सारे काही अनुत्तरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:26 PM2018-02-28T20:26:54+5:302018-02-28T20:31:40+5:30
दिवा लावू अंधारात : दारिद्र्यात खितपत पडलेल्या माणसांची एकामागून एक येणारी संकटे इतकी पाठ पुरवतात की त्यांना जगणंच नकोसे वाटू लागते. पण तरीही परिवारातील काही जबाबदार्या अंगावर येऊन पडतात. त्या झटकून टाकणे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सोपे नसते. मग जमतील तशा त्या पेलण्याचा प्रयत्न करीत आयुष्याच्या मावळतीकडे जाणारा एक एक दिवस घालवत जाणे हा दिनक्रम ठरतो. पोटाची खळगी भरण्याचे सर्व प्रयत्न थांबले आणि शरीर थकून गेले की स्वाभिमान, लाज, इज्जत अशा शब्दांना आयुष्यात अर्थ उरत नाही. उच्च प्रतीचे तत्त्वज्ञानही इथे पोकळ आणि कोरडे ठरत .
- दीपक नागरगोजे
जगण्याचा प्रवास मोठा विचित्र आहे. जिवाभावाची माणसे मागे उभी असली की तो सोपा होतो आणि ती मागची मागे निघून गेली की अवघड. मैलोन्मैल दूर पसरलेल्या निर्जन वाळवंटात तहानेने व्याकूळ होत अनवाणी पायाने भटकंती करणार्या जिवासारखाच. अशाच परिस्थितीत आपल्या ८० वर्षांच्या आजीसोबत जामखेडच्या बाजारात भीक मागत जगणार्या दीपाली आणि रुपाली या दोन लहानग्या जिवाची ही गोष्ट. अहमदनगर आणि बीडच्या सीमेवर असणारे साकत हे गाव. बालघाटातील इतर गावांप्रमाणेच हेही गाव दुष्काळीच. रोजगार मिळवण्यासाठी ऊसतोडीला जाणे ठरलेलेच. याच गावातील पद्मिनीबाई एकनाथ फुलावळे या ८० वर्षीय वृद्ध महिलेचे कुटुंब. कल्याण आणि कैलास ही दोन मुलं लहान असतानाच पतीचे निधन झाले. तेव्हापासून संसाराचा गाडा एकटीने हाकला. ऊस तोडून मुलं लहानाची मोठी केली. मुलांना खाऊ घालून जगवण्याचीच पंचाईत. शिक्षण तर पोट भरल्याच्या नंतर सुरू होते. पोटासाठी कराव्या लागणार्या लढाईत पद्मिनीबाई मुलांना शाळा शिकविण्याच्या भानगडीत पडल्या नाही. दोन्हीही मुले भोळसर गतिमंद असल्यामुळे त्यांना शिकवूनही तसा काही उपयोग नव्हता, असे ती म्हणते. मुकादमाच्या टोळीत एकटीने कारखान्यावर जाऊन ऊस तोडला. लेकरं लहानाची मोठी केली. घरी पाटाभरही जमीन नसल्याने ऊसतोडीच्या कष्टाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. दोन्हीही मुले इतकीभोळसर की सकाळी काय खाल्ले हे त्यांच्या स्मरणात राहायचे नाही. गाव कोणते हेही सांगता यायचे नाही. मोठे झाले तरीही आईच्याच आधाराने त्यांना वावरावे लागे. आई सांगेन तेव्हढेच करायचे.
पद्मिनीबाईला नियतीचा खेळ पाहून खूप वाईट वाटायचे, पण काय पर्याय असणार? पुढे आले तसे जगण्याशिवाय इतर कुठलाही मार्ग नव्हता. पद्मिनीबाईच्या कष्टावर मुले मोठी झाली. योगायोगाने दिलीप आणि कल्याण दोघांचेही लग्न झाले. चला कसेतरी लेकरांचा संसार मार्गी लागतोय हे पाहून पद्मिनीबाई खुश होत्या. सुनीता आणि जिजा दोन्ही सुना चांगल्या मिळाल्या. पोरी भारी कष्टाच्या. नवरे भोळे आहेत. आपल्याला आपले करावे लागेल हे ओळखून काबाडकष्ट करू लागल्या. मुकादमाची उचल घेऊन कारखान्यावर जाऊ लागल्या. निसर्गाने सुनीता आणि कल्याण या जोडीला रुपाली आणि दीपाली नावाच्या दोन गोंडस मुली दिल्या. सारे काही व्यवस्थित सुरूअसतानाच एक दिवस उसाच्या गाडीबरोबर कारखान्यावर गेलेला कल्याण परत कोपीवर आला नाही. शोधाशोध सुरू झाली, पण कल्याण सापडला नाही. कल्याण हरवला ही बातमी पद्मिनीबाईला खूप वेदना देणारी होती. भोळसर कल्याण दूर कुठे गेला असला तर त्याला परत जायचे कुठे हे समजणार नाही. तो वेड्यासारखा फिरत बसेल या काळजीत दोघींनी कल्याणचा खूप शोध घेतला, पण तो आजपर्यंत सापडलाच नाही. पद्मिनीबाईच्या आयुष्यात नुकत्याच आलेल्या सुखाने पुन्हा काढता पाय घेतला.
