‘सरंजामी छावण्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:58 PM2018-03-10T17:58:17+5:302018-03-10T17:58:49+5:30

वर्तमान : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रजासत्ताक भारतातील विविध संस्थाने खालसा केली गेली. कारण लोकशाहीत ना कोणी ‘राजे’, ना कोणी महाराजे. लोकशाहीसाठी मध्ययुगीन मानसिकतेतील भारतीय समूहाला हा संदेश सहेतुकपणे दिला गेला. ‘आम्ही भारताचे लोक’ समपातळीवर आहोत. म्हणून ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे संत वचन घटनाकारांनी घटनेत आणले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित नवसमाजाचे स्वप्न कल्पिले. त्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारून आता साडेसहा दशके उलटली; परंतु चित्र बदलले नाही. राजेशाहीतील ‘परिभाषा’ तितकी बदलली. पूर्वी सरदार, वतनदार, जहागीरदार वगैरे मंडळी सरंजामशाहीची ‘वाहक’ होती.  लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी स्वत:पुरता एक एक ‘सुभा’ सुरक्षित केला. त्या ‘सुभ्यां’वरची ‘जहागिरी’ कशी शाबूत राहील याचीच काळजी घेतली आहे.

'feudalism in democracy' | ‘सरंजामी छावण्या’

‘सरंजामी छावण्या’

googlenewsNext

-  गणेश मोहिते

निवडणुकीत एकदा ‘जय’ झाला की मग आपोआप विविध ‘संस्था’ आकारास येतात. ‘संस्था’ हाती असल्यामुळे कार्यभार सुलभ होतो. कारण हक्काची माणसं ‘कार्यकर्ते’ झाले की बरीच कामं बिनभांडवली होतात. हा तसा राजकीय नफाच. कदाचित म्हणून तर सहकारी संस्थेच्या मालकांना राजेशाहीतील मानाची ‘सम्राट’ ही उपाधी जनतेने बहाल केली असावी. खरं तर स्वातंत्र्या नंतरच्या पहिल्या पिढीने हे कार्य उदात्त हेतूने लोकहितासाठी झपाटलेपणातून व्रतस्थपणे अंगीकारले होते. नंतर मात्र त्यांच्यापुढे नव्या पिढीतील ‘जमात’ कधी लोकांच्या मानगुटीवर बसली ते लोकांनाही समजले नाही.

या देशात अनेक शतके राज्य केलेल्या परकीय सत्ता आणि इंग्रजी सत्तेच्या दीडशे वर्षांच्या अंमलाने गुलामीची सवय लागलेल्या आम्हा भारतीयांना लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांचा खरा बोध झाला की नाही? हा प्रश्न कायम पडतो. कारण लोकशाही व्यवस्थेत ‘लोक’ हे सर्वोच्च असतात, याचा विसर पडून लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सनदी नोकर आणि लोकप्रतिनिधी जनतेला आज ‘मालक’ वाटू लागले. हा आंग्ल संस्कृतीचाच प्रभाव होय. यातून जनतेचा सेवक हा ‘साहेब’ झाला आणि जनतेकडे ‘दास्यत्व’ आले. वर्तमानात हीच लोकशाहीची सर्वात विदारक व करुण स्थिती म्हणावी लागेल. ‘साहेबी’ बाणा एकदा अंगात शिरला की आम्ही या सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहोत किंवा यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच पगारी खुर्चीत नियुक्त आहोत ही मूळ भावना लयास जाते व लोकसेवेला बगल देऊन ‘जनसेवक’ स्वत:ला ‘मालक’ अथवा या व्यवस्थेतील ‘राजे’ समजायला लागतात व दारिद्र्यात अडकलेला मागास, वंचित, गरीब समूह व यांच्या संस्थांमधील नोकरी करणारा घटक यांना आपला ‘गुलाम’ वाटू लागतो आणि जनतेलाही बिनदिक्कतपणे हेच आपले मालक वाटू लागतात म्हणून लोकशाहीच्या अंमलबजावणीनंतर देशातील पूर्वीची संस्थांने ‘खालसा’ केली असली तरी लोकशाहीने निर्माण केलेल्या या नव्या वतनदारांच्या ‘सरंजामी छावण्या’ सरंजामशाहीचे ‘विष’ पोटात घेऊन लोकशाही मूल्यांना नामशेष करायचे कार्य आजही करीत असतील तर लोकशाही राष्ट्राच्या प्रगतीतील हा मोठा धोका आहे.

‘समाजात वाढत जाणारी आर्थिक विषमता हीच येणार्‍या  काळात देशाला अराजकतेकडे घेऊन जाईल’ हे विधान आजच्या वर्तमानात असंख्य तथाकथित देशभक्तांना व या सरंजामी छावण्यात ‘गुलाम’ बनून पाणी भरू पाहणार्‍या माणसांना हे रुचत नाही. कारण आमचा समाज हजारो वर्षे ‘व्यक्तिपूजक’ संस्कृतीचा वाहक राहिला आहे. लोकशाही मूल्यांच्या संवर्धनापेक्षा व्यक्तीच्या पायावर निष्ठा वाहण्याची परंपरा तशी आमच्याकडे जुनीच आहे. म्हणून तर आजही एखाद्या मतदारसंघात आजोबा, पंजोबांचा ‘वारसा’ म्हणून त्या घराचा ‘भार’अनेक जण पुढे अनेक पिढ्या जनता वाहताना दिसते.

