सुखी माणसाचा सदरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:37 PM2018-02-28T20:37:21+5:302018-02-28T20:38:44+5:30

ललित : कुठं कोण पांघरून बसतंय तेच कळत नाही; पण इमल्यावर इमले रचून झाले अन् राशी मांडून झाल्या धनाच्या... हिरेमाणकांनी लगडून गेला कोपरा नि कोपरा... दूधदुभत्याच्या वाहत राहिल्या नद्या तुडुंब भरून; पण तिथंही गवसलाच नाही सदरा सुखाचा, तर झोपडीत निजणार्‍यांची चंद्रमौळी व्यथा काय सांगावी?

Happiness | सुखी माणसाचा सदरा

सुखी माणसाचा सदरा

googlenewsNext

- ज्योती कदम 

किती दूरवर चालत आलोय आपण सगळेच... सुखाचा सदरा शोधत-शोधत! दगडावर दगड घासून ठिणगी निर्माण केली तेव्हापासून शोधतोय हा सदरा प्रत्येक जण आपापल्या परीनं... भटकत-भटकत पार रानोमाळ धुंडाळत जायचे पाय पोटातल्या खळगीसाठी... टीचभर खळगी; पण तिचं अस्तित्व किती मोठ्ठं... चाक गरगरायला लागलं तसं फेकून दिली सगळी दगड-धोंड्याची हत्यारं अन् फुलवली कितीतरी रानं... खात राहिलो फळं-कंदमुळं! हळूच बांधलं की गवताचं इवलसं खोपटं... त्यात तीन दगड... पेरली त्यात लालभडक चकचकीत ठिणगी अन् शेकत राहिलो भुकेला आलटून-पालटून त्याच त्या निखार्‍यांत!! टम्म फुगत राहिला काळ चुलीवरच्या भाकरीसारखा... नवं कितीतरी सामावत गेलं नि जुनं निखळत राहिलं; पण शाश्वत टिकली एकच गोष्ट सुखाच्या सदर्‍याचा शोध!

कुठं कोण पांघरून बसतंय तेच कळत नाही; पण इमल्यावर इमले रचून झाले अन् राशी मांडून झाल्या धनाच्या... हिरेमाणकांनी लगडून गेला कोपरा नि कोपरा... दूधदुभत्याच्या वाहत राहिल्या नद्या तुडुंब भरून; पण तिथंही गवसलाच नाही सदरा सुखाचा, तर झोपडीत निजणार्‍यांची चंद्रमौळी व्यथा काय सांगावी? मखमलचा, मलमलचा की रेशमाचा असेन हा सदरा? चंद्रतार्‍यांचा साज असेन का त्यावर? उगा प्रश्न उगाळत राहायचं काळाच्या सहाणेवर... दरवळणार नाहीच उत्तरं कधी त्यामधून... सुवर्णमृगाचा ध्यास घडवत राहिलं रामायण अन् लाक्षागृहाच्या ज्वालेत खदखदत राहिलं महाभारत... अजूनही तसंच; पण सुखाचा सदरा काळानं कुण्या खुंटीवर अडकवलाय कुणास ठाऊक?

या बिनभिंतीच्या शाळेत कितीदा तरी उभं केलं जातं आपल्याच सावलीला कडक तळपत्या उन्हात... तरी कुठं थांबतो आपण... शोधाच्या शोधात शोधत राहतो परत परत तोच शोध... सुखाच्या सदर्‍याचा!!  पण कधी-कधी अचानकच फुलावरचं दव मनावर सांडत जातं नि तो दवभारला क्षण चक्क गुपचूप आणून घालून टाकतो आपल्याला तोच सुखाचा सदरा... काही क्षणांसाठी तरी. तेव्हा फुलपाखरं फडफडत राहतात पोटात अन् आभाळाच्या पार पल्याड जातो आपला झोका.. झुले घेत राहतं मन नि झुलवत राहतं झोक्यालाही त्याच्या न दिसणा-या फांदीसहित. काळ जेव्हा हळुवारपणे लावत रहातं मायेचं आस्तर या सदर्‍याला तेव्हा आपण चक्क लहान होऊन निजून जावं काळाच्या मांडीवर नि थोपटून घ्यावं स्वत:ला सदर्‍याची ऊब मनात साठवत.

अरेच्चा हे काय पण आपण फक्त शोधत राहिलो सुखी माणसाचा सदरा.. त्यातला माणूस तर शोधलाच नाही कधी! त्याला तर कवडीची किंमत दिलीच नाही कधी..वाहवत ठेवले रक्ताचे पाट. थेंबभर पाण्यासाठी तगमगत ठेवला माणूस अन् मिष्टान्नांवर ताव मारत विसरलोच आपण दारातली भुकेली साद. माणसानं माणसाला माणसासारखं वागवलंच नाही कधी! आता एक करु या मनातल्या सगळ्या भौगोलिक सीमांचं निर्माल्य टाकून देऊ पृथ्वीकुंडाच्या तळाशी नि लावू या इवलंस रोप माणुसकीचं! हिरवंगार नि टवटवीत ओल पांघरलेलं. एक माणूस दिसेल मस्त शीळ वाजवत मजेत चाललेला.. होय त्याच्या अंगावर असणार आहे सुखी माणसाचा सदरा!!
(Jyotikadam07@rediffmail.com)

Web Title: Happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.