गर्दीच गर्दी चोहीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:33 PM2018-05-05T18:33:11+5:302018-05-05T18:35:23+5:30
विनोद : लोकसंख्येची परिस्थिती नागरिकांना सतत कळत राहावी या हेतूने प्रत्येक चौकात त्या क्षणाची देशाची लोकसंख्या दाखविणारी घड्याळे बसविण्याची एक योजना ठरली होती पण ती पुढे बारगळली.
- आनंद देशपांडे
आपल्या देशाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणून तुम्ही जाती धर्मांची विविधता किंवा अनेकतामे एकता वगैरे बऱ्याच गोष्टी सांगाल; पण आम्हास त्या मान्य नाहीत. ‘जाल तिथे गर्दी’ हे एकमेव वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचे. क्वचित कधी बसस्थानकावर जाल आणि अगदी शुकशुकाट दिसला तर तुम्ही घाबरून जाल. शहरात कुठे दंगल उद्भवली आहे का याचा शोध घ्याल. कर्फ्यू लागला तरी पाच पन्नास लोक असायचेच रस्त्यांवर. रेल्वेस्टेशन हे तर बारमाही हमखास गर्दीचे ठिकाण आहे. लोंढेच्या लोंढे उतरत असतात आणि तेवढेच पुन्हा गाडीत चढत असतात. आपली उत्पादन क्षमता (म्हणजे प्रोडकटिव्हिटी असे तरुण लोकांनी वाचावे, शिवाय तरुण मंडळी मराठी भाषेशी कनेक्टेड राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या लेखकांच्या यादीत आमचे नाव खूप वर आहे याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी, ही विनंती) इतरत्र काय असेल ते असो, लोकसंख्येच्या बाबतीत मात्र ती उच्चतम पातळीवरच आहे याचा अभिमान व्यक्त केल्यावाचून राहावत नाही.
आपल्या देशातून ते लोकसंख्या कमी करण्याचे जे काय खाते होते ते बंद झालेले दिसतेय बहुतेक. फार फार वर्षांपूर्वी ‘हम दो, हमारे दो’ अशी काहीशी प्रसिद्धी असावयाची. आज मात्र प्रत्यक्षात मोटारसायकलवर जाणारे जोडपे दिसले तर दोघांच्या मध्ये दो आणि तिसरे पेट्रोल टाकीवर बसलेले दिसते. असे टू प्लस थ्री जोडपे दिसले की, मला त्यांना थांबवून म्हणावेसे वाटते की, ‘बाबानो आतातरी पुरे करा, देशाचा विचार करा, काहीच नाहीतर त्या बालकांचा तरी विचार करा’. दर तासाला नव्हे तर दर सेकंदाला असंख्य आधार कार्डांना जन्म देणारा आपला देश महानच म्हणावा लागेल. लोकसंख्येची परिस्थिती नागरिकांना सतत कळत राहावी या हेतूने प्रत्येक चौकात त्या क्षणाची देशाची लोकसंख्या दाखविणारी घड्याळे बसविण्याची एक योजना ठरली होती पण ती पुढे बारगळली.
बहुधा लोकसंख्येची वाढ ही घड्याळाला न झेपणाऱ्या वेगाने होत असल्यामुळे ती रद्द करावी लागली असेल असा आमचा कयास आहे; पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून दोन अपत्य असणाराच्या घरी असे एक घड्याळ बसविले पाहिजे अशी आमची सूचना विचारात घेण्यासारखी आहे.
या गर्दीमुळे माणसाचं आय मीन एकंदर मानव जातीचं (असं लिहिलं की, कसं आपण जागतिक पातळीवरचे लेखक होतो) अवघडच आहे. इकडे प्राण्यांमध्ये होतं काय की कोणत्याही डेअरी फार्मवर साधारण शंभरेक गाई आणि चाळीसेक वासरे असतात. गाई संध्याकाळी चरून परत येतात त्या अगदी हंबरतच. त्यांना गोठ्यात बांधले की दूध काढण्यासाठी वासरे सोडली जातात. (प्रत्यक्षात वासराने लुचल्याशिवाय त्यांना पान्हा फुटत नाही, म्हणून त्यांना काही वेळासाठी सोडले जाते). सुटलेली वासरे सुसाट वेगाने आपापल्या आयांकडे धावत जातात आणि गम्मत म्हणजे न चुकता आपापल्या आयांकडेच जातात. चुकून एखादे वासरू गडबडीत दुसऱ्याच गाईला लुचायला लागले, तर त्या गाईला पण कळते हा बछडा आपला नाहीये, ती काही न बोलता त्याला लाडिक लाथ मारून सांगते, ‘गाढवा, मी नाहीये तुझी आई, जा शोध आपल्या आईला’. ते वासरू लगेच आपली आई शोधते आणि उत्कटतेने दूध पिण्यास सुरुवात करते.
या तुलनेत माणसांमध्ये काय होते ते पाहा. मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात, सरकारी दवाखान्यात विशिष्ट काळात असंख्य बालके जन्मतात. बालक जन्मले की नर्स आईला बाळ दाखविते. मुलगा किंवा मुलगी काय आहे ते सांगते आणि बाळाला आंघोळ घालण्यासाठी घेऊन जाते. खरी गंमत इथे सुरू होते. अवघ्या दहा मिनिटांत नर्स बाळाला परत आणून आईच्या पुढ्यात कापडात गुंडाळलेले ते बाळ ठेवते, वळते आणि आईचा आवाज येतो, ‘सिस्टर... हे बाळ माझे नाहीये, माझे बाळ मला आणून द्या’. म्हणजे एकाच वेळी अनेक बालकांना आंघोळ घालताना काहीतरी अदलाबदल झालेली असते. हा प्रश्न बाळाचे आणि आईचे डीएनए टेस्ट करूनच सोडवावा लागतो. ही गर्दी आणखी कोणते नवीन प्रश्न निर्माण करणार आहे हे काळच ठरवेल असे वाटते.
( anandg47@gmail.com)