मराठवाड्यातील किल्ल्यांव्यतिरिक्त सामरिक रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:28 PM2018-08-18T19:28:23+5:302018-08-18T19:28:51+5:30
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यात असलेल्या १७ किल्ल्यांची माहिती आपण आतापर्यंत घेतली आहे. या किल्ल्यांचे इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ‘इतिहासाला आकार देणारी माणसे, वळण देणाऱ्या घटनां’वर प्रकाश टाकला. बेलाग उंची, कडेकपाऱ्या अशा कुठल्याच वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक दुर्गमतेची जोड नसताना केवळ स्थापत्यरचना आणि मजबूत बांधणीच्या जोरावर हे किल्ले अव्याहतपणे पहारा देत उभे आहेत. क्षितिजापर्यंत पसरलेली सपाट मात्र सुपीक जमीन, पावसाळ्याचे चार महिनेच वाहणाऱ्या नद्या आणि काही ठिकाणी कमी उंचीच्या आणि बऱ्याचदा एकलकोंड्या टेकड्या अशा सुरक्षायोजनांच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थितीवर निर्मात्यांनी मात्र कल्पकता आणि सुव्यवस्थित नियोजनाने नैसर्गिक कमतरतेवर मात केली असेच म्हणावे लागते, अशा सुरक्षा नियोजनामध्ये फक्त किल्ल्यांचाच समावेश करून भागणार नव्हते; पण व्यापार-उदीमाची शहरे, मुख्य रस्त्यांवरील गावे यांनाही संरक्षण गरजेचे होतेच.
- तेजस्विनी आफळे
अगदी प्रागैतिहासिक काळापासून जंगली प्राणी, नैसर्गिक आपदा-विपदा, इतर मनुष्य हेच आणि अशा अनेक कारणांमुळे मनुष्याला आपल्या सुरक्षेसाठी विचार करणे भाग होतेच. इतर प्राण्यांसारखाच मनुष्य आपल्या प्रादेशिक सीमाही ठरवू लागला होता. नव-पाषाणयुगात शेती व पशुपालनाच्या उदयानंतर मनुष्याचा एका ठिकाणी जास्त काळ व्यतीत होऊ लागला. माती, दगड, गवत, फांद्या यांच्या साहाय्याने तो घरे बंधू लागला. समाजशील प्राणी असल्याने ही घरे समूहामध्ये बांधली जाऊ लागली. अशा वेळी या घरांचे संरक्षण तसेच आपली प्रादेशिक सीमा पक्क्या बांधणे हे ही आवश्यक ठरू लागले. हळूहळू समूहांची खेडी बनली आणि खेड्यांची शहरे.... सुरुवातीला झाडाझुडपांनी विणलेल्या या सीमा पक्क्या बांधण्यासाठी दगड-विटा-माती-लाकूड यांचा वापर झाला. महापुरांपासून रक्षण करण्यासाठी बाबिलोनिया, मेसोपोटेमिया येथील शहरांभोवती तटबंद्या होत्या तसेच आपल्या सिंधू संस्कृतीतील शहरांभोवताली मोठ्या तटबंद्या बांधलेल्या हाराप्पा, मोहंजोदारो, सुतकागेन्दोर, धोलाविरा या ठिकाणी झालेल्या पुरातात्त्विक उत्खननामध्ये लक्षात आले.
या तटबंदींमध्ये प्रवेश करायला प्रवेशद्वारे होती, पहारेकऱ्यांसाठी ओटे होते. त्यानंतर प्राचीन काळातील मगध राज्याचे राजधानीचे बिरूद मिरवलेले राजगृह तसेच पाटलीपुत्र म्हणजे आधुनिक पटना येथे झालेल्या उत्खननामध्ये पूर्व-मौर्यकालीन शहराचा तसेच मौर्यकालीन राजधानीचा प्रचंड विस्तार लक्षात आला. त्याचबरोबर पाटलीपुत्र शहराभोवती लाकडी खांब, माती वापरून बांधलेल्या अवाढव्य भिंतींचेही अवशेष आधुनिक अवाक् करणारे होते. अशाच तटबंद्या उत्तर भारतात अहीच्छत्र, श्रावस्ती, कोसंबी, शिशुपालगढ, महास्थानगढ अशा अनेक प्राचीन काळातील शहरांसभोवताली असल्याचे आढळले आहे. आपल्या महाराष्ट्रातील सातवाहनकालीन आदम हे विदर्भातील गाव ही अशाच तटबंदीने सुरक्षित होते. त्यानंतरच्या काळातील बांधकामांविषयीचा बराचसा इतिहास काळाच्या ओघात नाहीसा झाला.
त्यानंतर काहीशा वर्षांनंतरच्या ऐहोळे, बदामी या चालुक्यांच्या राजधानींभोवती असलेली दगडांनी बांधलेल्या भिंती आजही दिसतात. आपल्या मराठवाड्यात पूर्व-मध्ययुगीन काळातील धर्मापुरी, अंबाजोगाई, नंदिकोट (आधुनिक नांदेड), कंधार या शहरांना तटबंदी होती हे पुरातात्त्विक पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहेच. कटक देवगिरीला चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगितले जाते तरी त्यातील यादवकालीन खुणा कुठल्या हे सांगणे आता अवघड आहे. पूर्व-मध्ययुगीन काळातील सामरिक रचनेविषयी योग्य मांडणी पुरेशा पुरातात्त्विक पुराव्याअभावी करणे अवघड जाते. कदाचित त्या काळात अनेक राजघराण्यांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी सतत चाललेली युद्धे कारणीभूत असतील.
मध्ययुगात राजकीय उलथा-पालथीनंतर मराठवाड्यात दिल्लीच्या सुलतानांचा अंमल सुरू झाला आणि त्यानंतर दक्खनी सुलतानांचा. आधीच्या सत्तांनी बांधलेल्या किल्ल्यांचे आणि इतर शहरांचे महत्त्व ओळखून मेहमूद गवान, मलिक अंबर आणि नंतरच्या मुत्सद्यांनी त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली. त्यात देवगिरी, औरंगाबाद, बीड, नांदेड ही ठिकाणे होतीच; पण अजिंठा गावासारखे व्यापारी मार्गावरचे गावही होते. त्यामुळे किल्ल्यांबरोबर तटबंदींची शहरे, गढ्या, सराया हे सामरिक रचनेचे भाग बनले. लेखमालेत आपण अशा तटबंदींनी संरक्षित शहर व गावांविषयी माहिती घेऊ.
( tejas.aphale@gmail.com )