विलक्षण स्थापत्य...चारठाणातील देवीचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 08:07 PM2018-04-07T20:07:42+5:302018-04-07T20:09:48+5:30
स्थापत्यशिल्प : मागील काही लेखांमध्ये आपण चारठाणा या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक गावाची व तेथील स्थापत्य अवशेषांची माहिती घेतली होती. त्यातील गणेश मंदिर आणि शिव मंदिर वगळता बहुतांशी चारठाणा येथील पुरातन अवशेष हे यादवकालीन आहेत. त्या काळातही ते नियोजनबद्ध शहर असावे हे आजच्या वस्ती, रस्ते व मंदिर समूहांची आखणी बघता लक्षात येते. चारठाणा गावाच्या मधोमध जिथे चार रस्ते एकत्र येतात त्या जागेलगत खुराची देवी आणि जोड महादेव ही मंदिरे बांधलेली आढळतात. त्याच भागात मूळची वसाहत असावी, हे पांढरीच्या उंचावट्यावरून लक्षात येईल.
- साईली कौ. पलांडे-दातार
चारठाण्याच्या इतर मंदिरांसारखीच जोड महादेव आणि खुराची देवी मंदिरे ही उंच पांढरीच्या मातीत गाडलेली होती. सुदैवाने, राज्य पुरातत्व खात्याच्या प्रयत्नाने माती काढून मंदिरांची डागडुजी करण्यात येत आहे. तीन अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह, असा तलविन्यास आढळतो. सद्य:स्थितीत मंदिराचे शिखर अस्तित्वात नाही, जे घडीव विटांचे असावे. मंदिर उत्तराभिमुख असून, उत्तर, पूर्व व पश्चिम दिशेला तीन प्रवेशद्वार व अर्धमंडप आहेत. तीन प्रवेशांपैकी उत्तरेचे द्वार बंद असून, पश्चिम आणि पूर्व बाजूंनी मंदिरात प्रवेश करता येतो. उत्तर दिशेच्या मंडपातील स्तंभावर गणेशाची एक सुस्वरूप नृत्यमूर्ती चौकटीत कोरलेली आहे.
सभामंडपाच्या द्वारशाखेत पत्रशाखा, घटपल्लवयुक्त स्तंभशाखा व रत्नशाखेचा समावेश असून, प्रवेशद्वारे साधी आहेत. सभामंडपात चौकोनी रंगशिला आहे व मागील भिंतीवर दोन देवकोष्टे आहेत. त्यातील एका देवकोष्टात चतुर्भुज नृसिंहाची आसन मूर्ती ठेवली आहे. सभामंडपात अर्धस्तंभ वगळता इतर खांब नाहीत. अंतराळाच्या खांबांवर साधक आचाऱ्यांची छोटी शिल्पे आहेत. खांबांच्या तळाची सरस्वती व लक्ष्मीची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर जटाधारी (?) सिद्ध साधकाची अंजनी मुद्रेतील आसन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा खंडित असून, तीन शाखांची आहे. त्यावर पुस्तक व तलवार घेतलेले द्वारपाल, कुबेर इत्यादी प्रतिहारी कोरले आहेत. ललाट बिंबावर गणेश अंकित आहे. मंदिराच्या बाह्यभागावर कोणतेही शिल्पांकन नाही व शिल्पविरहित सपाट थरांची रचना दिसते. गाभारा पंचरथ आहे, पण देवकोष्टे नसून संपूर्ण मंदिराभोवती भिंतींवर आडवे पट्टे फिरले आहेत.
‘खुराची देवी’ असे काहीसे विचित्र नाव पडण्यामागे तेथील सभामंडपाचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य कारण ठरले आहे. ह्या छताची असंख्य नक्षीदार पाषाण, एकात एक अडकवून, एक प्रचंड मोठी त्रिमिती आणि भौमितिक मिश्ररचना, स्तंभांच्या आधारे उभी आहे. हत्तीच्या टाळूच्या आकाराच्या म्हणजेच ‘गजतालू’ प्रकारच्या खोबण्या अडकवून चारही बाजूने वर व आत जाणारी ही रचना आहे. त्यातील गजतालू आकाराला खुराचा आकार समजून मंदिराचे नाव खुराची देवी असे पडले आहे. ह्या प्रकारच्या रचनेला शास्त्र ग्रंथांमध्ये ‘करोटक’ वितान म्हणतात. खुराची देवी मंदिराची रचना महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील मंदिरांमध्ये एकमेवाद्वितीय आहे. काही अभ्यासकांच्या मते, प्रत्येक खोबणीत देवता कल्पून, त्यांची मंडलाकार रचनेत साधना इथले शाक्त पंथी साधक करीत असावे. गाभाऱ्याच्या मागील भिंतीवर, वरील बाजूस मत्स्येंद्रनाथांचे माशावरील, योगपट्ट्यातील आसनात बसलेले ठळक शिल्प अंकित आहे.
शिव-पार्वतीला योग साधनेची रहस्य सांगताना मत्स्येंद्रनाथांनी बाळरुपात माशाच्या पोटातून ऐकले, अशी एक आख्यायिका आहे. मत्स्येंद्रनाथ, हे हिंदू व बौद्ध परंपरेत महत्त्वाचे सिद्ध म्हणून ओळखले जातात. नाथ संप्रदाय व हठयोगाचे प्रवर्तक म्हणून ते मान्यता पावले आहेत. पण, मुख्यत: त्यांना कौल संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते व त्यांचा काळ दहावे शतक आहे. हठयोग व तंत्रासंबंधित कौलज्ञाननिर्णय, मत्स्येंद्रसंहिता असे ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ८४ सिद्धपैकी एक असलेले मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथांचे गुरू म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यात आढळणाऱ्या मत्स्येंद्रनाथांच्या मूर्ती, संदर्भानुसार नाथ संप्रदाय किंवा कौल परंपरेच्या अस्तित्वाचा सशक्त पुरावा ठरतात. ही मूर्ती, तसेच सरस्वती व लक्ष्मीची शिल्पे व छताच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेवरून हे मंदिर कौल संप्रदायाच्या साधनेचे केंद्र असावे, यात शंका उरत नाही.
आज मंदिर रेणुका देवीचे असणे हा योगायोग नसावा. गाभाऱ्यामध्ये आज रेणुका देवीचा चेहऱ्याचा वैशिष्ट्यपूर्ण तांदळा आहे. चारठाण्याच्या देशपांडे घराण्यातील पूर्वजांनी त्याचे कुलदैवत, माहूरची रेणुका देवीचे ठाणे म्हणून इथे स्थापना मूर्ती केली, असे चारठाण्याचे इतिहास अभ्यासक सोनवटकरांकडून समजते. अर्थात, शिलालेख नसता स्थापत्यकलेच्या आधारे आपण मूळ मंदिर हे निश्चित पूर्व यादवकालीन असावे, असा अंदाज बांधू शकतो. देवीचा शेंदूर पडल्यास मूळ आतील मूर्तीचे स्वरूप स्पष्ट होण्यास मदत होईल. आज ह्या मंदिराची पुरातत्व विभागाकडून डागडुजी होते आहे, ती सर्व मंदिराची शिल्प व स्थापत्य वैशिष्ट्ये जपावीत. जेणेकरून चारठाण्याचे धार्मिक, सांप्रदायिक व कलावैभव अबाधित राहील व इतिहासातील चारठाण्याचे योगदान स्पष्ट होईल!
( sailikdatar@gmail.com )