घमघमाट आहे शब्दांना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:18 PM2018-06-16T18:18:42+5:302018-06-16T18:20:09+5:30
बळ बोलीचे : हॉटेलांचे जन्म खूप उशिराचे. आधी चुलीच पेटल्या गावागावांच्या घरोघरी. वास्तविक पाहता भूक ही महान आणि पवित्र गोष्ट आहे. आधी पोटोबा यातूनच जन्मलेला आहे. अन्न श्रेष्ठच; पण त्यापेक्षाही चव जास्त चोखंदळ. ही चव जिभेची सखी म्हटली पाहिजे. जीभ नूतन असते हमेशा. ती सतत नवं मागते आणि मिळाले नाही, तर तंटा उभार करते. कारण जीभच ती. ती सतत धावतेच. खायला... बोलायला... जणू पोटाची ती प्रवक्ता आहे!
- डॉ. केशव सखाराम देशमुख
सुगरण’ हा शब्द स्त्रीला पुढ्यात ठेवून आला. याउलट सुगरण्या असं गडी माणसाला म्हटलं जात नाही. सुगरण असेल, तर पाण्याचीही भाजीला दिलेली फोडणी बळदार चव देणारी असते. आमच्या बोलीभाषेत गावातल्या घरोघरी केवढे पदार्थ आहेत. बापरे बाप! त्या प्रत्येक पदार्थाला नवं नाव आणि नवी चव आहे. ही चव हल्ली शहरांतूनही विकसित होत असली तरी गावमातीची, गावचुलीची सर शहरअन्नाला नाही! गावांची ही अन्नभाषा जोरदारच आहे. या पदार्थांची चव आणि जणू या शब्दांनाही एक घमघमाट, एक गंधदर्वळ, एक खुमारी आहे. बोलीचं हे ‘पदार्थनाम माहात्म्य’ बावनकशी कांचनासारखं आहे. जसा पदार्थांना घमघमाट तसा या शब्दांनासुद्धा घमघमाट आहे.
‘एक गहू आणि प्रकार बहू’ असं म्हटलं जातं. किती धान्य आणि किती भाज्या... प्रत्येकातून हजार पदार्थांचे जन्म आणि हजार प्रकारच्या त्यांना चवी. हा नुसता अन्नकोश तयार करायचा म्हटलं तरी शंभर खंड तयार होतील. आपल्या देशाची अन्नपूर्णा सर्वांत श्रेष्ठच आहे. खेड्यांत बारोमास भाज्या पूर्वी कुठं मिळत? मग शेलन्या, वाळूक, बैंगण, बरबटीच्या शेंगा, विविध प्रकारच्या शेंगा घरावरच्या पत्रावर वाळू घालत. त्यांना ‘उसऱ्या’ म्हणतात. या उसऱ्या गाडग्यात भरून ठेवायच्या आणि हे ड्रायफूड बारोमास भाजीचं काम करी... मूळभाजीचा व वाळलेपणाचा ‘एक खाद स्वाद’ या उसऱ्यांना लाभला.
हिरवी करडीची पानं किंवा हिरवा कोवळा हरभरा; त्यांची पानं याची एक भाजी एकदमच भन्नाट. हरभऱ्याची कोवळभ पानं अडमदिडम कुटून त्यात चटणी-मीठ घालून जो जोरकस पदार्थ तयार होतो त्याला ‘घोळाणा’ असं बोलीत छान नाव आहे आणि गंमत म्हणजे उन्हात जास्त फिरणं झालं की, कधी-कधी नाकातून रक्त येतं. त्यालाही ‘घोळाणा फुटणं’ असंच नाव आहे. भाजीचा घोळाणा कुटण्याशी, तर नाकाचा घोळाना फुटण्याशी संबंधित आहे!!
