आम्ही म्हणे भारतीय...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 08:21 PM2018-09-01T20:21:41+5:302018-09-01T20:23:08+5:30

वर्तमान :  भारतीय समाजव्यवस्थेत व्यक्तींचे सार्वजनिक वर्तन, व्यवहार अतिरेकी धर्मांध, जात्यांध होणे हे समाज विघटनाकडे जात असल्याचे लक्षण आहे. ‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे. ‘विविधतेत एकता’ हीच आमची मूलभूत ओळख; नव्हे तीच आमची शक्ती आहे. अनेक प्रांत, जाती, धर्म, भाषा, बोली, पेहराव यातून निर्मित ‘रंगीबेरंगी’ सांस्कृतिक वैभव जगाच्या नकाशावर इतर कोणत्याही भूप्रदेशात नसेल, अशा विशाल महाकाय, वैविध्यपूर्ण मानवी समूहाला भारतीयत्वाच्या धाग्याने ‘एकात्म’ ठेवण्याचे कार्य भारतीय संविधान करते. संविधानाने ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ प्रमाण मानून प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा दिली. जात, धर्म, पंथ, भाषा, रंग, वर्ण, लिंग या कारणांच्या अधारे व्यक्तिभेद करणे संविधानाला मान्य नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसह संविधान समानतेचा आग्रह धरते. या संस्काराची ‘रुजवात’ व्हावी म्हणून अगदी शाळेच्या पहिल्या वगार्पासून ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या प्रतिज्ञेतून देशबांधवांशी निष्ठा राखण्याचे अभिवचन घेत असतो. सर्वांचे कल्याण आणि समृद्धीतच आपले ‘सौख्य’ सामवले, ही जाणीव नव्या पिढीत निर्माण व्हावी हा या मागील उद्देश; परंतु पुढे हे ‘सौख्य’ जाते कुठे? हा खरा प्रश्न आहे..! 

...and We say,' we are Indian' | आम्ही म्हणे भारतीय...!!

आम्ही म्हणे भारतीय...!!

googlenewsNext

- गणेश मोहिते

शाळेत शपथ घेतलेल्या प्रतिज्ञेचे काय झाले? असा प्रश्न आपण स्वत:ला प्रत्येकाने विचारावा म्हणजे उत्तर आपोआप मिळेल. खरंच आपण दांभिक नाहीत काय? कधी असतो आपण भारतीय. आमच्या वंशावळीच्या इतिहासात कितीशी किंमत असते या ‘भारतीय’ असण्याला. काय सांगतो आमच्या विवाहसंस्थेचा इतिहास. लग्नाच्या बाजारात काय ‘मूल्य’ भारतीय असण्याला. तेव्हा आपण कधीच नसतो भारतीय वगैरे. मुळात तो असतो देखावा. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करताना, फार तर एखादा बोनस दिवस म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहताना वगैरे असतो आम्ही भारतीय..! एरवी मात्र आम्ही हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध वगैरे असेच असतो देशपातळीवर. त्यातही आम्ही जेव्हा ‘लोकल’ होतो तेव्हा आमच्या डोक्यात भिनलेली असते आपापली जात. मराठा, धनगर, माळी, साळी, कोळी, महार, मातंग, ब्राह्मण वगैरे असे अठरापगड टिळे लावूनच वावरत असतो आम्ही दिमाखात. या देशात... ‘भारतीय’ वगैरे झुट है, ‘जात’ वगैरे ‘ग्रेट’ है. ‘गर्व से कहो, हम अमुक तमुक है. ‘नाद करायचा नाय...’ वगैरे असल्या कडव्या जात्य-धर्माभिमानी फुत्काराऐवजी ‘भारतीयत्वा’साठी देशप्रेमाचे प्रखर देशभक्तिपर घोषवाक्य आमच्या मुखातून रोज बाहेर पडतील, असे वातावरण उरले नाही. कारण, आम्ही ‘देशात’ जन्म घेण्याऐवजी जन्मतो पहिल्यांदा जातीजातीत, पाळतो ‘धर्म’ आणि फावल्या वेळात तोंडी लावत असतो देशभक्ती. दोस्तो हो... हे अजीब वगैरे काही नाही. वाड्या, वस्त्या, मोहल्ले, नगरं, गावं, गावकूस, झोपडपट्ट्यांतून भळभळणारे ‘वर्तमान’आहे; हे तुमच्या माझ्या देशाचे.

तसाही घरांत, दारांत, रंगात, झेंड्यात, प्रतिमा, प्रतिकांतून कोणताही लवलेश आढळत नाही आपण ‘भारतीय’ असल्याचा. उलट घरातल्या खाणाखुणा पाहूनच कळतो जात, धर्म, पंथ आणि संप्रदाय आमुचा. बुवा, बाबा, मुल्ला, मौलवी, साधू, साध्वी यांच्या ‘भक्ती’पुढे फिके पडते आमचे देशप्रेम. कधी काळी लढलो होतो देशासाठी लढाई. यावरही विश्वास बसणार नाही पुढच्या पिढ्यांचा. सांगावं लागेल त्यांना तेव्हा आम्ही फक्त ‘भारतीय’ होतो; म्हणून झेलल्या अंगाखांद्यावर बंदुकीच्या गोळ्या आमच्या पूर्वसुरींनी स्वातंत्र्यासाठी. तोच खरा ‘इतिहास’ आमच्या भारतीय असण्याचा. आताही लढतो आम्ही तशी रोज नवी लढाई जाती, धर्माचे ‘विष’ पोटात घेऊन पण आपसातच.

