स्वर्गीय सुरांची गानसरस्वती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 07:14 PM2018-04-09T19:14:17+5:302018-04-09T19:17:01+5:30

प्रासंगिक : प्रख्यात गायिका म्हणून किशोरी अमोणकर जगप्रसिद्ध होत्या. त्यांचे  गायन म्हणजे स्वर्गीय सूर, स्वर्गीय आनंद, पारंपरिक शिस्तबद्ध, आलापचारी, तानांचे सरळ मिश्र, अलंकारिक, कूट, गमक, सपाट असे अनेक प्रकारात होते. त्यांनी घराण्याची शिस्त पाळताना गाणे रुक्ष आणि वरवरचे होऊ न देता त्या जे स्वरसौंदर्य वापरत ते अजोड होते. अशा या सर्वगुणसंपन्न गायिकेची १० एप्रिल रोजी जयंती आहे. तर त्यांचा पहिला स्मृतिदिन नुकताच ३ एप्रिल रोजी झाला. अशा या स्वर्गीय सुरांच्या गानसरस्वतीच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

Heavenly Suras Ganasaraswati ... | स्वर्गीय सुरांची गानसरस्वती...

स्वर्गीय सुरांची गानसरस्वती...

googlenewsNext

- डॉ. वैशाली देशमुख

जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका श्रीमती मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या म्हणजे स्वरलयतपस्विनी, गानसरस्वती किशोरी अमोणकर. या स्वरमायलेकी म्हणजे किशोरीतार्इंचा जन्म जयपूर घराण्याच्या वारसा जपणाऱ्या घरंदाज कलावंत म्हणून ज्यांचा  नावलौकिक आहे अशा मोगुबार्इंच्या पोटी १० एप्रिल १९३१ रोजी झाला. किशोरीतार्इंनी गाणं हे मोगुबार्इंच्या उदरात असल्यापासून ऐकावयास सुरुवात केली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण मोगुबार्इंना तालीम देण्यासाठी उ.अल्लादियाँ खाँ साहेब रोज सायंकाळी मार्इंच्या घरी येत आणि मोगुबार्इंचा तो रियाज तार्इंनी उदरात असल्यापासून ऐकला आहे. पुढे किशोरीतार्इंचा आवडता छंद म्हणजे तालमीला खाँसाहेब आले असताना त्यांच्या मांडीवर जाऊन बसणे, अशा वातावरणात किशोरीताई लहानच्या मोठ्या झाल्यात; परंतु अचानक १९३९ साली तार्इंचे वडील माधवदास भाटिया यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

वडिलांचा मृत्यू झाला आहे हे समजण्याचे किशोरीतार्इंचे वय देखील नव्हते, अशा खडतर परिस्थितीत मोगुबार्इंची एकच प्रबळ इच्छा होती आणि ती म्हणजे किशोरीतार्इंना संगीत साधनेत सतत ठेवायचे. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे मोगुबाई किशोरीतार्इंना क्वचितच तालीम देऊ शकल्या. मात्र, किशोरीतार्इंचे कान घरकाम करीत असताना देखील मोगुबार्इंच्या इतर शिष्यांना तालीम देण्याकडेच असायचे. त्यावेळी एखादी नवी स्वरवेल कानाला जाणवली की लगेच त्याचा रियाज गळ्यातून सुरू करीत असत. ही गोष्ट मोगुबाई म्हणजेच मार्इंच्या लक्षात आल्याने त्यांनी किशोरीतार्इंना सर्व प्रकारचे संगीत ऐकता यावे यासाठी त्या काळात रेडिओ घेऊन दिला व त्यातील अनेक गाण्यांमधील हरकती ताई गळ्यातून रियाजाने जशाच्या तशा उतरवीत असत. पुढे मार्इंनी किशोरीतार्इंना अतिशय सूक्ष्मतम् बारकाव्यासहित गायनाची तालीम दिली.

