घामावती तीरीचे सुबक शिल्पांकित खडकेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 07:13 PM2018-05-12T19:13:34+5:302018-05-12T19:13:34+5:30
स्थापत्यशिप : जालना जिल्ह्यातील अंबडजवळील जामखेड परिसरातील जुनेजाणते, बाजारपेठ असलेले गाव! जामखेड गाव परिसरात जांबुवंताची आख्यायिका प्रसिद्ध आहे. जांबुवंत हा अत्यंत बुद्धिमान असा अस्वलांचा राजा होता व रामायण आणि महाभारत कथेत याचा उल्लेख आढळतो. महाभारतात कृष्ण व जांबुवंतामध्ये स्यीमंतक रत्नावरून तुंबळ युद्ध झाले व पुढे शंका दूर होऊन त्याने कृष्णाचे लग्न जांबुवंती या आपल्या मुलीशी लावले. या घटनेची साक्ष म्हणून परिसरात जांबुवंताची गुहा दाखवली जाते.
- साईली कौ.पलांडे-दातार
जामखेड गावचे नावही याच आख्यायिकेवर आधारित आहे आणि घामावती नदी ही कृष्ण जांबुवंताच्या युद्धातील घामातून निर्माण झाली, असे स्थानिक मानतात. गाव ओलांडल्यावर, आपण घामावतीच्या निसर्गरम्य परिसरातील खडकेश्वर महादेव मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या प्रशस्त वृक्ष आच्छादित परिसरात चार यादवकालीन खांबांवर मुख्य मंदिरातून विलग उभा नंदीमंडप आहे. नंदी एक शिवलिंग व इतर मंदिर अवशेष असलेला मंडप नंतर उभा केलेला जाणवतो. खडकेश्वर मंदिर पश्चिमाभिमुखी आहे. मंदिराचा तलविन्यास, अर्ध मंडप, तारकाकृती सभामंडप, बाजूला दोन गर्भगृह वजा देवकोष्टे, अंतराळ व तारकाकृती विधान असलेला मुख्य गाभारा असा आहे; पण पडलेला भाग दुरुस्त करताना बाह्यांगावरच्या सगळ्या भिंती बुरुजासारख्या बांधकामाखाली दडल्या गेल्या व आज, मूळच्या बाह्यांगाची कल्पना करणे शक्य नाही. मूळ शिखर अस्तित्वात नसून डॉ. प्रभाकर देवांच्या नोंदीनुसार, तिथे सापडलेल्या मोठ्या आकाराच्या विटांवरून ते पूर्व मध्ययुगीन घडीव विटांचे असावे.
मुख्य मंदिराच्या दर्शनी, खुला अर्धमंडप, अर्धस्तंभ आणि वामन भिंतीच्या नाजूक कलाकुसरीने सजवलेला आहे. इतर ठिकाणी, जगती पीठावर उंच बांधलेल्या मंदिरासारखे हे मंदिर नसून जमिनीच्या पातळीवर उभे आहे. अर्धमंडपावरील नक्षीदार उतरते दंडछाद्य बघून तत्कालीन लाकडी बांधीव छत कसे असावे, याची कल्पना येते. या छतावर दोन शिल्पपट्टीकांमध्ये रामायण महाभारतातील दृश्ये, एका रांगेत असून, हंस थरावरील रांगेत सिद्ध योगीचे शिल्पांकन आहे. रामायणातील वाली सुग्रीव युद्ध प्रसंग तपशीलवार कोरला असून, रामसेतू बांधण्याचा, लक्ष्मण मूर्च्छित पडल्याचा प्रसंग कोरला आहे. विष्णूच्या अवतारांबरोबरच महाभारतातील युद्धप्रसंग शिल्पांकित केले आहेत. वामन भिंतींवर सुरसुंदरी, सिद्ध योगी आणि वादक शिल्पे कोरलेली आहेत व बसायला कक्षासने आहेत.
प्रवेशाजवळील स्तंभांवर शेषशायी विष्णू, युद्धप्रसंग, हत्ती, मकर, नाग, नर्तक, रानडुकराची शिकार, असे विषय अंकित आहेत. अर्धमंडपाचे छत घुमटाकार असून, करोटक वितान आहे, चार कोपऱ्यात चार कीर्तीमुखे कोरलेली आहेत. अर्धमंडपातून प्रवेश केल्यावर प्रशस्त गूढ मंडपात प्रवेश होतो. इथे आठ घाटदार खांबांनी वेढलेली रंगशिला जमिनीपासून उंच बांधली आहे. इतर चौरस स्तंभ आणि अर्धस्तंभांच्या तुलनेत मधले स्तंभ घटपल्लव (पूर्णाकृती कुंभ) युक्त आहेत व खांबांच्या तळापाशी व मध्यात विविध शिल्पांचे अंकन आहे. माशावर बसलेले मत्स्येंद्रनाथ, चामुंडा, भैरव, शंकर, गणपती, गरुड, कुबेर, सूर्य, सरस्वती, लक्ष्मी, शक्तीदेवता, शेष, विविध आचार्य व आसनस्थ योगी, आयुध घेतलेले वीर, अशी रेलचेल दिसते. अंतराळ प्रवेशापाशी पिशाच्च व कुत्रा दोन बाजूंना असलेली भैरवाची मूर्ती अंकित आहे.
