पक्षी जाय दिगंतरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:18 PM2018-05-14T18:18:24+5:302018-05-14T18:42:20+5:30
शनिवारी जागतिक पक्षी स्थलांतर दिवस झाला. यानिमीत्त...
- डॉ. किशोर पाठक
अनेक पक्षी ठरलेल्या ऋतूंमध्ये नियमितपणे स्थलांतर करीत असतात. प्रामुख्याने पक्ष्यांचे स्थलांतर हे भक्ष्याचा तुटवडा पडल्याने होते. बऱ्याच पक्ष्यांचे स्थलांतर हे प्रजननासाठीसुद्धा होत असते. ते देशांतर्गत आणि देशाबाहेर, असे दोन प्रकारे होत असते. भारतातल्या भारतात पक्ष्यांचे जे स्थलांतर होते ते प्रामुख्याने उत्तरेकडून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यात होत असते. महाराष्ट्रात, मराठवाड्यात येणारे पक्षी हे प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर हिवाळा सुरू झाल्यावर येतात. हे पक्षी प्रामुख्याने उत्तरांचल म्हणजेच हिमालय, काश्मीर, नेपाळ या भागांतून येतात, तर फार कमी पक्षी हे दक्षिणेकडून येतात.
स्थलांतरित पक्ष्यात पाणपक्षी अधिक
मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांमध्ये पाणपक्षी तसेच वृक्षपक्षी (वनपक्षी) यांचा समावेश असतो. पाणपक्षी नेहमी थव्याने येतात. यात पक्ष्यांची संख्या १०-२० ते एक-दोन हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकते. करकोचे, हंस, रोहित हे मोठे पक्षी असोत किंवा पाणथळीवर आढळणारे छोटे पाणपक्षी असोत. जसे तुतवार, पाणलावे, पाणटिटवी, धोबी, चरचरी, सुरसकिडा, बदकांच्या प्रजाती, पाणभिंगरी, पाकोळी हे पक्षी हजारो, लाखोंच्या संख्येने येतात, तर हिवाळ्यात आपल्याकडे येणारे वनपक्षी बऱ्याचदा एकटेदुकटे येतात, जसे माशीमार प्रजाती, विटकरी कवडा, हिवाळी घुबड, खाटीक, नीळकंठ, कस्तूर, गप्पीदास, थिरथिरा, रणगोजा, छोटा सातभाई, कृष्णशिरी सातभाई, वटवट्यांच्या परदेशी प्रजाती (पर्णवटवटे), श्वेतकंठ, हळद्या, परदेशी नीलपंखी, पावशा, चातक, कोकीळचे काही प्रजाती, मोठा गरुड, नेपाळी गरुड, शाही गरुड, श्वरुची, शाही ससाणा हे पक्षी एकटे-दुकटे येतात. ते थव्याने स्थलांतर करीत नाहीत. पाणपक्ष्यांमध्ये पाणघार, मत्स्यगरुड हेही थव्याने स्थलांतर करीत नाहीत. पाणकावळे मात्र भारतभर स्थलांतर करताना थव्यानेच दिसून येतात.
हिवाळा सुरू होताच नद्या, सरोवरे, समुद्र, तलाव यांचे पात्र, पाणथळी हिवाळी पक्ष्यांनी भरून जातात. पाण्यावर बदके, पाणकावळे, कुरव, सुरय, पाणघारी, गरुड हे पक्षी दिसून येतात, तर पाणथळीमध्ये तसेच कमी खोल उथळ पाण्यात रोहित, शराटी, पाणलावे, कमळपक्षी, विलकमल, तुतारी, तुतवार, तर पाण्यालगतच्या जमिनीवर धोबी, चिखल्या, पाणभिंगऱ्या, चरचरी, करकोचे, कौंच, हिवाळी ससाणे, गरुड, पट्टेरी हंस, चक्रवाक बदके यांची जत्रा भरलेली असते आणि दिवसभर ते भक्ष्य टिपताना दिसून येतात. परतीच्या प्रवासानंतर हे बरेच पक्षी प्रजनन करतात. त्यासाठी ते भरपूर खाऊन चरबीचा साठा करतात. जो परतीच्या प्रवासात आणि नंतर प्रजननासाठीही उपयुक्त ठरतो.
