संवाद..विठ्ठलाशी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:56 PM2018-07-23T13:56:35+5:302018-07-23T13:58:30+5:30
वर्तमान : विठ्ठला... युगे अठ्ठावीस तू पंढरपुरात भीमातीरी उभा ठाकलास तो गोरगरीब, कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणून. तू कधी अनाथांचा ‘बाप’ झाला तर कधी ‘माय’ म्हणून. शेकडो मैल लाखो अनवाणी ‘पाऊलं’ चालत येतात तुझ्या भेटीसाठी भक्तिभावाने. जगात हे कुठे, कोणासाठीच घडत नाही.. तू लक्षात ठेव.. तू देतोस तरी काय असे यांना; पण मनात दाटून असते तुझ्या भेटीची आस.‘भेटी लागी जीवा’ इतकाच काय तो स्वार्थ, ठेवून चालतात ही पाऊले पंढरीची वाट. तुझे ‘सावळे सुंदर मनोहर रूप’ हृदयी चिरंतन साठवून ठेवण्यासाठी.. एकदाचा तुझ्या पायावर माथा टेकला की ‘आनंदाची डोही आनंद तरंग’ हा परमसुखाचा आनंदभाव मनी दाटून येतो. ‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, भाग गेला शीण गेला, अवघा जाला आनंद’ असा हा परमोच्च आनंदाचा क्षण तुझ्या भेटीचा. हा वारकऱ्यांचा आनंद नाही तोलता आला कशाने, कुणाला, शेकडो वर्ष विठ्ठला... संसाररुपी भवसागरातील दु:ख ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने दूर जातील म्हणून तू अनेकांना दु:ख निवारणाचा मार्ग वाटलास तर कधी बुद्धाच्या स्थितीशील रुपात भावलास.. तुझे ते ‘लेकुरवाळे’ रूपही ‘घर’ करून असते सदैव आमच्या मनात. कारण अठरापगड जातीची लेकरं अंगाखांद्यावर खेळलीत तुझ्या; म्हणून तर तू ठरलास समतेचा अग्रदूत. तू केला नाहीस भेदाभेद. प्रत्येकाला हवा तसा भेटलास अन् देत गेलास आनंद इहलोकी..!!
- गणेश मोहिते
विठ्ठला... तू पाळला नाहीस कधी जात, पात, धर्म, पंथ, लिगभेदांचा विटाळ.‘म्हणोनी कुळजाती वर्ण, हे अवघेचि गा अकारण’ हे ज्ञानदेवाने सनातन्यांना पहिल्यांदा ठासून सांगितले. त्यातून महाराष्ट्र देशी तुझ्या नामाभोवती समतेचा पुरस्कार करणारी ‘भक्ती चळवळ’ उभी राहिली. अन् बा ऽऽ विठ्ठला..तू आध्यात्मिक लोकशाहीचा उद्गाता ठरलास.. तूच नाकारलेस सोवळेओवळे मंदिरी, अन् झालास जनीचा विठ्या.. कधी तिला जात्यावर दळू लागला, तर कधी गोरोबाकाकाला चिखल तुडवू लागला... सावता महाराजांच्या मळ्यात कांदा, मुळा, भाजी झालास; तर कधी भंडाऱ्याच्या डोंगरावर तुकोबांच्या ‘गाथेतून’ जनकल्याणाचे तत्त्वज्ञान बोलू लागला.. नाथांच्या वाड्यात श्रीखंड्या होऊन वाळवंटातून पाणी वाहिले गोदेचे.. कधी झालास विठू महार खुले केले ‘गोदामं’ अन्नदशा झालेल्यांसाठी. ‘ऊस डोगा परी रस नव्हे डोगा, काय भुललासी वरलिया रंगा.. हे चोख्याचे ‘आर्त’ बोल ऐकताच तू गहिवरलास.‘अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडा ल्याली, तुझे गेले मढे, तुला पाहून काळ रडे’ हा शिव्या शापही तू सहज पचवलास... म्हणून तूच राहिलास प्रत्येकाचे अंत:करण व्यापून आणि दिला या विश्वाला ‘वारकरी’ हा शब्द. तो नव्हता फक्त शब्द; तो होता ‘आचारधर्म’, समतेचा, समानतेचा, विश्वकल्याणाचा, मानवतेचा.. रंजल्या, गांजलेल्यांच्या मुक्तीचा. त्याने दिलीत समता, बंधुभाव, नीतीयुक्त आचारण, सर्वांभूती प्रेम यासारखी नवी मूल्ये. अन् उखडून टाकला सनातनी विचार आणि झालास सर्वव्यापी तू विश्वकल्याणासाठी...!
विठ्ठला....पण आता सावध हो बरं! कारण तुझ्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीत ‘धारकरी’ घुसलेत म्हणे..त्यांच्या हाती वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्या, डोक्यावर तुळस वगैरे असली तुझी पारंपरिक साधने नाहीत आता; तर ते हातात नंग्या तलवारी आणि डोक्यात ‘मनु’ पाळतात म्हणे. तू त्यांनाही ठामपणे नाकारणार हे ठाऊकच रे आम्हाला. पण भीती वाटते ती तुझ्या भोळा-भाबड्या वारकऱ्यांची. ते सर्वांभूती परमेश्वर या न्यायाने सर्वांवर प्रेम करतात. उद्या तुझ्या वाटेवर चालत येणाऱ्यात धारकऱ्यांची संख्या अधिक न वाढो म्हणजे झाले. इतकेच आमुचे मागणे..! विठ्ठला.. तुझेच बघ ना, तुलाच नाही का, शेकडो वर्ष ‘बडव्यांनी’ जेरीस आणले, तुला अपवित्र म्हणून बडविले. ‘पुरुषसूक्त’ गाऊन तुला शुद्ध करण्याचे उद्योग करून ‘भागवत’ धर्माच्या तत्त्वाला मूठमाती देण्याचे सनातनी प्रयोग तुझ्या गाभाऱ्यातच केले. तेव्हाही तू शांतच होता विठ्ठला..तरीपण तूच नाकारलेस शेवटी बडव्यांना हे ही सत्यच..म्हणून तूच तर वाटतो आधार आम्हांस शेवटचा!
