तिच्या आयुष्याचा सौदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:17 PM2018-07-07T16:17:05+5:302018-07-07T16:18:25+5:30

दिवा लावू अंधारात : अंबाजोगाई तालुक्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या असणाऱ्या आणि नावाजलेल्या गावातील ही गोष्ट. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया आणि दिवंगत प्राचार्या शैलाताई लोहिया यांच्या ‘मानवलोक’ संस्थेचं या भागात प्रचंड मोठं काम. विविध क्षेत्रांत ‘मानवलोक’नं काम उभं केलं आहे. डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या कन्या अरुंधती लोहिया या याच संस्थेच्या माध्यमातून स्त्री आधार केंद्र चालवितात. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अरुंधती यांनीही उपेक्षित महिलांसाठी मोठं काम उभं केलं आहे.

 Her life's deal | तिच्या आयुष्याचा सौदा 

तिच्या आयुष्याचा सौदा 

googlenewsNext

- दीपक नागरगोजे 

शांतिवनच्या कार्यालयात बसलो असताना अरुंधतीतार्इंचा फोन आला. माझ्याकडं एक मुलगी आली आहे. ती ज्या शाळेत शिकत होती तिच्या मुख्याध्यापिका तिला घेऊन आल्या आहेत. ती आत्महत्या करायला चालली होती; पण तिच्या मुख्याध्यापिकेनं तिला अडवलं. जगायचंच नाही म्हणत असणारी मुलगी आता शांत झाली असून, तिला आता शिकायचंय. ती १६ वर्षांची असून, शांतिवनमध्ये राहायला तयार आहे. आपल्याला तिला प्रवेश देता येईल का? आणि हो तिला एक छोटं १० महिन्यांचं बाळही आहे.

कसलाही विचार न करता मी त्यांना म्हणालो, तिला बाळासह शांतिवनला पाठवून द्या. तिला शांतिवनपर्यंत घेऊन येण्याची जबाबदारीही या मुख्याध्यापकबार्इंनी घेतली. दुसऱ्याच दिवशी सकाळी मुख्याध्यापकबाई स्नेहल (बदललेले नाव) आणि तिच्या बाळाला घेऊन शांतिवनमध्ये आल्या. मी त्यांना कार्यालयात बोलावलं. कमालीची सामाजिक जाणीव असणाऱ्या या बार्इंचा खूप आदर वाटला. संकटात सापडलेल्या एका सुंदर, हुशार मुलीचा आणि तिच्या इवलुशा बाळाचा जीव त्यांनी वाचवला होता. मी स्नेहलला विचारलं, तर ती सांगू लागली.

अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या कुटुंबात स्नेहलचा जन्म झाला. आई-वडील भिक्षुकी करणारे. तीन मुली आणि एक मुलगा, एवढा मोठा प्रपंच चालवणं,  मुलांचं शिक्षण करणं हे भिक्षुकी करून शक्य नाही. त्यातच वडील दारूच्या आहारी गेलेले. त्यामुळं इतर काही करणं शक्य नाही. मिळाली तर आई मजुरी करीत असे; पण त्यातूनही फार काही मिळायचं नाही. अशा परिस्थितीत खर्च भागवताना प्रचंड ताणतणाव व्हायचा. त्यातच मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी सावकाराकडून घेतलेल्या पैशाचं व्याज प्रचंड वाढत होतं. पाच माणसांचं कुटुंब चालवताना त्यांची उपजीविका भागावणंच कठीण, तर कर्ज फेडणार कुठून?

अशा परिस्थितीत पैशाची अडचण भागवण्यासाठी माणूस काहीही करीत असतो. स्नेहलच्या आईकडील नात्यातील एका माणसाची नजर गोऱ्यापान, उंच आणि सुंदर दिसणाऱ्या १३ वर्षांच्या स्नेहलवर गेली. हे कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचं त्यानं हेरलं. स्नेहलच्या आईला विश्वासात घेऊन त्यानं तुम्ही आर्थिक अडचणीत आहात. स्नेहलसाठी एक चांगलं स्थळ मी आणलं आहे. बघा, होऊन जाईल लग्न. तुम्हीही जबाबदारीतून मुक्त व्हाल. माहेरच्या नातेवाईकानं दिलेला सल्ला स्नेहलच्या आईला पटला. तिनं त्या नातेवाईकाला बरोबर घेऊन परभणी जिल्ह्यातील त्या तालुक्याच्या गावात राहणाऱ्या पाहुण्यांच्या घरी भेट दिली. १५ वर्षांचा मुलगा त्यांनी स्नेहलसाठी दाखवला. मुलाचं वय लहान आणि घरात दिसणारं विचित्र वातावरण, अशी तेथील एकूण परिस्थिती पाहता मुलगी द्यावी का नाही, असा विचार तिच्या मनात येऊ लागला.