स्थलांतरित वनपक्षी (वृक्षपक्षी) हे युरोप, तिबेट, उत्तरांचल, आफ्रिका येथून येतात आणि वने, शहरातील झाडेझुडपे असलेली उद्याने, शहर वस्त्या, ग्रामीण वस्त्या, शेती याठिकाणी एकट्या-दुकट्याने मुक्काम करणे पसंत करतात. यामध्ये निळी लिटकुरी, पिवळी लिटकुरी, नीळकंठ, परदेशी, नीलपंखी, खाटीक, मानमोड्या, थिरथिरा, लालकंठी लिटकुरी, करड्या छातीची लिटकुरी, वटवटे, पर्णवटवटे, श्वेतकंठ, ससाणे, चरचरी यांचा समावेश असतो. बरेच पक्षी, पाणी, पाणथळ, भक्ष्य आणि अधिवास यांचा अभाव असल्यास जवळपासच्या प्रदेशात स्थलांतर करतात. यात महाराष्ट्रातील निवासी पक्षी असतात. पश्चिम घाटात आणि महाराष्ट्रात निवासी समजले जाणारे अनेक पक्षी मराठवाड्यात फक्त हिवाळ्यात तसेच उन्हाळ्याच्या पूर्वार्धात पाण्याजवळ दिसून येतात.
पश्चिम घाटातील निवासी समजला जाणारा नवरंग हा पक्षी मराठवाड्यात मे महिन्याच्या शेवटी प्रजननासाठी येतो. हा पक्षी पाणझडीच्या जंगलात तसेच आपल्या शहरात असलेल्या वृक्षराईच्या भागात दिसून येतो. येथे घरटी बांधून तो वीण करतो आणि आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये वापस जातो. तसेच उन्हाळी स्थलांतर करणारे पक्षीही असतात, हळद्या, पावशा, चातक, कोकीळ, प्रजाती या मे महिन्यात मराठवाड्यात दाखल होतात. हळद्या हा देखणा पिवळ्या रंगाचा पक्षी मार्चनंतर इकडे दिसून येतो. पावशा, चातक व इतर कोकीळ जातीचे पक्षी उन्हाळ्यात दाखल होतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रजननासाठी तयार होतात. हे सर्व कोकीळ कुळातले पक्षी आपल्या मराठवाड्यातील स्थानिक पक्षी जसे सातभाई, वटवट्या, सुभग आणि इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात आणि त्यांना फसवतात.
उपासमार टाळण्यासाठी स्थलांतर
पाणपक्ष्यांमध्ये कमळपक्षी, नीलकमल, काणूक बदक, नकटे बदक, धनवर बदक, शिट्टीमार बदक, शराटी हे पक्षी आपल्या भागात उन्हाळ्यात पाणथळीत मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. म्हणजेच बरेच हिवाळी पक्षी अन्न शोधण्यासाठी आणि अति थंड वातावरण तसेच उपासमार टाळण्यासाठी हजारो कि.मी.वरून आपल्या भागात येतात, तसेच काही पक्षी आपल्याकडे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रजननासाठी येतात. निसर्गामध्ये अशा प्रकारचे स्थलांतर पशू-पक्ष्यांमध्ये काही कीटक आणि माशांतही दिसून येते. हजारो वर्षांपूर्वीपासून हे स्थलांतर सुरू असून, याचा अभ्यास मागील एक-दोन शतकांमध्ये केला गेला.
पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग कधीही सरळ एका रेषेत नसतात. कारण संपूर्ण आभाळावर ते उडू शकत असले तरी पाणपक्षी (बहुतेक) हे पाण्यावरून उडणे टाळतात, किनाऱ्यावरून प्राणथळीवरून अथवा जमिनी, पर्वत, वाळवंट व बर्फाळ प्रदेश, अशा भागांतून उडतात. जेणेकरून मार्गात खाद्य मिळवणे सोपे जाते, तसेच जमिनीवरून वर जाणाऱ्या गरम वाऱ्याचा स्तंभ त्यांना उंच उडण्यासाठी मदत करतो. आपल्या पंखांच्या ताकदीने वीतभर पक्ष्यापासून करकोच्यांसारख्या मोठ्या पक्ष्यांपर्यंत हजारो कि.मी.चा प्रवास अल्पकाळात पार करतात.
जीवनचक्र सूर्याशी निगडित
बहुसंख्य पक्षी दिनचर असतात आणि त्यांचे जीवनचक्र सूर्याशी निगडित आहे. ज्यावेळी सूर्य दक्षिण गोलार्धात असतात तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तेथे दिवस छोटा असतो, पक्ष्यांना वेळ कमी पडतो आणि युरोप, रशिया, सायबेरिया, लडाख, तिबेट, हिमालय, उत्तरांचल, काश्मीर याठिकाणी बर्फवृष्टी होते. जलाशये गोठून जातात, खाद्य दुर्भिक्ष होते आणि हे दक्षिणेकडे स्थलांतर करतात. कमी स्पर्धा असलेला योग्य प्रदेश मिळवण्यासाठी ते थेट विषुववृत्तापर्यंत मजल मारतात. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर हे पक्षी पुन्हा मूळ वसतिस्थानाकडे, उत्तरेकडे स्थलांतरित होतात. दक्षिण गोलार्धात बरोबर उलट क्रिया घडते. ज्यावेळी सूर्य उत्तर गोलार्धात असतो तेव्हा दक्षिणेकडे हिवाळा असतो. अशावेळी दक्षिण ध्रुवावरचे पक्षी उत्तरेकडे स्थलांतर करतात आणि हिवाळा तेथे घालवतात आणि वसंतात पुन्हा दक्षिणेकडे मूळ ठिकाणी येतात.
अशा प्रकारे पक्ष्यांचे स्थलांतर म्हणजे मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास होय? अपवाद प्रजननासाठी आपल्याकडे येणाऱ्या पक्ष्यांचा. थॉमसन या शास्त्रज्ञाच्या मते ‘बहुतांश काळ अनुकूल परिस्थिती लाभावी म्हणून वसतिस्थानांत नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल होय.’ करकोचे, कवडा कबुतर आणि पाकोळ्या यांचे स्थलांतरण ३,००० वर्षे पूर्वीपासून आहे, हे सिद्ध झाले आहे. आर्र्टिक टर्न हा पक्षी दरवर्षी आपल्या निवासस्थानापासून (प्रजननस्थळ) ते अंटार्क्टिका, असा ३६,००० कि.मी. प्रवास करतो, तर काही पक्षी एक हजार कि.मी. (१,००० कि.मी.) एवढाही प्रवास करू शकतात. अलबेट्रॉस हा दक्षिण महासागरावर उडत जवळजवळ त्या प्रदेशाची प्रदक्षिणा मारतो. सगळ्यात कमी अंतराचे स्थलांतर हे हिमालय आणि अंडीस पर्वतावर उंचीवर केले जाते. काही दीर्घायुषी पक्ष्यांनी आपल्या ५० वर्षे आयुष्यात ५ लाख मैल अंतर कापल्याच्या नोंदी आहेत. काही पक्षी हजारो कि.मी. अंतर हे एका दमात कापू शकतात, तर काही छोटे पक्षी अनेक मुक्काम घेत हे अंतर पार करतात.
