या-वल्ल्यावर सालगडी म्हणून नवकरी ठेवणार नाही. मी जिवंत असेल तोवर सगळेच्या सगळी मुलं शिक्यात शिकून सायेब झालेली बघायची आहेत मला’ म्हणणाऱ्या फक्त अक्षरओळख असणाऱ्या माझ्या वडिलांना (दादाला) शिक्षणाचं सामर्थ्य कळले होते म्हणून हा सगळा साहित्य प्रपंच...’ इथे हरिदास अडसुळे यांनी आपल्या लेखनाचे प्रयोजन जसे सांगितले आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दास्यमुक्तीच्या लढ्याला सिद्ध होण्यासाठी दिलेल्या विचारांना अप्रत्यक्षपणे अनुसरलेले आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
पुढे आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, ‘प्रथितयश बहुतेक सगळ्या दलित साहित्यिकांचे ‘आत्मकथन मी वाचले आहे. जीवनानुभवातून प्रखर जाणिवेचे ते सृजन आहे. प्रस्थापित, सामाजिक व्यवस्थेविरुद्ध ते बंड करून उठले. त्यांचे बंडखोर साहित्य जीवनाला स्पर्श करीत जाणारे, वास्तव मांडणारे आहे. मग आपण का लिहू नये असं वाटलं,’ या विधानातून त्यांची लेखन प्रेरणा आणि प्रयोजनच स्पष्ट होते. दुष्काळामुळे गाव सोडावे लागलेले अडसुळे कुटुंब शिक्षणामुळे फुले, आंबेडकरांच्या विचारांना स्वीकारित गेले याचा प्रत्यय या आत्मकथनातून येतो. हे आत्मकथन हरिदास अडसुळे यांचे असले तरी ते दादा, ताई, माय, बापू इ. कुटुंबियांचे जसे आहे तसेच बदलत गेलेल्या त्यांच्या समाजाचेही आहे. संकटात आणि दु:खात एकमेकांना जपणारी, नात्यांची नाळ तुटू न देणारी ही माणसं काळाच्या ओघात अनंतपदीचे भोग भोगतात. परंपरेतून आलेल्या अध्यात्माबरोबरच श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरा यात अडकून पडलेला एक समाज हळूहळू परिवर्तनाच्या दिशेने खंबीर पावले टाकतो आहे, याचेही सूचन येथे होते. परिस्थितीने माणसं चांगली किंवा वाईट वागतात, ती मूळची तशी नसतात हेही यातून प्रत्ययाला येते.
काळाच्या एका दीर्घपटात उभी केलेली विविध भाव प्रकृतीची माणसे आणि समाजवास्तवात त्यांचं होरपळून जाणं आणि तेवढंच ताकदीने उभे राहणेही लेखकाने अत्यंत तपशीलाने येथे रेखाटले आहे. नात्या-नात्यातील मायेचे, वितुष्टाचे तसेच वाचून हतबुद्ध व्हावे असे अनेक प्रसंग लेखकाने शब्दांतून दृश्यमान केले आहे. त्यासाठी प्रकरणे पाडली आहेत. अनुषंगाने अनेक अभंगही उद्धृत केले आहेत. मात्र, पुरोगामी विचारांचा धागाही सोडलेला
नाही. सामाजिक विद्रोह आणि जीवनातला संघर्षही किती संयमित भाषेत मांडता येऊ शकतो याचा आदर्श वाटावा, असे हे आत्मकथन आहे. म्हणून ते जेवढे चिंतन करायला लावणारे आहे, तेवढेच विचारांना उद्दिप्त करणारेही आहे. दलित आत्मकथनेच नव्हे तर एकूण दलित संवेदनेचे साहित्य आता किती प्रगल्भ अशा मानसिकतेतून लिहिल्या जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हरिदास अडसुळे यांच्या या लेखन प्रवासाला उदंड शुभेच्छा!