स्वरसाधना करताना स्वरांचीच साधना सर्वप्रथम करायला हवी. स्वरज्ञान झाल्यानंतरच अलंकाराच्या मागे लागणे योग्य हा विचार त्या वारंवार करीत असत व त्या दिशेने त्यांनी गायनाची सुरुवात केली. बुद्धिवादी गायिका या विशेषणाबरोबरच त्यांनी सतत ज्ञानाचा ध्यास केला होता. गाणे हे स्वरांचे आहे. स्वरांच्या भाषेचा अभ्यास अधिक महत्त्वाचा असे, त्यांना वारंवार वाटत असे आणि म्हणूनच ताई स्वरविश्वापासून आणि स्वरभाषेतून कधीच बाहेर आल्या नाहीत. या सर्व तालमीत, रियाजात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती आणि ती म्हणजे त्यांचा आवाज आठ-नऊ वर्षे गेला होता. या परिस्थितीतही न डगमगता त्यांनी आपली वाचनाची, मनन, चिंतनाची सवय कायम ठेवली आणि या काळात संगीतावरील अनेक ग्रंथांंचे विपुल वाचन केले.

खरंतर नादमयीमधुर आवाजाची देणगी घेऊनच किशोरीतार्इंचा जन्म झाला. म्हणूनच काही उपचार घेतल्यानंतर १० वर्षांच्या काळानंतर आवाज परत आला. ही तार्इंच्या जीवनातील अतिशय आनंदाची घटना होती. जे मनन, चिंतन त्या कालखंडात केले होते ते प्रत्यक्ष साकारता येईल याचा आनंद काय असतो ते तुम्ही आम्ही विचार करू शकणार नाही. त्यानंतरचे तार्इंचे गायन म्हणजे स्वर्गीय सूर, स्वर्गीय आनंद, पारंपरिक शिस्तबद्ध, आलापचारी, तानांचे सरळ मिश्र, अलंकारिक, कूट, गमक, सपाट असे अनेक प्रकार तसेच घराण्याची शिस्त पाळताना गाणे रुक्ष आणि वरवरचे होऊ न देता त्या जे स्वरसौंदर्य वापरतात ते अजोड आहे. बंदिशीतील शब्दांचा उपयोग त्या अतिशय चोखपणे करीत असत. या शिस्तीतल्या गाण्यामध्ये आणखी एक सौंदर्य म्हणजे चिजेचे तोंड मध्य सप्तकात असेल तर ज्या स्वरापासून सुरू होत असेल नेमक्या त्याच स्वरापर्यंत आलाप, तान, बोलतान असते. सुरुवातीपासूनच तार्इंचा स्वभाव आलापचारीकडे होता, असे माई सांगत असत.

किशोरीताई म्हणजे गाण आणि फक्त गाणचं याशिवाय जीवनात त्यांनी कधी दुसरा विचारच केला नाही. म्हणूनच त्यांची प्रत्येक मैफल आपल्याला स्वर्गीय सुख देऊन जात असे. सतत स्वरांच्या रागाच्या सान्निध्यात त्या असायच्या, त्यातील भाव, रसनिष्पतीचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असायचा. तार्इंचा स्वरांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. स्वर हा जिवंत आहे, त्याकडे त्याचदृष्टीने त्या बघायच्या आणि म्हणूनच तार्इंचे गायन, तार्इंची प्रत्येक मैफल, तार्इंचा प्रत्येक सूर ताईचा प्रत्येक स्वरामागचा विचार यामध्ये कायम जिवंतपणा असलेला दिसून येतो. म्हणूनच तार्इंचे स्वर अजरामर आहेत. ३ एप्रिल २०१७ रोजी गानसरस्वती किशोरीताई नादमय वातावरणात विलीन झाल्या त्यांना कोटीकोटी वंदना.

(लेखिका प्रख्यात गायिका असून औरंगाबादच्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात संगीत विभागाच्या प्रमुख आहेत.)
 

Web Title: Heavenly Suras Ganasaraswati ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.