बोंडअळी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:23 PM2018-02-10T19:23:55+5:302018-02-10T19:25:46+5:30
लघुकथा : दोन दिवसांपासून आभाळ भवू लागलं होतं. कधी नाही ते मृगात पाऊस पडला होता. बापूराव शिंदेनं रानाचा उदीम केला होता. त्याला कहाचा दम पडते. तरी त्याची बायको शशिकला म्हणाली, ‘अहो! दोन-तीन पाणी पडू द्या. मगच कापसाची लावगण करावं.’ आलमारीतून कापसाच्या थैल्या काढत बापूराव म्हणाला, ‘मिरगातलीच लावगण साधत असते.’ पुन्हा शशिकला काहीच बोलली नाही. बापूरावाच्या तीन पोरी अन् शशिकलामुळे पटकन लावगण आटोपली होती.
- महेश मोरे
रान ओलं होतं. त्यामुळे टळटळीत कापूस निघाला होता. बापूरावचा शेजारी नरसिंगाने लावगण केली होती. पणिक त्याचा कापूस उगवला नव्हता. बी-बियानेवाल्या कंपनीनं त्याला फसवलं होतं. त्याचं मन त्याला आतल्या आत खाऊ लागलं. बापूरावचा कापूस वार्याला लागला होता. पुढे जे बखाड पडली. पाऊस काही पडत नव्हता. ऊन तापू लागलं. शशिकला तिन्ही पोरीसंग कापसाला पाणी टाकू लागली. दौलतरावच्या विहिरीतून बापूराव घागरीनं पाणी आणू लागला. रानाचा उन्हाळा झाला होता. पुन्हा दुबार पेरणीचं संकट आलं होतं.
वीस दिस लोटल्यावर पाऊस पडला होता. बापूरावनं दुबार लागवण केली. पाऊस चांगला पडला होता. माळरानं हिरवीगार झाली होती. त्यानं कापसाला पाळी दिली. कापसाची वाढ होऊ लागली. शिकलेल्या बापूरावला कोणतं औषध कव्हा फवारायचं हे माहीत होतं. त्यानं कापसाला बायर कॉन्फिडोर हे औषध फवारलं होतं. पुढच्या फवारणीला १९-१९ खताचा पुडा औषधात मिसळायला तो विसरला नव्हता. बापूराव वखर पाळी देऊ लागला. कापसाची वाढ होऊ लागली. शशिकलानं पोरीसंग सुटीच्या दिशी कापूस निंदला. डी.ए.पी. खत टाकलं.
बापूराव फवारण्यावर फवारण्या करीत होता. त्यानं बायर एन्ट्राकॉल फवारून कापसाला बुरशी लागू नाही म्हणून काळजी घेतली. अजून त्याच्या डोक्यात रिजेन्ट, पोलो, कोराजन, मिसाईल फवारायची धमक होती. पुन्हा पोटेश, युनिया खताचा डोस दिला होता. त्याचा कापूस गावात उजवा होता. त्याच्या कापसासारखा कोणाचाच कापूस नव्हता. कापसाला फुलपाते गच्च लागली होती. हिरव्या कापसाकडं पाहून त्याचं मन झोके घेई. घडीभर आभाळात जाई. पुन्हा बापूराव उल्हासानं कामाला लागला.
बापूराव प्रत्येक पिकाला लेकरावनी जपायचा. पिकाकडं बघून त्याला हुरूप येई. पातं गळू नाही म्हणून त्यानं बोरान फवारत होता. इतक्यात शेजारी नरसिंग उभ्या-उभ्याच म्हणाला, ‘किती फवारण्या करतूस, झाली की आता कर्जमाफी,’ पाठीवरचा पंप खाली ठेवत बापूराव म्हणाला, ‘खरं हाये पनिक तो फार्म तुला भरता येतो का? सोळा कॉलम हायेत. तुला नको त्याचा पुळका हाये, हिताचा गुज्या अन् भोक बुज्या.’
‘तुला तरी भरता येतो का?’
‘मलाच काय भल्या-भल्याले भरता येत नाही.’
‘भरून घेऊत कोणाकडून तरी, पनिक हे लबाडाचं जेवण जेवल्याबिगर खरं न्हाई.’
‘जाऊ दे ! कोणावरच इसंबून राहू न्हाई. त्यांनी आपल्या कोपराला गूळ लावलाय.’
नरसिंग खाललाकडे निघून गेला. बापूराव वरलाकडं फवारत निघाला. बापूराव अन् शशिकला कोणाच्या अध्यात न मध्यात. आपलं शेत भलं अन् काम भलं. दोघालाही वाटू लागलं कापसाचा उतार आला तर आवंदा मीनाचं उरकून टाकावं. आता मधीन ऊन पडू लागलं. कापसावर कोठ-कोठ फकडी पडू लागली.
हिवाळा सुरू झाला होता. कापसाचे घाटर फुटू लागली अन् बोगस बियाण्यानं आपलं रूप दावलं. सगळ्या कापसावर बोंडअळी पडली. चवकड बोंडअळी दिसू लागली. बापूराव खाललाकडून वरलाकडं जाऊन आला. त्याला सर्वदूर बोंडअळी दिसली. बापूरावाच्या अंगाचा थरकाप वाढला, त्याला कापरं भरलं होतं. कंबरत वात आल्यावनी झालं. आवसानघातकी संकटानं खिळून पडला होता.
( maheshmore1969@gmail.com )