‘आस्थेचा परीघ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:46 PM2018-05-19T19:46:26+5:302018-05-19T19:47:48+5:30
वर्तमान : खेड्यातला तरुण शहरात आला, स्थिरावला. जगण्याला सुरक्षिततेची हमी लाभली की तो स्वत:चा परीघ आखूड करतो. भौतिक सोयीसुविधांचे कवच आणि मध्यमवर्गीय जीवन त्याला खुणावू लागते. मूलत: मध्यममार्गी, मध्यमवर्गीय होण्याकडे आमच्या समाजाचा कल अधिक म्हणून चौकटीतले कुटुंब आणि कुटुंबांच्या पलीकडे समाजात हस्तक्षेप न करणारे लोक आमच्याकडे आदर्श मानले गेले. या न्यायाने जगण्याने कूस बदलली की आमची समाजाप्रतीची इतिकर्तव्यता संपून जाते. आपण जेथून आलो तो समाज, ती माणसे आपल्याकडे आशाळभूतपणे पाहतात वगैरे याचा कधी साक्षात्कार आम्हाला होत नाही. स्वत:पुरते एक छोटेसे वर्तुळ निर्माण केले की त्यानंतर आम्हाला फारसे कुणाचे देणे उरतच नाही मुळी. आमच्या ‘आस्थेचा परीघ’ दिवसेंदिवस सुंकचित होत जातो. कारण आम्ही एका चौकटीत प्रायव्हेट लिमिटेड होऊन जगलो तरच आम्ही असतो बायको, मुलं आणि पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श; परंतु आमच्या परिघात आम्हाला उभी करणारी माणसे सामावलेली असली किंवा आम्ही मातीशी नाते टिकवून ठेवले, आमचे दोर घट्ट असतील गाव-शिवाराशी तर आम्ही तथाकथित मध्यमवर्गीय भाषेत असतो गावंढळ...!!
- गणेश मोहिते
यास्तव... आम्हाला आमच्या आस्थेचा परीघ कप्पेबंद करता आला एकदाचा की अंगाखांद्यावर खेळलेल्या माणसांशी नाते तोडून ‘चिपाट’ बनून जगता येते. मातीत राबराबून काळ्या ठिक्कर पडलेल्या मायबापांची लाज वाटून आम्हाला उखडून टाकता आले पाहिजे स्वत:च्या पांढरपेशी भावविश्वातून त्यांना बरहुकूम! आणि मानता आले पाहिजे सासरच आपले पंढरपूर. तेव्हा कलियुगी मोक्षप्राप्तीची शक्यता अधिक असते वगैरे. अशा काही रीतीभाती पाळता आल्या की आमचे मध्यमवर्गीय जीवन ओळंब्यात बसलेले दिसते समूहाच्या नजरेत आणि हेच एकरेषीय जगणे खुणावत असते उंबरठ्यावर उभे असणाऱ्या मागील पिढ्यांना. पुढे असाच मध्यमवर्गीय ‘पोकळ’ अवकाश निर्माण करण्यासाठी धडपडत असतो गावखेड्यातून शहरात आलेला प्रत्येक जण. एकदा या जीर्ण परंपरेचा ‘पाईक’ बनून चिटकली माणसे की आपली मूळ तोडून स्व:च्या वतुर्ळात धडपडत राहतात आयुष्यभर. हे गोळीबंद तकलादू ‘आयुष्य’ बनत नाही कधीच ‘झाड’. त्याच्या सावलीचा ना वाटतो कोणाला आधार ना कोणी घेऊ शकतो तिथे विसावा. ते उरतात फक्त ‘चिरुगट’ म्हणून. त्यांचा ‘ठिगळा’साठीही होत नाही उपयोग. म्हणून वाट चुकून बाहेर पडलेल्या अशा असंख्य रस्त्यांवरच्या पाऊल खुणांवर गावाने ही कधी आपला हक्क सांगितल्याचे आताशा दिसत नाही.
खरे तर स्वातंत्र्यानंतर शिकलेल्या पहिल्या, दुसऱ्या पिढीने गाव सोडल्यानंतरही बऱ्यापैकी सांभाळला होता समतोल. अठरा विश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाप्रतीची ‘करुणा’ किमान जपली होती काळजाच्या कोपऱ्यात. आपल्याप्रमाणे बदलावा सगळ्यांचा ‘काळ’ म्हणून काका, मामा बनून खाल्ल्या होत्या खस्ता रात्रंदिन; मागच्यांचीही बदलावी जगण्याची दिशा म्हणून. नात्यागोत्याल्या असंख्य लेकरांबाळांच्या शिक्षणाचा भार उचलला त्यांनी शहरात. त्याकाळी वाटले या पिढीला आपल्या समृद्धीची मुळे खोलवर जावीत; म्हणून केली त्यांनी धडपड आणि त्यातून उभी झाली असंख्य कुटुंबे अन् शेती-मातीत दिसल्या प्रगतीच्या खाणाखुणा गावोगाव; परंतु अलीकडच्या काळात चिणले गेलेत हे संस्काराचे बुरूज. उंडरलेल्या बैलासारखे जो तो उकरतो ‘वारूळ’ आणि उधळतो ‘माती’ आपल्याच माणसांच्या अंगावर बेमालूमपणे. माती आणि नाती दोन्हीतली आटत गेली ओल. चिखलाच्या ‘टिरी’सारखी झाली नाती, दुष्काळ पडला आपुलकीचा.