‘आहे की नाही मजा’
बोलीचं मर्म असं की, गुरुजी पाठीत देतात तोही धपाटा आणि आई घरी प्रेमानं खाऊ घालते त्यालाही ‘धपाटा’ म्हणतात. आता नाना चवींची लोणची लीलया उपलब्ध आहेत; पण कैरीच्या लोणच्याला मराठवाड्यात ‘रायतं’ किंवा ‘खार’ असं म्हणतात. खार आणि मीठ एकच वंश. लोणच्यात मीठ तोंडभर असतं. त्यावरूनही ‘खार’ हे नावं पडलं. झाडावर सरसरणारी खार असते. आपण त्याला/ तिला ‘खडोळी’ म्हणतो!
याच बोलीत... भजी ‘बोंडं’ होऊन येतात. करडीतांदूळ भिजवून दळून फारच खुमासदार पदार्थ केला जातो. जो पातळ खिचडीधर्मी असतो. त्याला ‘खरडखीस’ म्हणतात. त्यात करडीखीस किंवा करडीकीस असा एक ध्वनी आहे. गूळपिठापासून आणि थोडे मसालापदार्थ घालून एक पदार्थ तयार होतो. त्याला ‘लाभडं’ म्हणतात. गरीबाघरी हे पूर्वी मिष्टान्न असायचं! गावजीवन आणि ग्रामजेवणातील हे पदार्थ अपूर्वाई और कुछ सुख बहाल करीत असत. पूर्वी घरोघरी ‘खंडीभर’ गायी असायच्या. खंडीभर म्हणजे वीस. दूधदुभते भरपूर असे. तेव्हा दुधाचा इतका ‘धंदा’ झालेला नव्हता. घरी दूध खायला वापरले जाई. पैलवान असत. कुस्त्या झडत. चारा होता. पाणी होतं. म्हणून गाव पुष्ट करणारं दूध भरपूर होतं. खापराचं मोठं भांडं दूध तापवायला असायचं. त्याला ‘दुधानं’ म्हणतात. दूध खूप तापलं, की दुधान्याच्या आतल्या तळाला दूध मलाईचा भाजलेला एक थर चढतो. त्याला ‘खरडन’ म्हणतात. हे खायला मिळण्यासाठी आईजवळ लेकरं /धिंगाणा घालत. या लेकरांना ‘गाभरं’ म्हणतात. मुलं जो गोंधळ घालतात त्याला ‘धिंगधिंग’, ‘शीलशील’, ‘दांगडू’ असे शब्द वापरलेले बघायला मिळतात.
खमंग, वाळून बनवलेल्या व तळूनभाजून खायला ‘कुरोड्या’ आणि ‘खारोड्या’ फत्तरच मस्त लागतात. आमच्याकडं जेवणक्रियेत काही शब्द खास आहेत. हात, भांडी ‘खरकटी’ असतात. वाया जाणाऱ्या अन्नाला ‘जानोडा’ असा शब्द आहे, तर ताटात ‘उष्टे’ राहिलेल्या अन्नपदार्थांना ‘भंदं’ म्हणतात. शेंगोळे, फळं, खरडखीस, दिंडं, लाभडं हे ‘शिजवलेले’ द्रवप्रधान रुचकर पदार्थ आहेत. धिलडे, धपाटे, रोट्या, भाकरी हे भाजीव पदार्थ आहेत. पुऱ्या, तंगडेलाडू, करंज्या, कुरोड्या, बोंडं हे तळीव पदार्थ आहेत. एक चूल ही हजारो पदार्थांची उत्पादिनी आहे आणि एक स्त्री असंख्य पदार्थांची सुगरण निर्माती आहे. चूल आणि सुगरण यात केवळ कृती एवढाच अर्थ नाही, तर त्यात चव, भाव, प्रेम, सेवा आणि समाधान हे पंचप्राण त्यात मिसळतात. शिवाय बोलीचा घमघमाट तर आहेच!!
- keshavdeshmukh74@gmail.com