स्थलांतर करताना पक्षी थव्यामध्ये अनुभवी पक्ष्यांचा सल्ला, त्यांचे मार्गदर्शन, अंत:प्रेरणा, सूर्याची दिशा, समुद्रावरील वारे, समुद्र किनारे, नद्या, पर्वत रांगा, मोठी सरोवरे, अशा ठळक खुणांच्या साहाय्याने आपला मार्ग ठरवतात. काही पक्षी दिवसा प्रवास करतात, तर काही पक्षी रात्री प्रवास करतात. क्रौंच, रोहित हे पक्षी दिवसा प्रवास करतात. आपल्या भागात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांमध्ये मोठ्या संख्येने पाणपक्षीच येतात. त्यांच्या खालोखाल गुलाबी मैना, गुलाबी चटक आणि भारीट या शेतावर दिसणाऱ्या वृक्षपक्ष्यांची संख्या असते.
स्थलांतरापूर्वी काही पक्षी वजन वाढवतात
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये पालक आणि पिले असतात. बऱ्याचदा अनुभवी पक्षीही नसतात. अशावेळी बऱ्याच पक्ष्यांची थोडी मोठी झालेली पिले ही वयस्कर पक्षी अथवा पालकांशिवाय प्रवास करतात. अनेकदा आपल्याला तलावांवर अथवा झाडांवरसुद्धा पूर्ण रंगरूप न आलेले ही मोठी पिले दिसतात. या युवा पक्ष्यांना उपजत दिशाज्ञान हे अंत:प्रेरणेने होते आणि मार्ग मिळतो. पक्षी स्थलांतरादरम्यान हजारो कि.मी.चा प्रवास करतात आणि त्यासाठी खूप ऊर्जा लागते म्हणून त्याआधी पक्षी भरपूर खाऊन चरबी (मेद) साठवतात. जी ऊर्जा म्हणून उपयोगी असते. या चरबीच्या जोरावर छोटेपक्षीसुद्धा शेकडो घंटे न थांबता प्रवास करू शकतात. स्थलांतरापूर्वी काही पक्ष्यांचे वजन दुपटीने वाढलेले असते.
युरोप आणि सायबेरियातून आलेले बहुतेक पक्षी आपल्याकडे वीण करीत नाहीत. कारण या पक्ष्यांचा विणीचा प्रदेश हा सर्वात थंड प्रदेश असतो; परंतु सायबेरियातून आलेले रोहित पक्षी मात्र आता भारतभर स्थायिक झालेले दिसतात आणि उन्हाळ्यात कच्छच्या रणात घरटी करून प्रजनन करतात आणि पिले मोठी झाली, की त्यांना घेऊन महाराष्ट्रात येतात आणि मूळ ठिकाणी (सायबेरियात) जात नाही. मात्र, इतर पक्षी वापस मूळ ठिकाणी जाऊन प्रजनन करतात. बहुसंख्य पक्षी दिवसा, तर बरेच पक्षी रात्री स्थलांतर करतात. धीट, चपळ, ताकदवान पक्षी दिवसा प्रवास करतात. याउलट छोटे, लाजाळू, भित्रे आणि एकटे राहणारे पक्षी रात्री प्रवास करतात. दिवसा ते झुडपांत अथवा सुरक्षित ठिकाणी आराम करतात. पक्ष्यांना रात्रीही चांगले दिसते. दिवसा प्रवास करणारे पक्षी आपल्याला दिसतात, तर रात्रीचा प्रवास करणारे पक्षी किलबिलाट (विविध आवाज करीत) उडतात.
