शस्त्रसौंदर्याचे चाहते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:47 PM2018-06-05T15:47:24+5:302018-06-05T15:48:09+5:30
दंगलीनंतर औरंगाबाद पुन्हा चर्चेत आले. सेलिब्रेटीला जसं चर्चेत राहण्याचा हव्यास असतो. तसाच काहीसा स्वभाव या शहराचा असावा. नागरी सुविधा, कचरा प्रश्न, धार्मिक राजकारण, कुशल अधिकारी, सुरक्षा व्यवस्था अशा
भागवत हिरेकर
दंगलीनंतर औरंगाबाद पुन्हा चर्चेत आले. सेलिब्रेटीला जसं चर्चेत राहण्याचा हव्यास असतो. तसाच काहीसा स्वभाव या शहराचा असावा. नागरी सुविधा, कचरा प्रश्न, धार्मिक राजकारण, कुशल अधिकारी, सुरक्षा व्यवस्था अशा अनेक कारणांनी औरंगाबाद लोकांच्या गप्पांमध्ये असते. अडचण अशी की आपल्यासारख या शहराला स्वत:च फेसबुक पेज, टिष्ट्वटर हॅण्डल वा इतर सोशल मीडियात हाताळता येत नाही... असो. तर औरंगाबादने दंगलीनंतर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विषय होता घराचं सौंदर्य खुलविण्याचा. घर छान आणि सुंदर दिसाव म्हणून माणूस भरपूर खटाटोप करत असतो. नव्या प्रकारच फर्निचर, भिंतीवर मोठ्या पेटिंग, आल्हाददायक वाटतील असे पडदे, नद्यातले गुळगुळीत दगड असं बरच काही. तर औरंगाबादेतील नागरिकांनाही घराचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि शौर्याच्या परंपरेला झळाळी देण्याच्या उदात्त हेतूने तलवारी, जंबीया, दूधारी चाकू ही शस्त्र मागवली. विशेष म्हणजे खुले धोरण स्वीकारलेल्या कंपन्यांनी खेळणी म्हणून ही शस्त्रे घरपोच पोहोचवून औरंगाबदेतील ‘त्या’ नागरिकांच्या शस्त्रसौंदर्याला प्रोत्साहनच दिले.
भिंतीवर लटकावलेले हे शस्त्रसौंदर्य घरी आलेल्यांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी बघावे ही मुराद असलेल्या ‘त्या’ नागरिकांच्या डोक्यातून एक गोष्ट निसटलीच. इतक्या शूरवीरांच्या हातातल्या शस्त्रांसारखी दिसणारी ही शस्त्रे ठेवण्यासाठी घरही तसेच लागेल ना?? हवेली, महाल असं काहीस हवं. कोल्हापूरला शाहू पॅलेस आहे ना तसं. पण ज्यांनी त्या मागवल्यात ते गल्लीबोळातच राहतात. फारफार तर कॉलनीत. म्हणजे १, २, ३, बीएचके. जिथे दोन पाहुणे शिल्लक आले तर गर्दी होते. तिथे राहताना या शस्त्रांना काय वाटेल??? दुसर म्हणजे ऐतिहासिक वाटणारी शस्त्रे मागवली आॅनलाईन. म्हणजे आधुनिकीकरण आलंच. आपण जे जगतोय ते कालबाह्य वाटणार नाही, यासाठी क्षणोक्षणी स्वत:कडे बघणारी माणस अचानक इसवी सन पूर्व मध्ये कशी काय पोहोचली?
भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या या वर्गाने ही शस्त्रे मागवण्याची हेतू इतका उदात्त असेल हे शंकास्पद आहेच. पण त्यापुढे अनेक प्रश्न निर्माण करणार देखील आहे. मागे सनम तेरी कसम नावाचा सिनेमा आला होता. पिळदार शरीर असलेल्या त्या अभिनेत्याने संपूर्ण सिनेमात एकही वाद केला नाही. त्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. हे म्हणजे हिंसा देशातल्या बहुसंख्य वर्गाला प्रिय असल्याच प्रतिबिंब आहे. त्यामुळेच तर दाक्षिणात्य सिनेमांकडे प्रेक्षक आकर्षित झालेला आहे. तर मुद्दा असा की ही शस्त्रे शोभेबरोबरच स्वसंरक्षणासाठी मागवली गेली आहेत का? तसे असेल तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात असलेल्या फौजफाट्यावर तलवारवीरांचा विश्वास नाही का? सामाजिक वातावरण प्रदूषित झालेले असताना ही शस्त्रे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर चालणार नाही, यांची शाश्वती कोण देणार? परदेशात माथेफिरूने गोळीबार केल्याच्या बातम्या नेहमीच ऐकण्यात येतात. अशीच एक घटना परवा मध्यरात्री शहरात घडली. तीन तरूण रस्त्यावर रिव्हॉल्वर घेऊन फिरत होते. त्यांनी एका तरूणावर ती रोखली. मात्र, एकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. त्यामुळेच शहरात आलेल्या तलवारींनी चिंता वाढवली आहे. कारण उद्या औरंगाबादेत तलबारबाजी करत जखमी केल्याच्या बातम्या यायला लागल्या तर...???