माऊलीची माऊली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:17 PM2018-01-23T18:17:51+5:302018-01-23T18:20:05+5:30
अनिवार : शीर्षक वाचून प्रश्नार्थक चेहरा झाला असेल ना? कोण ही माऊली आणि कोण ही माऊलीची माऊली? तर माऊली म्हणजे एक केसांच्या जटा वाढलेली, पायाचे हाड बाहेर आलेली, दुर्गंधीयुक्त, ओंगळवाणे, आयुष्य जगणारी बेवारस व्यक्ती. भिकारीसदृश पण भीक किंवा अन्नपाणीही न मागता चिखली बसस्टँडवर पूर्वी सातत्याने आढळणारी. डीप डिप्रेशनमुळे कधीच एक शब्दही न बोलणारी. यांना अनेकांनी पाहिले असेल, हळहळलेही असेल मन; पण त्यांच्यासाठी काही करायची, ती कृतीत आणायची असोशी मात्र जागली ती आरती- नंदकुमार पालवे यांच्या मनात.
- प्रिया धारूरकर
आरती, धोत्रा बनगोजी या गावातून, तर नंदकुमार, पळसखेड सपकाळ या गावातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी चिखलीला जायचे. दोघांचाही एकाच रस्त्याने प्रवास. हळूहळू ओळख, मग मैत्री, मग प्रेम दृढ होत गेले. ते दोघेही रोजच या माऊली नावाच्या माणसाला पाहायचे. त्यांना पाहता पाहताच त्यांच्यासारख्या अनिकेतांसाठी, वंचितांसाठी मायेचा आधार होण्याचा संकल्प केला गेला. ‘माझे प्राण तुझे प्राण उरले ना वेगळाले’ म्हणत म्हणत नियतीला आव्हान देत आयुष्याच्या वेगळ्या वाटेवरचा त्यांचा प्रवास सुरू झाला. अर्थात, सुरुवातीला सासर-माहेर दोन्हीचा विरोध पत्करूनच वाटचाल करावी लागली. बाबा आमटेंच्या प्रेरणेतून, प्रकाश आमटे, गिरीश कुलकर्णी यांच्या नैतिक पाठबळावर एक संकल्पना आकाराला येऊ लागली होती.
सुरुवातीला रस्त्यावर सापडणारे बेघर, बेवारस, एड्सग्रस्त, मनोरुग्ण, असे कोणीही आढळल्यास त्यांना त्यांच्या गरजेच्या स्वरूपानुसार, अपनाघर- भरतपूर (राजस्थान), स्नेहालय-नगर, सेवाधाम-उज्जैन अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रकल्पात पोहोचवले जाई. मग असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा सरसकट सगळ्यांना सामावून घेणारे एक छत निर्माण करावे या मानसातून ५ वर्षांपूर्वी पळसखेडा हिरवे येथे सेवासंकल्पची स्थापना झाली. साधारणपणे सगळ्या वयोगटातील भारतभरातून आलेली एकूण २२ ते २४ स्त्री, पुरुष, बालक, वृद्ध येथे नांदतात. कोणताही आजार, कोणतीही समस्या येथे वर्ज्य नाही. रुग्णांचे केस कापण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक स्वछतेपर्यंत सारे ममतेने केले जाते.
संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही किंवा सरकारी अनुदानदेखील नाही. त्यामुळे नोकर ठेवणे परवडत नाही. रुग्णांच्या जखमांमध्ये पू, अळ्या झालेल्या असतात. त्यांनी घाण करून ठेवलेली असते. दुर्गंध येतो. आपल्याला हे असहनीय बघवलेसुद्धा जाणार नाही; पण आरती, नंदकुमार आणि समर्पित कार्यकर्ते आपले व्रत कोणताही बोलबाला न करता विनातक्रार पार पाडत असतात. तसेच गेल्या १० महिन्यांपासून स्वत:चे सर्वकाही सोडून आपल्या हृदयरोगाकडे दुर्लक्ष करीत अर्जुन गाढवेकाका पूर्णवेळ सेवाभावी होऊन येथे राहत आहेत. आरतीच्या कामात मदत करीत आहेत.
बुलढाणा, चिखली (शहर व ग्रामीण), असे उपक्रमाचे कार्यक्षेत्र आहे. देणगीदार व सदस्यांच्या मासिक देणगीवर अन्न, कपडे, औषधी व इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. एवढेच नाही तर लावारीश लाश म्हणून सरकारी इस्पितळात दाखल झालेल्या असंख्य रुग्णांचे अंत्यविधीदेखील संस्थेतर्फे पार पडले जातात. त्यावेळी कुठले ऋणानुबंध जुळत असतील परमेश्वरालाच ठाऊक. आश्रमाचे सारे व्यवस्थापन-नियोजन आरतीच बघते. तिचा एक-एक अनुभव शहारे आणणारा. महिलांच्या पाळीचे प्रॉब्लेम, त्यात हार्मोनल इमबालन्स होणार, मग कुठलेच भान नाही, अशी अवस्था; पण त्यांच्यावर न चिडता मायेने त्यांना सांभाळायचे. त्यांची स्वच्छता ठेवायची. ती सांगत होती स्किझोफ्रेनिक बुढीअम्मा तर अटॅक येतो तेव्हा मारतेही. मग तिच्या आईची भूमिका आरती पार पाडते. एरव्ही मात्र ही बुढीअम्मा खूप मायाही करते. माऊलीदेखील येथे येऊन सावरले आहेत. बोलत आहेत, राहणीमान सुधारले आहे. काही रुग्णांचे नातेवाईक सापडतात; पण ते त्यांना स्वीकारत नाहीत, अशा वेळी त्यांचे पालकत्व स्वीकारणे. त्यांना स्वयंपूर्ण बनवणे, त्यांच्या हाताला काम देणे. वृद्ध, बालक एकत्र असल्याचा फायदा म्हणजे वृद्धांना बालकांना सांभाळताना विरंगुळा मिळतो. सहकार्याची भावना निर्माण होते. मनाचा आजार हळूहळू कमी होतो. मन उभारी धरू लागते. मनोरुग्ण बरा व्हायला मदत होते. आई, बहीण, मुलगी, स्वयंपाकीण या भूमिका पार पाडत वेळ कसा जातो कळत नाही म्हणताना समाधानाने ती सांगत होती, त्यांचा मुलगा रुद्रदेखील मायाळू आहे. वृद्धांना तो देवबाप्पा म्हणतो. अशी ही माऊलीची माऊली होता होता अनेकांची माऊली होतेय. त्यांच्या कार्याला सलाम करीत सेवासंकल्पाला मदतीचे अगणित हात मिळोत, याच शुभेच्छा.
priyadharurkar60@gmail.com