मराठवाड्यात १५० प्रकारचे पक्षी पाहुणे
आपल्या मराठवाड्यात एकूण १५० प्रकारचे पक्षी पाहुणे म्हणून येतात. यामध्ये पाणपक्ष्यांबरोबरच, माळरानावरचे, शाखारोधी (वृक्षपक्षी) आणि शिकारी पक्षीही येतात. थापट्या बदक, नकटा, शेंडीबदक, लालसरी, मराळ, तरंग, चक्रांग, मलिन बदक, चक्रवाक ही बदके येतात. पेस्टी कदंब, चमचे, अवाक, तुतवार, शेकोटे, उचाट्या, चिखल्या, पाणलावे, कुरव, सुरय हे पक्षीही येतात. या सर्वांच्या मागावर असलेले पाणघार, ससाणे, शिक्रे, कुकरी, खरुची गरुड, सरडमार गरुड हे शिकारी पक्षीही येतात. गप्पीदास, कस्तूर, नीळकंठ, नीळपंखी, धोबी, क्रौंच असे अनेक पक्षी येतात. वटवटे, पर्णवटवटे, श्वेतकंठ, असे छोटे-छोटे पक्षीसुद्धा हिवाळ्यात झुडुपी जंगले, शेतवस्त्या, शहरांतील बगिचे या ठिकाणी येतात; परंतु यांना शोधणे अवघड जाते.
उन्हाळी स्थलांतर करून १८ प्रजातींचे पक्षी आपल्याकडे येतात
मराठवाड्यात त्यातील ६ प्रकारचे पक्षी येतात. हे पक्षी हिवाळा आफ्रिकेत घालवतात. यातील चातक आणि पावशा आपल्या परिचयाचे आहेत. हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांपैकी काही पक्षी श्रीलंका, जावा, सुमात्रा व इंडोनेशिया, अशा पूर्वेकडील प्रदेशात इतर मार्गांत जाताना भारतात अल्पकाळ मुक्कामासाठी थांबतात आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघतात, अशा पक्ष्यांना हंगामी प्रवासी असे म्हणतात, असे १५ प्रजातींचे पक्षी आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पक्षी ठराविक ठिकाणी त्या-त्या महिन्यामध्ये बरोबर हजर होतात. रात्री स्थलांतर करणारे पक्षी धृव तारा, नक्षत्र यांच्या साहाय्याने दिशा ठरवतात; पण वादळी, पावसाळी आणि ढगाळ रात्री पक्षी भरकटू शकतात. त्यांना अपघातही होऊ शकतो. अलीकडच्या संशोधनावरून पक्ष्यांना गंधज्ञानही असते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विशिष्ट गंधावरून गवताळ प्रदेश, जंगल, पाणसाठे ते शोधू शकतात. पक्ष्यांमध्ये घरपरतीची अंत:प्रेरणा असते. जी त्यांना अचूकपणे घरी पोहोचवते.
अन्न उपलब्धता आणि तापमानानुसार ठरत स्थलांतर
मराठवाड्यात लडाख, तिबेट, रशिया, सायबेरिया, मलेशिया, युरोप या भागांतून अनेक विदेशी पक्षी हिवाळ्यात येतात. हे बहुतांश पक्षी उत्तरेकडे बर्फवृष्टी सुरू झाल्याने, तलाव बर्फाने झाकले गेल्याने, वृक्ष निष्पर्ण झाल्याने म्हणजेच अन्न (भक्ष्य) मिळणे दुर्लभ झाल्याने आपल्याकडे सेतात आणि पाणथळ, तलाव, दलदलीचे प्रदेश, वनप्रदेश याठिकाणी भक्ष्याच्या शोधात येतात आणि काही महिने मुक्काम करतात. उत्तरेकडून येणाऱ्या पक्ष्यांचा मुक्काम भक्ष्याची उपलब्धता तसेच शरीराला मानवणारे थंड वातावरण यावर अवलंबून असते. नद्या, तलाव, समुद्राच्या पाणथळीत भरपूर भक्ष्य उपलब्ध असते; परंतु (मराठवाड्यात) तापमान वाढल्यास म्हणजेच उन्हाळ्यात (३९ अंश ते ४० अंश सेल्सिअस) परतीच्या प्रवासाला निघतात, तसेच पाणीसाठा कमी असल्यास भक्ष्य कमी झाल्यानेसुद्धा उन्हाळ्याच्या काही दिवस आधीच परतीच्या प्रवासाला निघतात. म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर आणि वापसी हे अन्न उपलब्धता आणि तापमानानुसार ठरत असते.