स्नेहलच्या आईच्या मनात काय चाललंय हे त्या नातेवाईकानं ओळखलं. शिकार हातची जाऊ शकते म्हणून त्यानं तिचं मन वळविण्याचा खूप दिवस प्रयत्न केला; पण त्याचा काही फायदा होत नाही असं लक्षात आल्यावर त्या मुलाच्या वडिलांना घेऊन तो स्नेहलच्या घरी आला. तुम्ही मुलगी द्या, आम्ही तिला चांगलं सांभाळू, असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला; पण त्याचाही काही उपयोग होत नाही. मग त्यांनी या कुटुंबावर असणारं कर्ज आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेतला.  स्नेहलच्या आईला आम्ही तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी मदत करतोत असे म्हणाले. लग्न करून घेऊन दोन लाख रुपये देऊ असंही म्हणाले. मुळात मुलीचं लग्न करण्यासाठी हुंडा देऊन खर्च करावा लागत असताना हे लोक आपल्याला पैसे देऊन लग्नही करून घेत आहेत, हे ऐकून ती मोहात पडली. व्यवहार ठरला. सर्व काही माहीत असतानाही पैशाच्या आमिषाला बळी पडून तिनं आपल्या मुलीचा दोन लाखांत सौदा केला आणि लग्न हे गोंडस नाव त्याला दिलं. माहेरच्या नातेवाईकानं दाखविलेल्या मोहाला बळी पडून स्नेहलच्या आईनं आपल्या अल्पवयीन सुंदर मुलीच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानं स्नेहलच्या आयुष्याची राखरांगोळी केली.

ठरल्याप्रमाणं स्नेहलला काहीही माहिती न करता दोन लाख रुपये स्नेहलच्या घरी पोहोचले. आठवीत शिकणाऱ्या स्नेहलच्या लग्नाची तारीख ठरली. स्नेहल शाळेत खूप हुशार होती म्हणून ही बातमी समजल्याबरोबर  मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षकानं तिच्या आई-वडिलांना स्नेहलचं लग्न करू नका. तिला शिकवा. ती खूप हुशार आहे, असं म्हणून त्यांना समजावून सांगितलं; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. स्नेहलचं लग्न ठरलं. तारीख ठरली. सर्व तयारी करून लग्न करण्यात आलं. स्नेहल सासरी गेली. १५ वर्षांचा नवरा, १४ वर्षांची नवरी.लग्नानंतर काही दिवस निघून गेले. लहान असणाऱ्या स्नेहलला नवऱ्यासह वेगळं घर करून देऊन काही महिने ठेवण्यात आलं. काही दिवसांतच ती गरोदर राहिली. स्नेहलला एक मुलगा झाला. मुलगी राहील की नाही ही भीती आता संपून गेली होती.

स्नेहल आता मुलाला सोडून जाऊ शकत नाही, अशी खात्री वाटली आणि त्यांनी वेगळं घर करून दिलेली स्नेहल तिचा नवरा आणि मुलाला घेऊन तिला सासरच्या मूळ घरी आणण्यात आलं. तिथं राहिल्यावर काही दिवसांतच तिथं चालणारा अनैतिक व्यवसाय तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आपली सासू, तिच्या बहिणी, नणंदा राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय करतात आणि आपला सासरा, नवरा त्यांना ग्राहक घेऊन येतात, हे तिला समजलं. आपण एका वाईट कृत्य करणाऱ्या घरात आलो आहोत, याचं तिला वाईट वाटत होतं; पण जाऊदे काय करायचं आपल्याला, असं म्हणून ती मनाची समजूत घालत होती; पण सासरच्या मंडळींच्या मनात वेगळंच चाललं होतं. त्यांनी स्नेहलला सून म्हणून घरात आणलेलं नव्हतं, तर एक सुंदर दिसणारी मुलगी या गलिच्छ व्यवसायात आणून तिच्या सौंदर्याचा बाजार त्यांना मांडायचा होता. त्यातून पैसे मिळवायचे होते. त्यासाठीच त्यांनी पैसे खर्च करून लग्नाचं नाटक केलं होतं.

एका रात्री स्नेहल घरात झोपलेली असताना सासूबाई तिच्याकडं आली. तिला गोड बोलत एक ग्राहक कर, अशी म्हणू लागली. असं घाणेरडं काम मी करणार नाही, असं चिडून सांगत तिनं सासूला खडसावलं; पण नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सासू-सासरे आणि नवऱ्यानंसुद्धा पैसे मिळविण्यासाठी हे काम तुला करावंच लागेल असं सांगितलं; पण स्नेहल तिच्या मतावर ठाम होती. एकांतात नवऱ्याला तिनं बोलण्याचा प्रयत्न केला; पण तोही ऐकायला तयार नव्हता. आपला व्यवसाय हाच आहे. तुला ते करावंच लागेल, असंच तो म्हणाला. 