रंगशिळेवर ‘रंगोजी तानदेव’ असा मध्ययुगीन काळातील मजकूर कोरला आहे. स्तंभमध्यातील चौकटीत विविध आसनात मनुष्यकृती, कालियामर्दन, गणपती, आचार्य, मल्लविद्या, कामशिल्पे, गोपी व गायींसोबत मुरलीधर कृष्ण, गजयुद्ध, नर्तकी, सूर्य, विष्णू अशी शिल्पे आढळतात. काही ठिकाणी घुबड व हंसांच्या जोड्या आहेत. स्तंभशीर्षावर विविध वादक नर्तकांचे अंकन आहे. सभामंडपाचे छत करोटक प्रकारच्या वितानाचे असून त्याचे स्थापत्य विलोभनीय आहे. छोटी दोन गर्भगृहवजा देवकोष्टे अलंकरणविरहित व रिकामी आहे. मागील भिंतीवर कोनाडे आहेत. सभामंडपाच्या मागील भिंतीवर दोन देवकोष्टे आहेत. त्यातील डाव्या देवकोष्टात, विष्णू अवतार भूवराहाची भूदेवीसहित सुस्वरूप मूर्ती आहे. ही मूर्ती जवळील विहिरीत मिळाली होती व तिच्या प्रभावळीत दशावतार कोरले आहेत.
अंतराळाच्या तुळयांवर प्रत्यालीढ व ध्यान आसनात दोन नरसिंह कोरले आहेत. अंतराळाच्या स्तंभांवरील स्तंभशीर्षावर देखणे किचक कोरले असून, एकाच्या गळ्यात नाग व हातात कापाल आहे. अंतराळातील एका देवकोष्टात भंगलेली नृत्य शिवाची मूर्ती आहे व दुसऱ्या कोनाड्यात, ओबडधोबड उमा महेश्वर आलिंगन शिल्प आहे. गर्भगृहाची द्वारशाखा पाच शाखांची असून, दोन्ही बाजूला शैव द्वारपाल दिसतात. द्वारपालांशेजारी कुबेर प्रतिहारी मुंगसाची पिशवी मानेभोवती घेऊन उभा आहे. मुंगसाच्या मुखातून रत्न, माणके पडतात व ते श्रीमंतीचे प्रतीक मानले आहे. म्हणून कुबेर या धनाच्या देवाकडे मुंगसाची पिशवी असते व मुंगूस दिसणं शुभ संकेत मानला जातो. द्वारशाखेवर ललाटबिंबात गणेश व वरती किन्नर (अर्ध मनुष्य-अर्ध पक्षी) कोरला आहे.
उत्तररांगातील चौकटीत सरस्वती, चामुंडेसोबत मातृका कोरल्या आहेत. गाभाऱ्यातील शिवलिंग नंतरचे असून शाळुंकेचे तोंड डाव्या बाजूला आहे, तसेच गाभाऱ्यात गायमुख असून, बाहेरून गाभारा पाण्याने कोंडायची ती सोय असावी. नंदीजवळ ठेवलेले शाळुंकाविरहित लिंग हे कदाचित मूळचे शिवलिंग असावे. छताची रचना पाहता अर्धमंडप, सभा मंडप व गर्भगृहावर कधीकाळी शिखरे असावीत. स्थापत्य व शिल्प विषय, शैलीवरून, मंदिर पूर्व यादव काळातील असावे.
मंदिराचा सभामंडप व शिल्पयुक्त स्तंभ हा मंदिराचा सर्वात आकर्षक भाग आहे. अशा मंडपातून उपास्य देवतेची कला व तंत्रमंत्र साधना होत असावी. मत्स्येंद्रनाथ, सरस्वती, कुबेर, भैरव, चामुंडा, शक्ती देवतांची विशिष्ट जागेवरील शिल्पे, नाग, हंस व घुबडासारख्या प्राण्यांचे वैशिष्ट्यपूर्ण अंकन, विविध आचार्य व योगी यांचे शिल्पांकन, अशा अनेक गोष्टी हे मंदिर तंत्रसाधनेसाठी वापरत असावे, असे सुचवतात; पण ग्रंथ पुराव्यांअभावी निश्चित कुठल्या संप्रदायाकडून ते उपयोगात आणले गेले, याची कल्पना येत नाही. खूप पडझड झाल्याने मंदिराची बरीच हानी झाली आहे; पण आज दिसून येणारे शिल्प आणि स्थापत्य वैभव कमालीचे प्रभावी आहे. या भागातील अभिजात पुरावशेषांची सांगड इथल्या जुन्या आख्यायिकांशी घालून अभ्यासणे गरजेचे आहे. त्यातून अनेक ऐतिहासिक सत्ये उजेडात येतील. तूर्तास, जामखेड येथील पुरातत्व खात्याने जपलेले शिल्पवैभव अनुभवण्यासाठी नक्की भेट देऊन आनंद घ्या!
( sailikdatar@gmail.com )