खुल्या कारागृहातलं बंदिस्त गाणं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:17 PM2018-04-16T19:17:39+5:302018-04-16T19:19:43+5:30
लघुकथा : बोलण्याच्या नादात आम्ही जेलचा चारपाच एकरचा परिसर तुडवून कधी मारुती मंदिरात आलो कळलेच नाही.आम्हाला बघताच एका कैद्याने मंदिराच्या पुढं मोकळ्या जागेत सतरंजी टाकली. मघापासून आमच्याकडे पाहत उभ्या असलेल्या तीनचार जणांना साहेबांनी सतरंजीवर बसण्याची खुण केली.
- हंसराज जाधव
नमस्कार... नमस्कार! या सर कसं काय अचानक आज? खुर्चीवर बसण्याची खुण करीत जेलरने प्रश्न केला.
‘सर, हे प्रा. मोरे. औरंगाबादला असतात. चांगले गायक आहेत, गीतकार आहेत आणि आमचे मित्र आहेत.ते अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी मोफत कार्यक्रम देतात. मी म्हटलं, आमच्या पैठणच्या खुल्या कारागृहात द्या एक कार्यक्रम. त्याकरता आपल्या भेटीला घेऊन आलोय यांना.’ प्रा.गव्हाणेंनी खुलासा केला.
‘अरे व्वा! गुड. छानच की! चांगली मेजवानी मिळेल मग आमच्या कैद्यांना! कधी करताय कार्यक्रम? तुमच्या सोयीप्रमाणे घ्या तारीख. आम्ही काय चोवीस तास इथेच आहोत.‘जेलरने खुल्या मनाने परवानगी दिली.
‘आमच्याकडेही असे कलाकार आहेत हो काही. पेटी वाजवतात, गाणी म्हणतात, भजनं म्हणतात. पंधरा आॅगस्ट,सव्वीस जानेवारीला करीत असतात काही तरी सादर!’
जेलरने कारागृहात कलाकार आहेत म्हटल्याबरोबर मी थोडा उत्साही झालो.जेलरच्या मोकळेपणाचा फायदा घेत त्यांना म्हणालो, ‘ साहेब, त्यांना भेटता येईल आम्हाला?’
‘व्हाय न्वाट?’ म्हणत सेकंदाचीही उसंत न घेता बेल वाजवली तसा शिपाई आत आला.
‘अरे,आपल्याकडं ते भजनंबिजनं म्हणणारे जे कोणी तीनचार जण आहेत ना त्यांना बोलावून घे लवकर. तिथं मंदिरात बसव.आम्ही आलोच!’
बोलण्याच्या नादात आम्ही जेलचा चारपाच एकरचा परिसर तुडवून कधी मारुती मंदिरात आलो कळलेच नाही.आम्हाला बघताच एका कैद्याने मंदिराच्या पुढं मोकळ्या जागेत सतरंजी टाकली. मघापासून आमच्याकडे पाहत उभ्या असलेल्या तीनचार जणांना साहेबांनी सतरंजीवर बसण्याची खुण केली. नेहमी साहेबापुढं मान खाली घालून आदबीनं उभं राहणारे, साहेबांचा आदेश मानून बसले सतरंजीवर एका कोपऱ्यात. साहेबांनी त्यांच्याकडं पाहत बोलायला सुरुवात केली,
‘हे बघा, हे सर औरंगाबादवरून आलेत .त्यांना एक संगीत कार्यक्रम करायचा आहे आपल्या इथे तुमच्यासाठी. तुम्हा तीनचार जणांना त्यातली आवड आहे म्हणून तुम्हाला बोलावलं...
मी त्या तिघांकडे पाहत राहिलो. संगीताचा विषय निघाल्यामुळे ते थोडे सावरून बसले. सुरुवातीचा बुजरेपणा जाऊन थोडे रिलॅक्स झाले. तरीही जेलरसाहेबाची थोडी अडचण होतीच. ‘सर,तुम्ही बसा. मी काही कामं आटोपतो आॅफिसमधले!’ असं म्हणून जेलर निघून गेले. जेलर गेल्याचा फायदा घेत एकाने तात्काळ ‘सर, हार्मोनियम आणू का आतून?’ म्हणत उत्तराची वाट न पाहता मंदिरातून हार्मोनियम आणली. हार्मोनियम आणणारा हळूच माझ्या कानाजवळ कुजबुजला,
‘सर,हा फार छान गातो बरं!’ त्याने निर्देश केलेल्या कैद्याकडे हार्मोनियम सरकवत मी म्हणालो, ‘मी तर कार्यक्रमात गाणारच आहे; पण तुम्ही ऐकवा काहीतरी आज!’