एके दिवशी रात्री ती खोलीत झोपलेली असताना एका ग्राहकाला थेट सासूनं तिच्या खोलीत पाठवलं. ती घाबरली, ओरडली ग्राहक बाहेर आला; पण सासू, सासरे, नवरा सगळेच तिला शिव्या देऊ लागले. नवरा आणि सासऱ्यानं मारहाण केली. या सर्व प्रकाराची तिला प्रचंड घृणा आली. एवढ्या रात्री घरातून बाहेर पडून तिनं पोलीस ठाणं गाठलं. तिथं आपली कैफियत मांडली. पाठीमागून सासरा-नवरा हेही आले. पोलिसांना त्यांच्या सर्व गोरखधंद्याची माहिती होती. या परिवाराबरोबर त्यांची देवाणघेवाण होती. स्नेहलची तक्रार घरगुती मॅटर असल्याचं सांगत बाजूला ठेवली.

इथं आपल्याला न्याय मिळणार नाही, असं ओळखून स्नेहल तडक माहेरी आली.  घरी आल्याबरोबर आई-वडील, आजी या सर्वांना तिनं घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आई आणि आजीला हे सर्व अगोदरच माहीत असल्यानं त्यांना ते विशेष काही वाटलं नाही. आई यावर काहीच बोलत नाही याचा अर्थ सासू, नवरा, सासरा हे जे सांगत होते की, तू फुकट आलेली नाही. आम्ही तुझ्या आई-वडिलांना पैसे दिले आहेत ते खरं असून, आपल्या आई-आजींना हे सर्व माहीत होतं. यांनी आपल्याला विकलं आहे, याची तिला खात्री पटली. स्नेहलनं आईला सांगितलं मी त्या घरी पुन्हा जाणार नाही. स्नेहलला परत पाठवा; अन्यथा आमचे पैसे परत करा, असे सासरचे स्नेहलच्या आईला, आजीला निरोप येऊ लागले. आई आणि आजी स्नेहलला सासरी जाण्याचा आग्रह करू लागल्या. त्यामुळं त्यांचे वाद होऊ लागले.

आई-आजीला वाटायचं स्नेहल गेली नाही, तर आपल्याला पैसे परत द्यावे लागतील. म्हणून ते तिला जुळवून घे, असा सल्ला देत. सासरच्या तावडीतून सुटका करून आलेली स्नेहल माहेरी रोज होणाऱ्या कडाक्याच्या भांडणाला वैतागून गेली. तिकडं त्या नरकात जाऊन राहण्यापेक्षा जीवन संपवून टाकलेलं बरं असा विचार करून ती आत्महत्या करायला निघाली. बाळाला घेऊन जवळच्या विहिरीकडं ती पळू लागली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला आणि शिक्षकांना सांगितला.  तिच्यामागं पळत जाऊन सर्वांनी तिला परत आणलं आणि शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीत बसवलं. घडलेला सर्व प्रकार ऐकून सर्व जण हबकून गेले.

त्या रात्री मुख्याध्यापक बाई तिला आपल्या अंबाजोगाईतील घरी घेऊन आल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘मानवलोक’ गाठलं आणि अरुंधतीतार्इंनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्या शांतिवनमध्ये पोहोचल्या. तिनं भोगलेलं हे सर्व मला अस्वस्थ करणारं होतं.  तिला शाबासकी दिली आणि आम्ही तुझ्या पाठीशी राहू म्हणून सांगितलं. चिमुकल्या बाळासहित स्नेहल शांतिवनमध्ये राहू लागली. मुख्याध्यापकबार्इंनी तिचा इयत्ता नववीचा दाखला आणून दिला. ती शाळेत जाऊ लागली.  माझी आई आणि इतर कार्यकर्त्या बाळाला सांभाळू लागल्या. तिच्या आई-वडिलांनी शांतिवनमध्ये येऊन स्नेहलला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. इथं गोंधळ घालत मुलगी तुम्ही पळवून आणली, असे आरोप केले. अरुंधती तार्इंनाही त्यांनी खूप त्रास दिला; पण तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय दौंड यांनी त्यांना खडसावत शांत केलं.

स्नेहल दोन वर्षे खूप अभ्यास करीत शांतिवनमध्ये शिकली. चमत्कार घडावा तसंच झालं.  दहावी परीक्षेचा निकाल लागला. स्नेहल ८७ टक्के गुण मिळवून पास झाली. तिचं हे यश आम्हा सर्वांना चकित करणारं होतं. एकीकडं तिचं कौतुक, तर दुसरीकडं इतक्या हुशार मुलीच्या आयुष्यात झालेली फसवणुकीच्या घटनेविषयी वाईट वाटत होतं. स्नेहल आता लातूरमध्ये बारावीत आहे. खूप अभ्यास करतेय. तिचं स्वप्न आता खूप मोठं आहे. 

( deepshantiwan99@gmail.com)

Web Title:  Her life's deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.