गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 07:24 PM2018-04-09T19:24:08+5:302018-04-09T19:24:51+5:30
लघुकथा : समद्या पंचक्रोशीत रामजीची लई घसेट झालेली. माणसांनी त्याच्यावर विश्वास टाकलेला. त्या विश्वासाला तो पात्र ठरला. रामजीनं गावाबाहेर प्लॉट घेतला. आपल्या कष्टानं बांधून काढला. पणिक त्याला सलाप काही टाकणं झालं नाही.
- महेश मोरे
शेतात हळद काढणीचा हंगाम सुरू झाला होता. गव्हाचं खळं सुरू होतं. हळद काढणी झाली, की रामराव सोळंकेचा ढोल सुरू होतो. रामराव व सुमनबाई लई कष्टाळू. त्यांनी जरोडा गावातील हगणदारीमुक्तीला दिस-रात मदत केली. गाव हगणदारीमुक्त झालं. सरकारनं बक्षीस दिलं. लग्नाच्या दारी दिस-रात राबणारा रामराव, कुठल्याही कामाला धावून जाणारा रामराव. डोळस नेते कृष्णा पाटलाचं गाव त्याला रामजी म्हणतं. प्रत्येकाच्या ओठावर नाव रामजी असतं. रामजी अन् सुमनबाई राबराव राबून विठ्ठलाच्या रंगात रंगले. ढोल सुरू झाला की, रामजीला कामठा, घोडा, येलकी, बेलधर, येळेगाव, मरडगा, बेलमंडळ, साळवा उन्हाळाभर ढोल सुरूच. शेतीला जोडधंदा म्हणून रामजीनं ढोल विकत घेतला होता. गावोगावची माणसं गावात ढोल असून, रामजीच्या ढोलबिगर हळदीचा ढोल करीत नव्हती.
समद्या पंचक्रोशीत रामजीची लई घसेट झालेली. माणसांनी त्याच्यावर विश्वास टाकलेला. त्या विश्वासाला तो पात्र ठरला. रामजीनं गावाबाहेर प्लॉट घेतला. आपल्या कष्टानं बांधून काढला. पणिक त्याला सलाप काही टाकणं झालं नाही. तीन पोरी उजवल्या. पोरं कष्टाळू निघाले. तसं पाहिलं तर रामजीच्या जीवनात लई आघात आले. एकदा त्याला जबरदस्त इलेक्ट्रिकचा शाट लागला. पोलवरून खाली पडला. मरता-मरता वाचला. एस.टी. स्टँडवर त्याला जीपनं उडविलं. त्यातूनही तो बचावला. त्यानं हिंमत सोडली नाही. त्याच्या ढोलच्या बरिंग गेल्या. तो बाळापूरहून येताना आॅटोनंच पल्टी खाल्ली. त्यालं मार लागला. यावेळी मातरं तो बराच खचला व्हता. त्याच्या जवळ बसलेला सटवाजी भिसे त्याला सोडून गेला होता. तो मोठा अपघात होता. काही दिवसांनी रामजी हिंडूफिरू लागला. दवाखान्यातल्या बिलानं अधिकच भरडला होता.
रामजीचा ढोल कायमचा बंद झाला होता. आवंदा शेतात हळद काढायची राहिली होती. उन्हाळा चढत होता. अन् पावसाळी ढग दाटून आले. थोडा वेळ पाऊस पडला पणिक आभाळ दाटून होतं. पाऊस उघडल्यानं रामजी घरातून बाहेरच्या वट्यावर येऊन बसला. रस्त्यानं चाललेला आबा त्याच्या जवळ येऊन बसला. रामजी म्हणाला, ‘मायला माणसं बदलतात तसा निसर्गबी बदलला.’ ‘तोंडातला तंबाखू पचकन थुकत आबा म्हणाला, ‘आभाळाला टॉपअप फिरी हाये काय?’ रामजी म्हणाला, ‘कंपनीच त्याची हाये... त्यालं काय मोबाईल टू मोबाईल फिरीच.’ ‘पणिक म्या म्हणतो, रामजी आरं यानं पावसाळ्यात पडावं. जवा कापसाला, सोयाबीनला पावसाची भूक हाये तवा पडावं. तवा पडत नाई. आता आला बघ नासाडी करायला.’ ‘सोसासाटी अन् पचाडी कुणब्याच्या पाचवीला पुंजलेली हाये. त्याची काही चूक न्हाई आबा. आली लहर अन् केला कहर. आता मला सांगा आपल्या त्या अंगदला पहिली बायको असताना दुसरी केली.’ ‘तसं न्हाई रामजी पहिली पिकत नव्हती, म्हणून दुसरी केली.’ ‘मला तर काही म्हणा आबा जरा डाऊटच येते. आता दुसरी पिकली न्हाई म्हणून तिसरी करू न्हाई म्हजी झालं.’ ‘तुवं बोलणं मला पटते.’ ‘काही म्हणा आबा मव्ह बोलणं नको त्याला झोंबतं.
तुम्ही काई त्याची सपादनी करू नका. त्याला तपासून घ्या की.’ ‘बरं तू आवंदा माती तपासून घेणार व्हतास त्याचं काय झालं.’ ‘काय आबा पहिलं लाकड्या नांगरानं जमीन नांगरल्या जायची. जमीन भुसभुशीत होती. मग लोखंडी आला. आता तर ट्रॅक्टर आला. हा सगळा रासायनिक खताचा खेळ.’ ‘हो गड्या जमीन निबरडक झाली.’ ‘या सगळ्याला कारणीभूत आपणच आहोत. वानरं सतवायलीत म्हणून आपण झाडं तोडली. असा नको त्या येळला पाऊस पडतो.’ ‘मग आभाळबी आवकाळीच अंगदवनी.’ ‘मायला, नाव काढू नका त्याचं.’ आबा उठला घराकडं गेला. बैठक मोडली. सगळ्या शेतकऱ्याच्या हळदी काढायला आल्या होत्या. गव्हाची काढणी सुरू होती. एकदमच पाऊस सुरू झाला. पहाटं नुसतं धुकंच... धुकं... दुपारी पाऊस... रात्री पाऊस... उन्हाळ्यात पावसाळा अन् हिवाळा... रात चढत होती. अवकाळी पाऊस वाढत होता. रामजीची हळद काढायची राहिली व्हती. त्याला काळजी वाटू लागली. आता हळदीला कोंब फुटणार. ती पाचवणार. अवकाळी पावसाचा रामजीला तडाखा बसला होता. सुमनबाई बखळ विवळत होती. रामजीच्या ओठावर माय सखूबाईचे शब्द आले. ‘बापू, माणसाला हळद केली, तर पिवळंच करते, न्हाई तर हिरवंच करते.’ रातभर रामजीच्या जीवाची घालमेल होत होती.
( maheshmore1969@gmail. )