दुसरे असे की ‘सत्ता, सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता’ हे समीकरण देशात चांगलेच रूढ झाले आहे. सत्तेच्या जोरावरच काही मूठभर लोकांनी आपली नवी वतनदारी निर्माण केली आहे आणि आज हे सर्व जातीत सापडतात. पूर्वी सरंजामदार म्हटला की वरच्या वर्गातील लोकांकडे बोट दाखविले जाई. आता ठोकताळा कालबाह्य झाला आहे. ज्याला सत्तेची किंवा अधिकारीपदाची ‘ऊब’ मिळाली, तो ‘वतनदार’ झालाच समजा. पूर्वी या वतनात साखर कारखाने, शिक्षणसंस्था, दूध संघ, बँका ही त्यांची शक्तिकेंद्र होत. नव्वदच्या दशकात देशात भांडवलशाहीचे वारे जोरात वाहू लागले. जनतेच्या मालकीच्या सहकारी संस्था मोडीत निघू लागल्या. शेतकरी, सभासद  वार्‍यावर सोडला. सहकारातून समृद्धीकडे फक्त घोषवाक्य उरले. समृद्धी मृगजळ ठरली. सभासद भिकेला लागला. सहकारी बँका बुडल्या, कष्टकरी, सामान्य माणसांचे हाल झाले. पण उलट वतनदारांची भरभराटच होत गेली. त्यांनी वार्‍याची दिशा पाहून रस्ता बदलला. महाराष्ट्राच्या अंगोपांगी नागरीकरणाचे वारे शिरले तसे त्यांनी  शहराकडे मोर्चा वळवला. शहरालगत जमिनी, हॉटेल्स, वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची शोरूम्स थाटली. यांना बिनदिक्कत हे सर्व मिळत गेले. शहरालगत एखादा बेभाव घेतलेला अथवा बळकावलेला ‘भूखंड’ काढला की निवडणुकीत एका पंचवार्षिकचा ‘श्रीखंड’ सहज खाता येतो हे तंत्र अनेकांना अवगत झाले. शहरी संस्कृतीने अनेक नवभांडवलदार जन्माला घातले. यातून दिवसेंदिवस ‘राजे’ श्रीमंत होत गेले आणि ‘रयत’ आत्महत्या करू लागली.

अगदी सामान्य कुटुंबातून येऊन लोकप्रतिनिधी, अधिकारी झालेल्या मंडळींनी काही वर्षांत उभे केलेले ‘साम्राज्य’ पाहिले तरी डोळे दिपून जातात. राजकारणात बाप खासदार, मुलगा आमदार, भाऊ कारखान्याचा चेअरमन, सून जिल्हा परिषदेत, मुलगी पंचायत समितीत, उरलासुरला कोण तर कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आहेच. अशी उदाहरणे ठळकपणे अवतीभवती दिसतात. यापलीकडे साम्राज्य विस्तारात शिक्षणसंस्था, कारखाने, पेट्रोलपंप, हॉटेल्स, जमिनी, बंगले, खाजगी कंपन्यांच्या एजन्सी, महागड्या  गाड्या वगैरे पाहिले की यांचा ‘विकास’ जनतेने नेमका कोणत्या मापकाने मोजावा हा प्रश्न पडतो?

सामान्य माणूस मात्र हतबलपणे हे सर्व पाहत असतो. त्याला वाटत असते हाच आपला ‘राजा’ आहे आणि हेच आमचे स्वराज्य. ‘साहेब’ मला ओळखतात. नावं घेऊन बोलतात; माझ्या खांद्यावर हात टाकतात. कधी तरी अधूनमधून फोनही येतो, तोच दाखवतो गावभर, साहेबांचा फोन आला, इतके मिनिटे बोलले अमुकतमुक, डिजिटल बॅनरवर साहेबांच्या मोठ्या फोटोशेजारी बारका फोटो उठून दिसतो चौकात. वाढदिवसाचेही असते आम्हाला अप्रूप खिशा रिकामा करून. निवडणुकीचा हंगाम लागला की आमच्याच घरी असते बैठक. लागते बोली, ठरतात भाव आणि गल्लीनुसार ‘खोक्यातील’ योजना, वाटायचे कंत्राट भेटते आम्हालाच. लग्न असो माती चुकवत नाहीत साहेब गावाला. म्हणून आम्ही असतो सातव्या आसमानावर; सभागृहात कधीच स्वत:साठी काहीच मागत नाहीत. आमच्यासाठी तर भांडत असतात सरकारशी. मग अजून तरी काय हवे असते आम्हाला वगैरे वगैरे..
इथली भाबडी माणसं यातच खुश म्हणून तर लोकशाहीच्या बुडाखाली ‘जाळ’ लागू लागला. दिवसाला एक बँक लुटून लुटारू पळू लागले व जनतेचा पैसा परदेशी खेळू लागला.

भावांनो तुमचे, साहेब मागत नाहीत सभागृहात स्वत:साठी कधीच काही हे जरी खरे असले तरी भेटत जाते बिनबोभाट सर्व काही त्यांना उलट... रस्त्यांवरच्या बेरोजगारांचा हातात पदव्या घेऊन चाललेला आकांत, पालावरची, आदिवासी पाड्यावरची, गावकुसाच्या बाहेरची रिकामी पोटं, रोज मरणाला आपलं करणारा शेतकरी, त्यांच्या बायकोचे उघडे कपाळ अन् हंबरडा फोडणारी त्याची चिल्ली-पिल्ली, खंगलेले मायबाप आणि उघडं बोडखं शिवार, गावातून शहरात रोज स्थलांतरित होणार्‍या हजारो वस्त्या. दिवसाढवळ्या लुटल्या जाणार्‍या योजना, शहरी झोपडपट्ट्यात गटारीच्या कडेला किड्या-मुंग्यासारखी जगणारी माणसं यांच्यासाठी तरी काहीही मागत नाही तुमचे ‘साहेब’ हे ही सत्यच ना..!!
( dr.gamohite@gmail.com) 

Web Title: 'feudalism in democracy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.