नगरसेवका, शपथ तुला आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:29 PM2018-06-16T18:29:30+5:302018-06-16T18:30:40+5:30
विनोद : देश महासत्ता होण्याची चर्चा असताना आपल्या गावाचा मात्र पत्ता हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पाण्याने मजबूत होत असते, असे आम्ही ऐकून होतो; पण सिमेंटचे रस्ते पाण्याने वाहून जाण्याचा चमत्कारही आम्ही पाहिला आहे.
- आनंद देशपांडे
प्रिय नगरसेवका, आज तुला शपथा घालायच्या आहेत. तत्पूर्वी, त्रिवार अभिनंदन!!! तीन-चार वर्षांपूर्वी केवढ्या मोठ्या गदारोळात किती कौशल्याने निवडून आलास तू, शाब्बास. धुळीने भरलेल्या रणांगणावरून तू बरोबर आपला घोडा पुढे काढलास आणि विजयाचे शिखर काबीज केलेस, हार्दिक अभिनंदन! असाच मोठा हो, पुढे अध्यक्ष हो, महापौर हो, आमदार, खासदार, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हो; पण तत्पूर्वी, एकदा आपल्या गावाकडे बघ. गाव वर्गणी काढून जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे, अशा अवस्थेला येऊन पोहोचले आहे. रस्त्यातील प्रत्येक खड्डा तुझ्याकडे आशेने पाहत आहे.
नळांच्या रिकाम्या तोट्या तुझ्या विरहात अश्रू ढाळणे विसरून गेल्या आहेत. तू निवडून आल्याच्या आनंदात गटारे बारोमास वाट फुटेल तिकडे वाहत आहेत, कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र फुलून आले आहेत, दलदल आणि उकंडे यांच्यावर डुकरांचा, डासांचा सुखनैव संचार आहे. तुटलेल्या रस्त्यांवर वाहने चालविताना खिशात इन्शुरन्सची पॉलिसी आणि डोळ्यात तेल घालून राहावे लागत असल्यामुळे कित्येकांचे चष्म्याचे नंबर बदलले आहेत. लोकांना खड्ड्यांमुुळे पाठीची दुखणी मागे लागली आहेत. पाठीची दुखणी ‘मागेच’ लागतात, पुढे लागू शकत नाहीत, असा विनोद करून हसण्यावर नेऊ नकोस.
धुळीमुळे कित्येक बालकांना खोकल्याचे विकार जडले आहेत. दमेकऱ्यांत तर घराबाहेर पडण्याची हिंमतच उरलेली नाही. रस्त्यावरच्या दिव्यांनी केव्हाच ‘राम’ म्हटलेले आहे. या गावचा नागरिक आपली वाटचाल अंधारात ठेचकाळत करीत आहे. देश महासत्ता होण्याची चर्चा असताना आपल्या गावाचा मात्र पत्ता हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पाण्याने मजबूत होत असते, असे आम्ही ऐकून होतो; पण सिमेंटचे रस्ते पाण्याने वाहून जाण्याचा चमत्कारही आम्ही पाहिला आहे. अग्निशमन करणाऱ्या गाड्यांचे चारही टायर ‘बसल्यामुळे’ तेथील कर्मचारीही ‘बसून’ आहेत.
दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या वसाहतींमध्ये पावसाळ्यात सायकलही जात नाही, अशी परिस्थिती आहे. येथील नागरिकांना कुणाकडे पाहावे हे समजत नसल्यामुळे ते एकमेकांकडे पाहत आहेत. नळाच्या जोडण्यांपैकी अवैध किती आणि वैध किती याचा हिशोब या जन्मीतरी जुळेल असे वाटत नाही. अवैध कनेक्शनला मोठी धार आणि नळपट्टी भरणाराकडे पाणी नाही ही परिस्थिती आम्ही तुला सांगायला नको. त्या नागरिकांच्या आसवांनी बकेटी भरल्या तरी नळाला थेंबभरही पाणी येत नाही. सार्वजनिक बागा या भयावह आणि पडक्या वाड्यासारख्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. काय सांगावे आणि किती सांगावे?
पूवीर्ही अशीच परिस्थिती होती. अशी दुर्दशानामक परिस्थिती आणि बिकट नावाची भीषण वाट आम्ही चालत असताना तू आलास. तू आलास तेच सुहास्यवदनाने आणि जोडलेल्या हातांनी. प्रचार सभांमधून तू आमच्याच समस्या मांडल्यास. या गावाचा कायापालट करण्याचा तू निश्चय केलास. गावाला स्वच्छ व सुंदर करण्याची प्रतिज्ञाच घेतलीस. आमच्या आशा पल्लवित की काय म्हणतात त्या झाल्या. बस, साऱ्या दुखण्यावरचा अक्सीर इलाज सापडला होता. तुला निवडून द्यायचे होते, ते आमचे कर्तव्य आम्ही केले; पण गत तीन-चार वर्षांत काहीही झालेले नाही.
तू प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची तुला आठवण करून देण्यासाठी आज तुला शपथा घालायच्या आहेत, तर सज्ज हो शपथांच्या माळा घालून घेण्यासाठी. तुला खड्ड्यातून जाताना पिळवटून निघणाऱ्या आतड्यांची, शपथ आहे. तुला रस्त्यावरचे आघात सहन करणाऱ्या टायर ट्युबांची. नळाच्या कोरड्या तोट्यांची आणि घरोघर वाजणाऱ्या रिकाम्या भांड्यांचीही तुला शपथ आहे. रस्त्यावरील विझलेल्या दिव्यांचीही तुला शपथ आहे. सार्वजनिक बागांमध्ये उत्साहाने येणाऱ्या बालकांच्या निरागस हास्याचीही तुला शपथ आहे.
गावातील धुळीच्या प्रत्येक कणाची, वाहणाऱ्या आणि तुंबलेल्या गटारांची, फुटलेल्या कचराकुंड्यांची, बंद पडलेल्या घंटागाड्यांची आणि अग्निशामक वाहनाची, जन्म-मृत्यू नोंदणीच्या रजिस्टरची, गावातील पिसाळलेल्या कुत्र्यांची, पाण्यामधील ब्लिचिंग पावडरची, पाणीपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त मोटारींची, वारंवार फुटणाऱ्या बंधाऱ्यांची, कारंजासमान चौफेर वाहणाऱ्या जलवाहिन्यांचीही तुला शपथ आहे. शपथ आहे तुला रोगराई पसरविणाऱ्या जंतूंची, डासांची, माशांची आणि चिलटांचीसुद्धा.
शपथा संपल्या म्हणून हाश्श-हुश्श करू नकोस. शपथ आहे तुला बांधकाम परवान्यांसाठी घातलेल्या फेऱ्यांची, नाट्यगृहातील मोडलेल्या खुर्च्यांची, दवाखान्यातील तुटलेल्या खाटांची, स्मशानातील मोडलेल्या हापशाची, अस्वच्छ आणि बकाल मंगल कार्यालयाची, गावातील सर्व पुतळ्यांची आणि त्यांच्या खांद्यावर बसणाऱ्या पाखरांचीसुद्धा. बाप रे, आम्हीच थकलो. तू असा सुहास्यवदनाने पाहत राहिलास, तर भीती वाटते. हे असेच चालू राहिले, तर पापी माणूस मेल्यानंतर देव त्याला नरकात पाठविण्यापेक्षा आपल्या गावात राहण्यास पाठवतील. नरकानंतर कोणते स्टेशन असते रे भाऊ? त्या स्टेशनचीसुद्धा तुला शपथ आहे.
( anandg47@gmail.com )