शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:56 PM2018-06-05T12:56:39+5:302018-06-05T12:58:07+5:30
विश्लेषण : ११ आणि १२ मे रोजी दोन समुदायांत झालेल्या या दंगलीपासून आजही जुन्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलीची धग शांत होण्यापूर्वीच काही लोकांनी चक्क आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून तलवारी, चाकू, जांबिया आणि अन्य शस्त्रे खरेदी केल्याचे समोर आले. ३१ मे रोजी रात्री एका तरुणाने रिक्षाचालकावर गोळ्या झाडल्या. गुन्हेगाराची प्रेयसी असलेल्या महिलेच्या घरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली. एका तरुणाचे अपहरण करून त्याचे अवयव कापून फेकून देण्यात आले. एवढेच नव्हे तर शहराच्या वेगवेगळ्या भागांत चाकूचा धाक दाखवून लुटमार आणि हाणामारीत शस्त्रांचा वापर होणे नित्याचेच झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचे दिसून येते.
- बापू सोळुंके
ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. वाढत्या औद्योगिकरणासोबतच शहराची लोकसंख्या आणि गुन्हेगारीही झपाट्याने वाढत आहे. घराबाहेर पडणारा माणूस सहीसलामत घरी परत येईल का, अशी धाकधूक प्रत्येकाच्या मनात घर करीत आहे. याला कारणीभूत आहे सहा महिन्यांत शहरातील बिघडलेले वातावरण. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद १ जानेवारी रोजी औरंगाबादेत उमटले आणि शहरातील विविध वसाहतींत दंगल भडकली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना तीन दिवस लागले. फेबु्रवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यामुळे गारखेडा, सिडको-हडकोमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. तिसरी दंगल कचरा टाकण्यावरून मिटमिटा येथे, तर चौथी दंगल ११ आणि १२ मे रोजी किरकोळ कारणावरून जुन्या शहरात झाली.
११ आणि १२ मेची दंगल सर्वाधिक चिंता करणारी आहे. या दंगलीने दोन समुदायांतील लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण केला. दंगलीत दोन जणांचे बळी गेल्याने उभय कुटुंबांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. ही दंगल दोन दिवसांत नियंत्रणात आणली.
या दंगलीनंतर शहरात घडणाऱ्या घडामोडींनी पोलिसांची चिंता वाढली. हिलाल कॉलनीतील एका कुख्यात गुन्हेगार बबलाने तरुणाचे अपहरण करून त्याची कू्ररपणे हत्या केली. आरोपींनी तरुणाचे लिंग आणि पोटातील आतडे कापून प्रेत विहिरीत फेकले. थरकाप उडविणाऱ्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. एवढेच नव्हे तर खुनी बबला घटनेनंतरही पोलिसांना फोन करायचा, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच नसल्याचे दिसून आले. तिसऱ्या खुनाच्या आरोपात पोलिसांनी बबलाला अटक केली असली, तरी त्याची प्रचंड दहशत हिलाल कॉलनी आणि आसेफिया कॉलनीत आहे.
दंगलीची धग शांत होत असतानाच शहरातील विविध ठिकाणाच्या तरुणांनी आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून शस्त्रे खेरदी सुरू केल्याचे समोर आले. यातील काही तरुणांना गुन्हे शाखेने पकडले आणि त्यांनी मागविलेली सुमारे ३१ शस्त्रे जप्त केली. यात धारदार १२ तलवारी, चाकू, जांबिया, कुकरीसह अन्य शस्त्रांचा समावेश होता. आॅनलाईन शस्त्रे खरेदीने पोलिसांची झोपच उडाली. ही शस्त्रे वेगवेगळ्या तरुणांनी खरेदी केली असून, त्यांचा ऐकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा पोलिसांचा आहे. असे असले तरी त्यांना ही प्राणघातक शस्त्रे खरेदी करावी का वाटली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. आॅनलाईन शस्त्रे खरेदीचा प्रथमच पर्दाफाश केला असला तरी अशाप्रकारे आॅनलाईन शस्त्रे खरेदी यापूर्वीही झाले असू शकतात. आता किरकोळ घटनांमध्येही चाकू-सुऱ्याचा वापर होताना दिसतो.
गुन्हेगाराशी संबंध असलेल्या एका महिलेकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगले असावे असा पोलिसांना संशय आहे. महिनाभरात घडलेल्या या घडामोडीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजले. या पार्श्वभूमीत शहरात रुजू झालेले नवनियुक्त पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना आता ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदप्रमाणे कृती करून दाखवावी लागेल आणि तसे करण्यात ते यशस्वी झाले तरच धगधगत्या औरंगाबादकरांची मने त्यांना जिकंता येतील.