मघापासून अबोल असलेला,जे काही चाललंय ते शांतपणे ऐकत असलेला तो. त्याने हार्मोनियमसमोर आल्याबरोबर नमस्कार केला आणि बोटं टाकले. काळी दोनची स्केल पकडली आणि गायला सुरुवात केली,
‘एक राधा एक मीरा
दोनोने शाम को चाहा
अंतर क्या दोनो की चाहा मे बोलो...’
हार्मोनियमवर त्याचे बोटं अगदी लीलया खेळू लागली. डोळे लावून तो अगदी मंत्रमुग्ध होऊन गात होता.भाता मारता मारता उडणारा त्याचा डावा खांदा डावीकडे झुकलेल्या मानेला अधूनमधून लागत होता तरी त्याची तंद्री भंगत नव्हती.गोड आवाजाला असलेली रागदारीची जोड रंगत वाढवत होती. त्याचा आवाज ऐकून बराकीतले बहुतेक कैदी मंदिराच्या समोर येऊन गाणं ऐकू लागले. तो सर्वांना विसरून बेभान होऊन गाऊ लागला. गाणं संपल्यावरच त्याने डोळे उघडले. मी नि:शब्द झालो. त्याच्या गायकीची कशी दाद द्यावी हेच मला कळेना. शांततेची कोंडी फोडत एक कैदी म्हणाला,
‘सर, हार्मोनियम हातात आली की हा असाच बेभान होतो. नुसता गात राहतो डोळे लावून.’ मी स्वत:ला सावरत हळूच विचारले,
‘काय नाव तुमचं?’
‘राजेंद्र उत्तरवार,बंदी क्रमांक १०९२’
सवयीप्रमाणे त्याने उत्तर दिले.
‘काय गाता हो तुम्ही! कोणता दर्द भरलाय आवाजात?आणि कैदी कसे झालात?’
माझ्या मनात आलेले असंख्य प्रश्न त्याच्या कानावर आदळले. तो शांत होता. त्याने एक हलके स्मित केले;पण काही बोलला नाही. बसल्या बसल्या त्याची बोटं परत हार्मोनियमवर खेळू लागली पण ती भैरवीच्या रागात! मी पटकन हार्मोनियमवर हात ठेवला. भैरवीचे स्वर थांबले. मी थोडा दबकतच बोललो,
‘नका हो भैरवी घेऊ एवढ्या लवकर. खूप गायचंय तुम्हाला अजून. ऐकवायचंय साऱ्यांना’ मी त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याने सोबतच्या कैद्यांकडे पाहिले. एक दीर्घ श्वास सोडला आणि माझ्याकडे पाहत बोलू लागला,
‘नको सर हे आता. या सगळ्यापासून फार लांब गेलोय मी!’
‘पण का लांब गेलात?’ मी
‘तुम्हाला काय सांगू? ...आॅर्केस्ट्राच्या कार्यक्रमानिमित्त मी महिना महिना बाहेर राहायचो. बायको माझ्यावर शंका घ्यायची.. झालं.. जाळून घेतलं एक दिवस स्वत:ला.. ती गेली बिचारी! सुटली ..पण मला अडकवून! सर,..या संगीतामुळं माझी बायको गेली! ..पण खरं सांगू तुम्हाला.. संगीतामुळं बायको गेली याचं दु:ख नाही हो मला, बायकोमुळं संगीत तुटलं याचं जास्त दु:ख आहे,बस्स!’
सतरंजीवरून तो उठला. हार्मोनियम तशीच सोडली आणि नीट बराकीकडं निघाला. मी त्याच्या पाठमोऱ्या चालीकडे नुसता पाहत राहिलो..
(hansvajirgonkar@gmail.com)