परिपूर्ण असा गोकुळेश्वर महादेव मंदिर समूह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:15 PM2018-02-01T19:15:25+5:302018-02-01T19:17:00+5:30
स्थापत्यशिल्प : कर्पुरा नदीच्या काठी वसलेल्या यादवकालीन प्राचीन नगरी, चारठाणाचा ओझरता आढावा आपण मागे नृसिंह मंदिर पाहताना घेतला होता. कल्याणी चालुक्य काळात मोजकी वस्ती असलेली नगरी, यादव काळात विस्तारलेली दिसते व वाढत्या वस्तीच्या धार्मिक व लौकिक गरजांच्या पूर्ततेसाठी मंदिर, मठ व बारवांची निर्मिती केली गेली.
- साईली कौ. पलांडे-दातार
चारुक्षेत्र नावाने ओळखल्या जाणार्या चारठाणा नगरीच्या पूर्व दिशेला गोकुळेश्वर महादेव मंदिरांचा समूह आढळतो. संक्रमणाच्या काळात गावातील काही मंदिरे मातीच्या ढिगाराखाली बंदिस्त करण्यात आलेली होती. काही वर्षांपूर्वी राज्य पुरातत्व खात्याने हाती घेतलेल्या ‘scientific clearance’ उपक्रमात गोकुळेश्वर मंदिर बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. गावातील लोकांसाठी हे मंदिर मुख्य असून, दररोज वारकरी येथे भजन, कीर्तन करताना दिसतात. तसेच हरिनाम सप्ताहासारखे कार्यक्रम येथे पार पाडले जातात.
गोकुळेश्वर मंदिर हे त्रिकूट असून पश्चिमाभिमुख आहे. सुरुवातीला काटकोनात दगडी चौथरा दिसतो. जो कदाचित वाहन मंडप किंवा प्रवेशद्वार असावे. आजही तेथे एक तुटलेला व एक अखंड नंदी दिसतो. मधल्या मोकळ्या जागेत मूळ मंदिराच्या रंगशिलेचे अवशेष दिसतात. मुखमंडप, सभामंडप, तीन गर्भगृह व त्यांचे तीन अंतराळ व निरंधार प्रदक्षिणापथ, असा सर्वसाधारण तलविन्यास आहे. पायर्या चढून आपण स्तंभयुक्त खुल्या मुखमंडपात येतो. नागशीर्ष असलेल्या दोन खांबांवर स्तंभ पुत्तलिका नावाच्या स्त्री प्रतिमा कोरल्या आहेत, तसेच मधल्या चौकटीत भारवाहक कोरले आहेत. छोट्या आकाराच्या आठ स्त्री देवता व देवतांच्या मूर्तींची रांग स्तंभ मध्यात दिसते. स्तंभ पीठावर चारही बाजूंनी देवता मूर्ती आहेत. स्तंभ अलंकरण मंदिराच्या इतर भागापेक्षा अधिक व वेगळे आहे. कदाचित हे पूर्व यादव काळातील मंदिराचे स्तंभ आज दिसणार्या उत्तर यादव काळातील मंदिराला बसवलेले असावे. सभामंडपाची द्वारशाखा नवीन बसवली असून, त्यावर ललाटबिंबावर गणपती कोरला आहे. सभामंडपात चौकोनी रंगशिला असून, ‘उक्षिप्त’ वितान असलेले छत आठ खांबांवर पेलले आहे. प्रवेशानजीक उंच कक्षासने असून, बसण्याची सोय केलेली दिसते. सभामंडप सर्व दिशांनी बंदिस्त आहे व तीन दिशेला तीन गर्भगृहांकडे जाणारे तीन अंतराळ आहेत. तिन्ही अंतराळात दोन्ही बाजूच्या भिंतींवर रिकामी देवकोष्टे आहेत. द्वारशाखेवर अत्यंत साधी असून स्तंभयुक्त आहे व ललाटबिंबांवर गणपती अंकित आहेत. मुख्य गाभार्यात शिवपिंड नंतरच्या काळात स्थापलेली आढळते. मंदिरावर बाकी काही अलंकरण दिसत नाही. बाहेरील बाजूने तीन गाभारे नव्याने बांधलेले असून, शिल्पविरहित आहेत. तिन्ही गाभारे पंचरथ असून, मूळ शिखर अस्तित्वात नाही.
