बदलते मौसम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:04 PM2018-07-07T16:04:43+5:302018-07-07T16:05:32+5:30
ललित : काहीजण मात्र कायम अवघडून जगतात नवं स्वीकारताना अन् जुनं विसरतानाही! ऋतू बदलण्याासाठीच असतात हे ठावूक असूनही त्यांच्या मनाचा ऋतू मात्र बदलत नाही. भर पावसातही कोरडीठाक तर वसंतातही रुक्ष रखरखीत असते ही प्रजाती.
- ज्योती कदम
बदलते मौसमों की सैर मे दिल को लगाना हो..किसी को याद रखना हो किसी को भूल जाना हो.. हमेशा देर कर देता हूँ मैं..’ विलक्षण तगमग वाढवणाऱ्या या ओळींनी मन व्याकूळ होत असतानाच आठवणींचं गोकुळ मात्र मनात रेंगाळत गेलं. इतकं सोप्पं कुठे असतं कुणाच्या आठवणी जपणं किंवा कुणाला विसरून जाणंही..! मनाचा रंग कुठला असेल ते माहीत नाही; पण मनाचा रंग पाण्यासारखा असला की सोप्पं होतं सगळं. कुणी सोबत असो किंवा नसो, पण असं मन लाभलेली माणस मात्र मस्त मिसळत जातात सगळ्याच भोवतालामध्ये! त्यांच्या स्वत:चा एक भोवताल तसाच अबाधित ठेवून हे आणखी वेगळं विशेष.
काहीजण मात्र कायम अवघडून जगतात नवं स्वीकारताना अन् जुनं विसरतानाही! ऋतू बदलण्याासाठीच असतात हे ठावूक असूनही त्यांच्या मनाचा ऋतू मात्र बदलत नाही. भर पावसातही कोरडीठाक तर वसंतातही रुक्ष रखरखीत असते ही प्रजाती. इथे ओल शोधायची तर खोल उतरत जाव्या लागतात मनाच्या तळपायऱ्या सलग अविरतपणे.. अजिबात न कंटाळता. तरीही हाती चिमुटभरदेखील ओल येईल की नाही कुणास ठावूक! खूप निसरड्या वळणांची ही निसरडी वाट.. गहन अंधाराची... वळणावळणांच्या वळणावर कायमच वळत गेलेली. या वाटेवर प्रकाश पेरणं हाच एकमेव उपाय उरतो तेव्हा एखादा टिमटिमणारा स्नेहकाजवाही पुरेसा होतो या वाटेला प्रज्वलित करण्यासाठी, हे मात्र खरंच.
मनाच्या नितळ कुपीतून अलवार सांडत जाणारा निर्मळ स्नेह खरोखरीच किती चमत्कारिक असतो ना! काळोख्या वाटेवर उजेड पेरून अवघी वाट प्रकाशून टाकणारा. सगळा भोवताल अंतर्बाह्य चांदण्यात न्हावून टाकणारा..एखाद्या अवघड घाटाची वाट चढताना श्वासांचे थवे सुसाट सुटलेले असताना सभोवती दाटून येतं प्रगाढ धुकं.. फक्त आपण नि आपल्याभोवतीचं ते निरामय धुकं.. वेगळीच झिंग चढत जाते पावलांत..आसमंतात..
कणाकणांत.. मन गहिवरून येतं. श्वासांची लय सांभाळण्यासाठी जरासं मनाला सावरावं लागतं.. डोळ्यातल्या पाण्याला आवरावं लागतं आणि क्षर्णाधात धुकं विरतं..समोर तीच वाट, पण नव्या चकचकीत रंगासह आपलं स्वागत करीत असते. वळण येतं नि वळत जातं. हातात उरतात काही कण नितळ स्नेहाचे! अवघड वळणांवर धीर देणारा हा स्नेहाळ क्षण येतोच येतो, पण आपल्या मनाभोवती दाटून आलेलं हे धुकं आपल्याला पाहता यायला हवं बंद डोळ्यांनी! पापण्यांवरून अलिप्तपणाला कायमसाठी अलविदा म्हणता यायला हवं. तरच डोळ्यांना स्वागतशील होता येईल हे धुकं पापण्यांनी अलवार प्राशण्यासाठी!
मनाचं निवडुंग करणारी, घोर लावणारी अनेक वळणं येतात.. तरीही प्रवास सुरूच ठेवावा लागतो. कुठल्यातरी नव्या वळणावर तरल ढगांचा पुंजका तरळत जातो डोक्यावरून किंवा अलवार धुकं तळहाताला गुदगुल्या करीत विरळ होत जातं मनातून.. या सगळ्या राघववेळा झगमगून टाकतात वाटेला..चोवीस कॅरेटचा होत जातो प्रवास! मनाच्या दागिन्याची घडणावळ नाजूक नजाकतीने लपेटून टाकते जगण्याला.. न मळलेल्या पायवाटेवरून तुझ्यामागे चालत येणं हा बुद्धिमान्य राजमार्गच होता माझ्यासाठी..पळवाटांची भीती नव्हतीच कधी; पण तुला कायम असोशी या पळवाटांची. हे पावलांना आज उमगलंय..मोठ्ठा खड्डा पडलाय पोटात. समोरची सगळी वाट अंधुक दिसतेय.. कोणतं वळण केव्हा येईल कुणास ठावूक? पण पावलांची झिंग संपण्यापूर्वीच गाठायला हवं डोंगरापल्याडचं स्वप्नांचं गाव.. म्हणून अजूनही या वाटेवरचा प्रवास सुरूच आहे. सोबत वर्तमानाच्या कुपीत भरून घेतलेत मूठभर काजवे.. डोंगरावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यासोबत वाहत येतेय गंधवार्ता..स्वप्नातलं गाव काही अंतरावर असल्याची. परत तेच शब्द मनात घोळताहेत..‘बदलते मौसमों की सैर मे..’
( yotikadam07@rediffmail.com )