संवादाच्या पलीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:45 PM2018-05-26T19:45:10+5:302018-05-26T19:49:00+5:30
ललित : संवाद शब्दांतूनच व्हावा असा संकेत असला तरी नेहमी व्यक्त होण्यासाठी शब्द कुठे धावून येतात! कितीतरी अव्यक्त माध्यमं असतात की आपल्यात व्यक्त होण्यासाठी. म्हणून तर कित्येकदा न बोललेल्या भावनाही पोहोचतात मनाच्या खोल तळापर्यंत. कुठल्या माध्यमातून वाहत जातं हे सगळं अन् तेही इतक्या थेटपणे..
- ज्योती कदम
सावलीचे ठिपके मांडत उन्हं रेखाटत जातात स्वत:ची रांगोळी.. अशा कैक रांगोळ्यांचे गालिचे झाडावेलीखाली अंथरलेले पाहायला मिळतात ते याच उन्हाळ्यात.. सावलीचे रंग चिमटीत पकडून घेण्याचा मोहदेखील याच उन्हाच्या साक्षीने प्रसवतो. तेव्हा शब्दांशिवाय कळतंच की खूप काही न बोललेलं.. या उन्हाळ झळा गारेगार सावलस्पर्शाने साजरा करीत जातात नि:शब्दोत्सव!!
शब्दांशिवायही चालत असतात गुजगोष्टी निसर्गातील प्रत्येक जीवाच्या एकमेकांशी.. त्यासाठी जरासे कान देऊन ऐकावे लागते फुलापानांचे, पक्ष्यांच्या थव्यांचे, पाण्यातील तरंगाचे सूक्ष्मातिसूक्ष्म आवाज.. कैक प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या चंद्राच्या मनातले शीतल स्वर असो, की पृथ्वीचं मनोगत स्वत:चं स्वत:शी.. बस्स कानात प्राण आणून ऐकलं की ऐकू येतंच सारं.
संवाद शब्दांतूनच व्हावा असा संकेत असला तरी नेहमी व्यक्त होण्यासाठी शब्द कुठे धावून येतात! कितीतरी अव्यक्त माध्यमं असतात की आपल्यात व्यक्त होण्यासाठी. म्हणून तर कित्येकदा न बोललेल्या भावनाही पोहोचतात मनाच्या खोल तळापर्यंत. कुठल्या माध्यमातून वाहत जातं हे सगळं अन् तेही इतक्या थेटपणे.. अंगणातल्या जास्वंदीला कळ्या आल्या की त्याला बरोबर कळतं तिच्या मनाचं उमलून येणं.. अन् भर उन्हातही कुठलाही निरोप नसला तरी तो येऊन पोहोचलाय शहरात हे कसं कळतं तिला!! उन्हं नेहमीच करपवत नाही मनाला.. कधी-कधी असे प्रवाही संवादतात स्वत:शी..!
पण संवादाची मौन पडझड अधिक जीवघेणी..! शब्दार्थांच्या पार पलीकडची..! त्यामुळेच तर शतकानुशतके टिकलेले हे प्रस्तरलेख कितीही पाषाणी वाटत असले तरी ते पोहोचवतातच तत्कालीन संवाद आपल्यापर्यंत..! शतकांचे कितीतरी उंबरठे ओलांडत.! तत्कालीन क्षणांचे बुडबुडे फसफसत राहतात वर्तमानाच्या रसायनात..पण आपण अजूनही सतत घाबरत असतो स्वत:शी संवाद साधायला. एवढंच नाही तर आपण आपलीच स्वप्नंही सांगत नाही आपल्याच मनाला.. अशा स्वप्नांची कितीतरी सुरवंटं निपचित पहुडलेली असतात मनाच्या एका बंद कप्प्यात.. त्यांची फुलपाखरं होतच नाहीत कधी!
चौकोनाचे चार बिंदूही सांधत नाही आपण.. होतच नाही सुसंवाद कधी. भिंती घुसमटून जातात नि छत हवालदिल होतं, पण संवादऊर्जा पेरतच नाही आपण.. नितळ निर्मळ आॅक्सिजन इतका दुर्मिळ झालाय संवादाअभावी.. रात्रभर उघडून बघत राहतो पेटीतले काजवे चिमुटभर उजेडासाठी; पण ऐकू येत नाहीत जिवलग श्वास बाजूलाच असलेल्या आपल्याच माणसांचे.
पूर्वी कंदिलाच्या उजेडात अख्खं घर एकत्र बसून करीत राहायचं संवाद एकमेकांशी.. जाणून घेतलं जायचं सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या एकेका सुरकुतीचा जीवनानुभव.. किमान तीन पिढ्यांचा तरी संवाद एकाचवेळी ऐकत असाव्यात या भिंती.. पण आताशा चौकोनाबाहेरचे नि आतले असे वेगवेगळे परिघ झालेले असतानाच प्रत्येकजण रेखाटतोय कितीतरी परिवर्तुळं स्वत:भोवती नि इतरांभोवतीही.
ऐकू येण्यापलीकडे जात आहेत नाती.. जिवाभावाची माणसं फक्त पुस्तकात वाचावी तेवढीच शिल्लक आहेत.. घरात नांदणाऱ्या सगळ्या सुरकुत्या आम्ही केव्हाच नेऊन सोडल्या आहेत वेदात वर्णन न केलेल्या कुण्या नव्याच आश्रमात.. मुळांची नाळ तुटलीय खोड-फांद्यांशी..तरीही विस्तारत जाताहेत कैक फांद्या वरच्या वर.. निळ्या आभाळात; पण मुळं पोखरली आहेत.. तकलादू अस्तित्व..संवादहीन.
प्रचंड वेगानं जग धावतंय.. रस्ते विस्तारले गेले आहेत नि रस्त्यावरची पावलं विस्फारून पाहताहेत आपल्याच गतीकडे.. या गतीने बहाल केलेली ही प्रगती की अधोगती..! या प्रश्नाला जोजवत रस्ते धावताहेत.. प्रचंड कोलाहल.. पण संवादाशिवायचं.. साद प्रतिसादाशिवायचं जगणं.. संवादाचं कौलारू देखणेपण पार हरवलंय या बहुमजली विस्तीर्ण शांततेत!!
( Jyotikadam07@rediffmail.com)