स्वरसुगंधाने दरवळली रम्य सायंकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:39 PM2018-05-19T19:39:20+5:302018-05-19T19:40:06+5:30

प्रासंगिक : संगीतातील सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या किशोरीतार्इंना शतश: अभिवादन करून स्वरगंधर्व आयोजित गानसरस्वती स्वरोत्सवाची सायंकाळ रम्य ठरली.

Beautiful evening sunshine | स्वरसुगंधाने दरवळली रम्य सायंकाळ

स्वरसुगंधाने दरवळली रम्य सायंकाळ

googlenewsNext

- निकिता जेहूरकर

' सूरसावली'  किशोरीतार्इंचे शिष्यगण डॉ. वैशाली देशमुख आणि पं. रघुनंदन पणशीकर यांनी त्यांच्या सुश्राव्य गायनाने किशोरीतार्इंचे विचार स्वरमाध्यमातून प्रस्तुत केले. ज्या भूप रागाच्या माध्यमातून किशोरीताई आपल्या दिव्य-स्वरांनी संगीतप्रेमी रसिकांना मोहिनी घालत, त्याच त्यांच्या आवडत्या भूप रागाचे सादरीकरण करीत डॉ. वैशाली देशमुख यांनी मैफलीत स्वरांची गुंफण केली. विलंबित तीन तालात ‘एरी आज’ हा कृष्णवर्णनावर आधारित असा बडा ख्याल खास जयपूर पद्धतीने त्यांनी पेश केला.

कूट, सपाट, आलंकारिक, गमक, मिश्र इत्यादी तानांच्या प्रकारांत हा राग नजला त्यांनी सादर केलेल्या भूप रागाचे वेगळेपण किशोरीतार्इंच्या मांडणी आणि विचारांमध्येच येते. किशोरीतार्इंनी लावलेला ऋषभ आणि किशोरीतार्इंचा ऋषभ यातील साम्य उपस्थित जाणकारांना जाणवत होते. हे त्यांच्या प्रतिक्रयेतून दिसूनही आले. मध्यलयीत अद्धा तीन तालात ‘सहेला रे’ ही किशोरीतार्इंची लोकप्रिय बंदिश त्यांनी पेश केली. छोटा ख्याल रंगवताना बेहेलावे होत सुंदर मुर्कींचा वापर केला. त्यामुळे छोटा ख्याल अधिक रंगतदार झाला. गायनाच्या साथीला तबल्यावर संतोष देशमुख आणि संवादिनीवर मकरंद खरवंडीकर यांनी समर्पक अशी साथ केली.
भूपाळीनंतर किशोरीतार्इंनी भक्तिरसाकडे नेले. 

‘बोलावा विठ्ठल ।
पहावा विठ्ठल ।।’

हा अहिर भैरव रागावर आधारित अभंग जयपूर घराण्याच्या वैशिष्ट्यांसह सादर केला. मैफलीच्या उत्तरार्धात शोभेल असा राग रागेश्री पं. रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या सादरीकरणासाठी निवडला. रागाचा निलंबित विस्तार प्रसन्न करणारा आणि मनमोहक होता.
विलंबित तीन लालामध्ये पारंपरिक बंदिशीचे बोल होते ‘एरी पलक न लागी’ विस्तारामध्ये जयपूर अत्रौली घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण जागा सतत जाणवत होत्या. गमक मुर्कींनी तो राग नटवलेला होता. जयपुरी अंगाच्या विविध प्रकारच्या ताना सादर करून मध्यलय एकतालात ‘देखो श्याम’ हा छोटा ख्याल त्यांनी रंगवला. त्यानंतर त्यांनी ‘आनंद-मल्हार’ किशोरीतार्इंच्या चिंतनातून निर्माण झालेल्या वैचित्रपूर्ण राग सादर केला. या रागाचे वैशिष्ट्य म्हणजे तीन रागांच्या छाया स्पष्टपणे दिसत होत्या.

उदा. यमन, मल्हार, शुद्ध मल्हार, महाराष्ट्रातील रसिकांना हा राग विशेष ऐकिवात नसल्यामुळे त्याचे दर्शन आनंददायी होते आणि यानंतर त्यांनी लोकाग्रहास्तव भैरव रागातील अभंग सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. भरत कामत याची तोडीसतोड लाभली. प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पं. विकास कशाळकर, शुभदाताई पराडकर, पं. नाथराव नेरळकर, राजेश सरकटे इत्यादी संगीत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असल्याने कार्यक्रमास शोभा आली. पखवाजवर साथ गोविंद भिल्लारे यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन मंगेश वाघमारे यांनी केले.

Web Title: Beautiful evening sunshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.