परतीच्या प्रवासाठी एकत्र येतात
मलेशियाकडून येणाऱ्या भोरड्या किंवा गुलाबी मैना आणि माळभिंगरी हे पक्षी लाखोंच्या संख्येने हिवाळ्यात येतात. यांचा मार्ग अफगाणिस्तान खैबर खिंडीतून असतो. गुलाबी चटक, भारीट पक्षीसुद्धा हिवाळ्यात लाखोंच्या संख्येने मराठवाड्यात येतात आणि झाडांवर मानवी वस्त्यांजवळ मुक्काम करतात. हे पक्षी प्रामुख्याने छोटी फळे, धान्य खातात, तर माळभिंगऱ्या या लाखोंच्या संख्येने तलावाकाठी, नद्यांकाठी तारांवर रांगेत बसलेल्या दिसतात. माळभिंगऱ्या चिलटे, डास, बारीक किडे हवेतल्या हवेत खाऊन जगतात. स्थलांतर करून आलेले पक्षी थकलेले असतात, तसेच त्यांची शरीरयष्टीही बारीक झालेली असते. हे लाखोंच्या संख्येने येणारे पक्षी एका प्रमुख ठिकाणी आल्यानंतर अलग होतात आणि वेगवेगळ्या थव्याने परिसरात अथवा इतर ठिकाणी आपले स्थान शोधायला निघून जातात आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. आपल्या (मराठवाड्यात) भागात ज्या ठिकाणी पहिला मुक्काम करून अलग होतात त्याच ठिकाणी एकत्र जमतात आणि वापसीचा प्रवास सुरू करतात.
अनेकांचे सागरावरून स्थलांतर
मराठवाड्यात येणारे पट्टी हंस हे भारतात येताना २१ हजार फूट उंचावरून आल्याचे सिद्ध झाले आहे. तलवार, बदक, पाणटिवळी हे १६ हजार फुटांवरून उडतात, तर बहुतांश पक्षी ५०० फूट ते १,९०० फूट उंचीवरून उडतात. पक्षी धडकण्याच्या दुर्घटना २,००० फुटांपर्यंत झाल्याच्या आढळून आल्या आहेत. पेट्रेल आणि शियर वॉटर हे पक्षी सागरावरून स्थलांतर करतात, तर इतर पक्षी किनारे, भूभाग, पहाड यावरून स्थलांतर करतात.
अचूक कालमापन करणारे ‘जैविक घड्याळ’ उपयोगाचे
पक्षी स्थलांतर करतात कसे? हे सगळे त्यांना जमते कसे? ते दिशा कशी ठरवतात? त्यांना दिशाज्ञान कसे होते? यावर संशोधन सुरू आहे. पक्षी फक्त पंखांच्या ताकदीवर स्वत:चा मार्ग ठरवतात. ज्याबरोबर अनेक यंत्रणा कार्यान्वित होतात आणि स्थलांतर सुकर होते. पक्ष्यांच्या डोळ्यांतील काही रंगद्रव्यांमुळे त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय रेषा प्रत्यक्ष दिसतात. त्यातून पक्ष्यांना दिशाज्ञान होते. सूर्याचाही उपयोग दिशाज्ञानासाठी होतो. सूर्य उगवण्यापासून मावळतीपर्यंत पूर्व-पश्चिम जी कमान तयार होते, त्याला ‘सौर कमान’ म्हणतात. याचाही फायदा पक्षी घेतात, तसेच पक्ष्यांच्या शरीरात अचूक कालमापन करणारे ‘जैविक घड्याळ’ असते. याच्या साहाय्याने पक्षी मूळ ठिकाणी बिनचूक पोहोचतात. ढगाळ हवामान असतानाही पक्षी प्रवासात दिशा चुकत नाहीत.