‘भारत कधी कधी माझा देश आहे.
आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत...
माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही...
त्यामुळे अन्य जाती, धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही...
माझ्या जातीचा, माणूस माझ्या धर्माचा माणूस, हाच माझा भाऊ आहे...
माझा देश, माझा खाऊ आहे.
खाऊन खाऊन तो संपणार आहे. 
प्रांता प्रांताची जुंपणार आहे...
जुंपल्यानंतर फाटतील,
एकमेकांना लुटतील, 
पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील...’

भारतीय समाज मानसिकतेवर चपखल भाष्य करणारे हे ‘शब्द’ कवी रामदास फुटाणे यांनी स्वातंत्र्याच्या तिशीत लिहिले होते. आजचा ‘काळ’ यापेक्षा काय वेगळा आहे. तसा हा ‘अवकाळ’ आहे. तो सरळ अंगावर येतो, त्याचा चेहरा विदारक व भयावह आहे. आजही जातीय, धार्मिक द्वेष, मत्सर, भेदभाव आमच्या ‘राष्ट्रीय एकात्मतेला’ सुरुंग लावतो आहे. खरं तर भारताचे संविधान स्वीकारताना तत्कालीन समाजधुरिणांनी पाहिलेले नितांत सुंदर स्वप्न संविधान ‘उद्देशिकेत’ उतरले आहे.

‘आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस; सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य; दजार्ची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार...’ वगैरे पण आजचे आम्ही भारतीय लोक. या प्रति किती बांधील आहोत, भारतीय समाज घडविणारा हा मूलभूत गाभाच आम्ही विसरलो. उलट संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडविण्याची जणू आमच्यात स्पर्धा लागली. संविधान निर्मित्यांनी कल्पिलेल्या भारतीय समाजाच्या चित्राशी आजचे चित्र विसंगत वाटू लागले.

अगदी काल, परवा वैभव राऊतच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा, याकूब मेमनच्या अंत्यदर्शनाला जमलेली गर्दी, कठुआत बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या समर्थनासाठी जमलेला जमाव, गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अलिमुद्दीन अन्सारीला जिवे मारणाऱ्या मारेकऱ्यांचा केंद्रीय मंत्र्यांनी केलेला सत्कार, विवेकवादी विचारवंतांच्या हत्या, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांचे वाढते पीक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीची, अगदीच भारतीय संविधानाची प्रत जाळण्यापर्यंत समाजकंटकांची हिंमत. ही नेमकी कशाची लक्षणं आहेत; या घटनांचा अन्वयार्थ कसा लावायचा. जाती, धर्माच्या ठेकेदारांचा रोजचा नवा उच्छाद. धर्माच्या ठेकेदारांनी पोटापाण्यासाठी ‘कडवे’ धर्मवादी घडविण्याचे सुरू केलेले उद्योग वगैरे...

मूलत: धार्मिक असणे आणि ‘कडवे’ धर्मवादी असणे यातच मूलभूत फरक आहे. तसे तर आपण सर्वच धार्मिक असतो. जीवन व्यवहारात व्यक्ती जीवनाची उन्नती, सांस्कृतिक अधिष्ठान देण्यासाठी ‘धर्म’ महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून तर संविधानाने ‘धर्म’ पालनाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ‘धर्म’ ही व्यक्तीची ‘खाजगी’ बाब मान्य करून देशहितासाठी व्यक्तीचे ‘भारतीय’ असण्याला सर्वाधिक महत्त्व दिले; परंतु या कडव्या, अतिरेकी धर्मवाद्यांना मान्य नसते ‘धर्म’ खाजगी बाब राहणे. त्यांना ‘धर्म-राष्ट्र’ अथवा ‘राष्ट्र-धर्म’ हे खूळ शांत बसू देत नाही. त्यामुळे सर्वच धर्मांतील कडवे लोक अधून मधून आपले उपद्रव मूल्य दाखवून भारतीय समाजाची ‘वीण’ उसविण्याचा प्रयत्न करीत राहतात. भारताची फाळणी करून इंग्रजांनी जी दुहीची बिजं आमच्यात पेरली ती अशी पुढे येतात. ‘बाबरीच्या’ पतनानंतर ती आणखी ठळक झाली. त्यातून नवा धार्मिक उन्माद जन्माला आला.

क्रिया-प्रतिक्रियेतून धार्मिक कट्टरता वाढीस लागली. सहिष्णूभारताचे आरोग्य धोक्यात आले. भारतीय समाजाला ‘संविधाना’पेक्षा धर्मग्रंथ आणि धार्मिक प्रतिमा, प्रतिके महत्त्वाची वाटू लागली. महापुरुषांच्या जातींचे उत्खनन होऊन त्यांची अस्मितांच्या राजकारणांत विभागणी झाली. एकूण काय तर भारतीय समाजमन आज अस्थिर आहे. या समूहाला स्थिर आणि शांत ठेवायचे असेल तर या उन्मादी वातावरणाला आवर घालावा लागेल. मतांच्या बेरजेऐवजी ‘राष्ट्रहित’ला प्राधान्य द्यावे लागेल. ‘मानवता’ हाच धर्म आणि ‘भारतीयत्व’ हीच आमची जात सगळ्याला ओरडून सांगावं लागेल. दहशतवाद, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गरिबी, दारिद्र्य इत्यादी समस्यांचे उच्चाटन करीत सामाजिक न्यायाची प्रस्थापना करून ‘हम सब    एक है’चा नारा पुन्हा नव्याने बुलंद करावा लागेल..!!
 ( dr.gamohite@gmail.com)

Web Title: ...and We say,' we are Indian'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.