विठ्ठला... आता थोडे वर्तमानाविषयी बोलू..तूच बघ..‘काळ किती कठीण आला’... तू पाहतोय ना, की तू लावलेस डोळे, झाला ध्यानस्थ. तुला पडत नाहीत काय असंख्य प्रश्न वर्तमानात? तुला ऐकू येत नाही का आजूबाजूचा आक्रोश? तू कधीच का विचारत नाही ‘जाब’ अस्वस्थ होऊन? काय चालले आपल्या राज्यात वगैरे. अरे विठ्ठला..कधी तरी विचार की आषाढीला तुझी शासकीय महापूजा करणाऱ्यांच्या कानात. कसे चालले? म्हणावं राज्य? एवढं तरी. फार फरक पडेल बघ. पण तुला ‘पाऊस’ पडू दे म्हटले की तू होतो खुश.. परंतु हे ढोंगी लोक कोणाता ‘पाऊस’ मागत आलेत वर्षानुवर्षे तुझ्याकडे याचाच कधी केला नाहीस तू विचार? अरे ‘विठोबा’ऽऽ ..निवडणुकांत ‘मतांचा’ पाऊस यापलीकडे यांना कुठे उरले रे देणेघेणे.. यांना हवाय फक्त स्वत:चाच जयघोष!
म्हणून...तू जरा या आषाढीला विचार साहेबांना काही प्रश्नं.. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा वर्षातला बळीचा आकडा, कर्जमाफीची फसवी घोषणा, बेरोजगारांचा मूक आक्रोश, जातीपातींना आरक्षणाचे गाजर, अल्पसंख्याकांवरचे हल्ले, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीचे मारेकरी, जलयुक्त शिवारात साचलेला गाळ, जाहिरातबाजीवरची उधळपट्टी, खोट्या लाभार्थ्यांचे पत्ते, जातीजातीत वाढत गेलेली तेढ, मोर्चांमागील राबते हात, धर्माधर्मात वाढलेला, अयोध्येत मंदिर की मशीद? तूच विचार तारीख.. तूच विचार दीडपट हमीभावाचा झोल, रस्त्यांवरील खड्ड्यांच्या आकड्यांचा खेळ, तूच विचार भीमा, कोरेगावचे आरोपी? आणि तूच विचार कोण खरे, कोण खोटे नक्षलवादी? नंतर बाऽविठ्ठला तू हेही सांग की ‘मनु’ तुझा की ज्ञानोबा-तुकोबा तुझे? हवे तर जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी तुझे एखादे नवीन चॅनल सुरू कर विठ्ठला... तुलाही उरला नसेल या जुन्या चॅनलवर विश्वास तर. परंतु तुला आता बोलावेच लागेल बघ, अन्यथा तुलाही काळ माफ करणार नाही.. अन्यथा तुझे लागतील गल्लोगल्ली होर्डिंग्ज मनुसोबत.
म्हणून...सांगून टाक एकदाच नि:संकोचपणे की तू लाथाडत आला शतकानुशतके यांना. कळू दे तुझ्या अर्धवट भक्तांनाही.. तुझ्याच भागवत धर्माने तयार केली होती ही भूमी म्हणून जन्मले इथे शिवराय.. उभारीले तुला हवे तसे समतेचे राज्य. नांदली जनता तुझी गुण्यागोविंदाने. ‘वेदांचा अर्थ आम्हांसी ठाव, इतरांनी वाहावा भार व्यर्थ’ ठणकावून सांगितले तुझ्याच तुकोबांनी आणि प्रसवली नवी क्रांती इथेच.. म्हणून घडला महाराष्ट्र धर्म. अशा अनेक गोष्टी सांगता येतील तुला पण..ते जाऊ दे..
पण बाऽऽ विठ्ठला...शेवटी तू आता किमान लक्षात घे जीवघेणे प्रश्न, हेच बघ ना आताही...शेकडो मैल चालत आलेला तुझा ‘वारकरी’ माघारी फिरला आषाढीतून की चिंताक्रांत होतो सालभर. ‘बळी’ पातळात घातल्यापासून सतत करतो आक्रोश; पण तू हलला नाही विटेवरून त्यांच्यासाठी.. तो करतो तुझा धावा, अन् आवळतोय ‘फास’ गळ्याला दिवसेंदिवस, तरी संपले नाही भोवतीचे दुष्टचक्र. तो नागवला जातोय चोहीकडून, कधी अस्मानीने तर कधी सुलतानीने. तो घालतोय साद तुला; तेव्हा तू ही त्याच्याशी थोडा संवादी हो... इतुकीच करीतसे आंम्ही विनवणी, तुला सप्रेम जय हरी!!!
( dr.gamohite@gmail.com)