पुढे काही दिवस सुनीताने तिच्या कष्टावर या मुलींचा सांभाळ केला, पण नियतीला तेही मान्य झाले नाही. अवघ्या तीनच वर्षांत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने सुनीताला घेरले. प्रचंड दारिद्र्य आणि शिक्षण, माहितीचा अभाव यामुळे योग्य ते उपचार तिला घेता आले नाही. शेवटी एक दिवस घरातील अंथरुणावर पडलेल्या सुनीताला मृत्यूने कवटाळले. रुपाली-दीपाली पुन्हा पोरक्या झाल्या. मावळतीला झुकलेल्या पद्मिनीबार्इंना हे कसे सहन झाले असेल..? यानंतर काही दिवसातच त्यांचा दुसरा मुलगा दिलीपही हरवला. तोही अद्याप परत आला नाही. त्याची पत्नी जिजा माहेरी निघून गेली कायमचीच. सहा वर्षांची रुपाली, पाच वर्षांची दीपाली यांना वाढविण्याची जबाबदारी पद्मिनीबाईवर आली. पतीच्या निधनानंतर पडलेली दोन मुलांची जबाबदारी त्यांनी मोठ्या कष्टाने पेलली होती. कारण तेव्हा त्या तरुण होत्या. आता पुन्हा तीच जबाबदारी या वयात पेलणे ही गोष्ट सोपी नव्हती. क्षीण झालेल्या शरीराला आता कुठले काम झेपणार होते..? वृद्ध पद्मिनीबाईला खूप वाईट वाटत होते. एकाच आयुष्यात किती दु:खाचा, किती संकटांचा सामना करायचा? नियतीने इतकी परीक्षा का घ्यावी ..? सारे काही अनुत्तरित.
कष्ट करून मुलांना वाढविण्याचे दिवस तर संपून गेले. छोटे छोटे दोन चिमुकले जगायला तर हवेत. मग काय करायचं...? रोज फुकट कोण देणार...? अखेर पद्मिनीबाईनी मार्ग निवडला जामखेडच्या बाजारात भीक मागून आपण जगायचे, मुलांना जगवायचे. दीपाली आणि रुपालीला घेऊन त्या भीक मागू लागल्या. चालताना खूप थकवा यायचा म्हणून त्या एका ठिकाणी बसत असत आणि ही दोन लेकरं अनवाणी पायाने अख्खा बाजार फिरून भीक मागत. मिळालेली भीक आजीला आणून देत. लेकरांना शिकविण्याचे स्वप्न तिसर्या पिढीतही धुळीस मिळाले. सौतड्यात शिक्षक म्हणून काम करणारे आर्वीतील नाना घाडगे यांनी या लेकरांची कथा मला सांगितली आणि त्या मुलींना शांतिवनमध्ये घेऊन यायची विनंती त्याने केली. त्याला घेऊन मी जामखेड गाठले. सुरुवातीला मुलींना सोडण्यास पद्मिनीबार्इंनी नकार दिला. भीक मागून आणून देणारी लेकरं त्यांनाही आता जगण्याचे साधन वाटू लागले होते. आपले काय होईल असे वाटले म्हणून त्यांनी नाही म्हटले. बर्याच प्रयत्नानंतर हो भरल्या. पण मुली तयार नव्हत्या. आजीला सोडून कुठेही जाणे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी आम्हाला बाजारात ऐकलेल्या अश्लील शब्दात शिवीगाळ सुरू केली. रुपालीने तर भगवान भांगेना दगड फेकून मारला. अपयश आले.
रिकाम्या हाताने शांतिवनात परत आलोत. प्रयत्न सोडले नाहीत. पुन्हा साकतमध्ये जाऊन सरपंचाच्या कानावर विषय टाकला. काही लोकांनी पद्मिनीबार्इंना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि मग त्यांनी शांतिवनमध्ये लेकरं पाठवायला परवानगी दिली. आम्ही दोघींना शांतिवनात घेऊन आलो. सुरुवातीला इथे रुळायला त्यांना खूप अवघड गेले. येणार्या पाहुण्यांना पैसे मागत. नाही दिले तर शिव्या देत. शिळे उष्टे अन्न खायला बघत, पण येथील सर्वांनी त्यांना आपल्यात सहज सामावून घेतले. त्यांना चांगल्या सवयी लावल्या. आज रुपाली चौथीत असून, वडिलांप्रमाणेच थोडी गतिमंद आहे तर दीपाली तिसरीत असून वर्गातील ७९ मुलांत पहिला किंवा दुसरा क्रमांक तिचा ठरलेला असतो इतकी हुशार आहे.
( deepshantiwan99@gmail.com)