शहर आणि गाव असा आता उरलाच कुठे भेद. मध्यमवर्गीय होण्याची धडपड सारखीच दोन्हीकडे. चकचकीत जीवनशैलीने पोखरली आमची मने. लहान-मोठे, नातीगोती, मान-सन्मान संपला; उरला फक्त व्यवहार बाजारात. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ म्हणत आम्ही झालो ‘पाश्चाराईज्ड’. अंधानुकरणाच्या लाटेत बदलून घेतले आम्ही स्वत:ला अंतर्बाह्य. म्हणून सुटीतही कधी तरी आम्हाला दिसत नाहीत गावाची शीव, उलट खुणावू लागतात थंड हवेची ठिकाणे. कारण आमच्या जगण्यातले उन्हाळे-पावसाळे बदलून गेलेत आपसूक. बुडाला लागू नये माती म्हणून घेतो आम्ही काळजी बसताना जागेची. जागा बदलली की वर्तन बदलते तसा हा नियमच. लहान वयात उन्हाळपाळीत बापाच्या औतावर दगडाऐवजी बसताना लागले नाही ऊन. उन्हातल्या बापाच्या येरझाऱ्या आणि घामाच्या धारा तेव्हा नक्कीच करून गेल्या असतील अस्वस्थ; पण आज डोळ्यावरच्या इम्पोर्टेड गॉगलमधून टिपणार कसा आपल्यासाठी ढेकळात राबलेल्या बापाच्या चेहऱ्यावरचा सुरकुत्यातला करुण भाव...
सगळे कसे आपोआप बदलते; सप्तपदी चालून झाल्यानंतर उरतोच कुठे तुला स्वत:चा अवकाश. नव्याच गराड्यात अडकतो तुझा पाय. तसे तुला विचारतोही कोण म्हणा? तुला गृहीत धरूनच बदलतो तुझ्या आस्थेचा परीघ. नव्या परिघात कुठे असतो स्पेस तुझ्यासाठी बारमाही राबलेल्या माणसांकरिता. त्यांचे कष्ट, त्याचे झिजणे सगळे कसे मातीमोल ठरते; तुझ्या नव्या दुनियेत. गरजांच्या पलीकडे त्यांना उरत नाही किंमत, वेळप्रसंगी तुझ्याकडूनच मुकाट्याने लावली जाते बोली त्यांच्या कोरभर भाकरीची. हाकलावीत गुरे कोंडवाड्यात तशी डांबली जातात तुझीच माणसे तुझ्या अडगळीच्या खोलीत शहरात; तुझ्या मूकसंमतीने. फोडलाच त्यांनी टाहो येता-जाता कुणाजवळ, तर दाखवला जातो परतीचा रस्ता त्यांना गावचा. अगदीच हंगाम बदलवा तसा बदलला माणूस म्हणून, खचतो त्यांचा जीव; पण बोलणार कसे?
‘आपलेच दात अन् आपलेच ओठ’ म्हणून गिळतात आवंढा तुझ्या पराभूत नजरेकडे पाहून. काही काळात हाय खाऊन जातात बिचारी दूर देशी. बातमी धडकताच तू मात्र स्टेटस अपडेट करतोस काही सेकंदात. स्वत:च टाईपून संदेश अमुकतमुक यांचे दु:खद निधन झाले, इतक्या तितक्या वाजता अंतविधी अमुकतमुक ठिकाणी होईल वगैरे वगैरे. अगदी ‘बोल्ड’ करून पाठवतोस मित्रमंडळीच्या वॉटस्अॅपवर खाजगीत; समूहात प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने. अगदी फेसबुकवरही कंठ आवरून काही सेकंदांत तुझ्या अतीव दु:खाची पोस्ट फोटोसह टाकण्याचे असते तुला भान. इतकेच काय अंतविधीपर्यंत किती लाईक किती कमेन्ट पाहण्याइतपत ही पिढी सजग झाली मायबाप हो! म्हणून... काळजी नसावी. तुमच्या फोटोसह तीच जुनी पोस्ट फेसबुक वगैरे स्मरण करून देत राहील कायम तुमच्या वारसाला सालोसाल. तुमच्यावर नव्याने चार शब्द खर्च करण्याचे कष्टही वाचतील त्याचे तंत्रज्ञान हातात असल्याने; तुम्ही फक्त किती काळ बदलला इतकेच म्हणू शकता... बाकी तक्रार करण्यास तुमच्या हातात उरले काय..!!
( dr.gamohite@gmail.com )