गोकुळेश्वर मंदिराशेजारी यादवकालीन मठाची इमारत आहे. मठाच्या सर्वसाधारण रचनेप्रमाणे मुखमंडप आणि बंदिस्त सभामंडप असून, त्यात यादवकालीन खांबांवर पेललेले समतल छत आहे. पुढची बाजू सोडून उरलेल्या तीन भिंतींना समांतर भुयार असून, त्यात उतरण्यासाठी खिडकीवजा कोनाड्यातून प्रवेशद्वार आहे. इथे व्यायामशाळा होती. त्या काळात भिंतीवर काढलेली भित्तीचित्रे अजून शाबूत आहेत. मुखमंडपाच्या स्तंभांवर आचार्यांची प्रतिमा तसेच शिल्प छल दाखवला आहे. मठाच्या मुखमंडप परिसरात सापडलेल्या मूर्तींचा खच पडला आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या ह्या मूर्तींमध्ये गरुडारुढ विष्णू, लक्ष्मी, गणपती, नागशिल्पे, हत्ती, वीरगळ, विविध विष्णू प्रतिमा, शिवलिंग इतर मूर्तींचा समावेश आहे. मठ आणि मंदिराच्या मागे प्रशस्त बारव असून, तिला तिन्ही बाजूंनी प्रवेश आहे. चारही बाजूंनी स्तंभयुक्त ओसरी असून, दुसर्या टप्प्यातून तीन बाजूंनी पायर्या पाण्यापर्यंत जातात. एकूण २४ मुख्य देवकोष्टे असून, प्रवेशाला ६ देवकोष्टे आहेत. पूर्व बाजूला मुख्य देवता स्थापन करण्यासाठी गाभारासदृश जागा ठेवण्यात आली आहे, पण आज ती रिकामी आहे. बारव चार टप्प्यात विभागली गेली आहे.
गोकुळेश्वर मंदिराच्या अंगणात एक वैशिष्ट्यपूर्ण पीठ पडले असून, त्यावर हंस, गरूड आणि खंडित नंदी कोरले आहेत. इतरत्र सापडणार्या पीठांशी तुलना करता असेच पीठ आपल्याला लोणार, बुलडाणा येथील दैत्यसुदन मंदिरातील त्रैपुरुष मठात आढळते. तेथील मूर्ती व चारठाणा येथील पीठावरील वाहने पाहता हे पीठ त्रैपुरुष देवांचे म्हणजेच ब्रह्मा- विष्णू- महेश यांचे आहे, याची खात्री पटते. पीठाचा आकार आणि गोकुळेश्वर महादेव मंदिर समूह बघता हे पीठ बारवेतील रिकाम्या जागी किंवा मठात असण्याची शक्यता वाटते. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी त्रिपुरुष रुपातील आराधना येथे होत असावी. गोकुळेश्वर महादेव मंदिर, मठाची वास्तू व प्रशस्त बारव ही एक संलग्न रचना असून, एकमेकांना पूरक, धार्मिक व लौकिक व्यवहार येथे होत असावा. शिलालेख व इतर पुराव्यांअभावी ह्याचे निर्माते व निश्चित काळ ठरवता येत नाही. पण एकूण स्थापत्य शैलीवरून हा समूह १३ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधला असावा. ग्रामस्थांच्या विविध उपक्रमांमुळे आजही तेथे माणसांचा वावर व वापर आहे ही एक चांगली गोष्ट आहे. चारठाण्यातील अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्ती मात्र संगतवार नोंदणी करून सुरक्षित मांडून ठेवणे गरजेचे आहे.
( sailikdatar@gmail.com )