यशस्वी संसाराचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:45 PM2018-07-28T18:45:04+5:302018-07-28T18:45:32+5:30

विनोद : प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच एक शिक्षिका कार्यरत असते. अशावेळी ती हाती सापडलेला हक्काचा विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला सरळ वळण लावण्याचा प्रयत्न करते.

Formula for successful marriage | यशस्वी संसाराचा फॉर्म्युला

यशस्वी संसाराचा फॉर्म्युला

googlenewsNext

- आनंद देशपांडे

संसारात न पडलेल्या कित्येक संतांनी उत्तम संसार कसा करावा याचा उपदेश केलेला आढळून येतो. आपण जे केले नाही त्याबद्दल लोकांना सल्ले देण्याची मराठी परंपरा फार प्राचीन आहे असे आपल्या लक्षात येईल. याच पद्धतीने आम्हीही संसार यशस्वी होण्यासाठीचा फॉर्म्युला काय असेल यावर लिहिण्याचे ठरविले. पती-पत्नी माफक बुद्धिमत्तेचे असतील तर संसार फार यशस्वी होतो. दोघांच्याही डोक्याला कशाचा म्हणून कशाचाच त्रास होत नाही. तुच्छ विषय प्रतिष्ठेचे करण्याचा त्यांना मोह होत नाही. विनाकारण अबोला धरणे त्यांना आवश्यक वाटत नाही. पत्नीचे किंवा पतीचे कुणाचेही नातेवाईक घरी आले तर फरक पडत नाही.

माफक बुद्धिमत्ता असणाऱ्या कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, मग ते दोन पुरुष असोत की दोन स्त्रिया, की एक स्त्री आणि एक पुरुष असोत, ते नेहमी एकमेकांच्या बुद्धिमत्तेचा आदर करीत असतात. पत्नी बुद्धिमान आणि पती साधारण बुद्धिमत्तेचा असेल तर संसार हमखास यशस्वी होतो. असा संसार म्हणजे अनुभवी कोचने बिनडोक कॅप्टनला सांभाळून घेण्यासारखा प्रकार असतो. एकदा पत्नीचे श्रेष्ठत्व मान्य केले की, तीच कोच आणि कॅप्टन अशा दोन्ही भूमिका साकार करते. प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच एक शिक्षिका कार्यरत असते. अशावेळी ती हाती सापडलेला हक्काचा विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला सरळ वळण लावण्याचा प्रयत्न करते. 

पती बुद्धिमान आणि पत्नी माफक बुद्धिमत्तेची असेल, तर असे संसार यशस्वी होण्यासाठी काही अटी असतात. पहिली अट म्हणजे पत्नीने आपण पती इतके हुशार नाहीत हे मान्य करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ती पतीचा आदर करील आणि संसार यशस्वी होईल; पण आपल्याकडे बुद्धिमत्तेबद्दल फार गैरसमज असतात. खुर्चीत बसणाऱ्या प्रत्येकाला आपण हाताखालच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हुशार आहोत असे वाटते. बरेचसे प्राध्यापक आपला पगार मोठा आहे म्हणून स्वत:ला बुद्धिमान समजतात. पत्नीचा असाच गैरसमज झाला तर दोर एकीकडे ओढणे चालू आहे, पण पतंग भलत्याच दिशेने झेपावत आहे असे दृश्य दिसू शकते.

आता राहिला प्रश्न दोघेही प्रखर बुद्धिमान असतील तर काय होईल? ते नंतर पाहू. आमचे नेहमीचे साधे, सरळ, सुटसुटीत, सोपे, सहज आणि सुलभ असणारे लिखाण आज क्लिष्ट झाले आहे ना? एकतर विषय संसारासारखा क्लिष्ट आहे आणि दुसरे म्हणजे गंभीर, जड आणि भारदस्त लिहिल्याशिवाय लेखक ‘मोठा’ होत नसतो हे आम्हाला उशिरा का होईना, पण कळले आहे, त्याचाच हा छोटासा प्रयोग. दोघेही प्रखर बुद्धिमान असतील तर दिशाहीन झालेले आणि हेलकावत जाणारे जहाज भर समुद्रात बुडण्याचा धोका असतो. वादविवाद, भांडण यांनी उग्र स्वरूप धारण केले तर संसारही फेल होऊ शकतो. आजकाल घटस्फोटाचे प्रमाण शहरांमध्ये का वाढले आहे याचे उत्तर इथे सापडेल. पती मोठ्या कंपनीत भल्या मोठ्या पॅकेजवर आणि पत्नीही दुसऱ्या कुठल्यातरी कंपनीत तसल्याच मोठ्या पॅकेजवर असेल तर मतभेद वाढण्याचा धोका अधिक असतो. दोघेही बुद्धिमान, कमावते, स्मार्ट, मग एकत्र कसे राहणार? बुद्धी दुसऱ्यासमोर शरण जाण्याला किंवा दुय्यम भूमिका घेण्याला विरोध करीत असते. फ्रायपॅनला फ्रायपॅन लागते, संगणकाला संगणक लागतो आणि संसार भरकटतो. शिवाय वेगळे झाले तरी कुणी कुणावर अवलंबून नाही.

आमच्या काळी असे नव्हते. बाजारात गेल्यानंतर दहा रुपयांची भाजी घ्यायची असेल तर नवरोबा थाटात खिशातून नोट काढून बायकोला देत असत आणि यात दोघांनाही काही वावगे वाटत नसे. दोघेही कमावते असतील आणि इंजिन डबल असेल तर असंख्य प्रश्न निर्माण होतात. एक इंजिन नांदेडकडे आणि दुसरे औरंगाबादकडे ओढत असेल तर गाडी परभणीच्या ठेसनावरून हलणारच नाही. दोघांनीही जास्त जोर लावला तर डबे आणि सर्व साहित्य विलग झालेले दिसून येईल. संसार यशस्वी होण्याचा मार्ग परस्परांच्या समजूतदार पणाच्या पुलावरूनच जातो, असा लोकांचा गैरसमज आहे.

या यशाची गुरुकिल्ली उभयतांचे बुद्धिमत्तेचे संतुलन कसे आहे, यावरच अवलंबून असते. यावर उपाय म्हणजे पत्रिका, रक्तगट किंवा गुण जुळवीत बसल्यापेक्षा दोघांचेही बुद्ध्यांक तपासले पाहिजेत. भरपूर तफावत दिसली तरच ते लग्न ठरविले पाहिजे. बुद्ध्यांक कमी जास्त असतील तरच संसार सुखाचा होतो, भले मग पत्रिका जुळो अथवा न जुळो. आमच्या मते पत्नीचा बुद्ध्यांक हा संसारामधील कळीचा मुद्दा आहे. पारंपरिक समजुतींना फाटा देऊन यशस्वी संसाराची बुद्ध्यांकावर आधारित थेअरी मांडणारे आम्ही पहिले लेखक आहोत याचा तुम्हालाही अभिमान वाटेल, यात शंका नाही. मराठवाड्याने क्रांतिकारी विचार देशाला नेहमी दिले आहेत, पण लक्षात कोण घेतो? आमच्या लिखाणाला खोली नाही असे म्हणणाऱ्या नतद्रष्टांनी हा विचार करावा.

( anandg47@gmail.com )

Web Title: Formula for successful marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.