...तोची साधू ओळखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:36 PM2018-08-11T16:36:24+5:302018-08-11T16:37:37+5:30
अनिवार : जिजेश वालम बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात, ती मृत व्यक्ती ज्या धर्माची त्याच धर्माचे अंत्यसंस्कार त्यांच्याकडून केले जातात हे विशेष.
- प्रिया धारूरकर
जगातल्या सगळ्याच चांगल्या माणसांची भाषा कल्याणाच्या लिपीची असते. तिला निखळ माणुसकीचा गंध असतो, एक हळवासा निरागस भाबडा पोत असतो आणि ही चांगली माणसं विलक्षण असं समाजातल्यांसाठी काही सातत्यानं करत असतात. हेच त्यांचे ध्येय असते. असाच रंजल्या गांजल्यासाठी खऱ्या तळमळींनी जागणारा आणि जगणारा जिजेश वालम नावाचा अवलिया आणि त्याची पत्नी रजिता. हे केरळी जोडपं नांदतय चिपळूणमध्ये. चिपळूणच्या सावर्डे गावाजवळ त्यांचं पंक्चरचे दुकान आहे.
जिजेश वालम बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात, ती मृत व्यक्ती ज्या धर्माची त्याच धर्माचे अंत्यसंस्कार त्यांच्याकडून केले जातात हे विशेष. हे करता करताच जिथे जिथे निकड आहे अशा ठिकाणी जाऊन गरजूंना कपडे देणे,जखमींवर उपचार करणे. रुग्णालयात भरती करणे. चुकलेल्यांना घरी पाठवणे. रजिताशी बोलताना भाषेचा अडसर जरी आला तरी तिच्या भाव-भावना सहज समजत होत्या. कारण ती ही या सगळ्या कार्यात जिजेश यांच्याइतकीच रमली आहे. हिंदी, इंग्रजीचा आधार घेत जिजेश यांच्या मदतीने आमचा दोघींचा संवाद चालू होता. सुरुवातीला तिला कळायचं नाही हे आपला नवरा काय करतोय आणि का करतोय. जिजेशने तिला समजावून सांगितले की उद्या आपल्यावर अशी कोणती वेळ आल्यास कोणी आलं नाही तर आपल्याला कसा त्रास होईल. स्वत:वरून ही दु:खी माणसं समजून घेण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुलाही त्यांचे क्लेश कळतील. आपोआपच तुझ्यातून वात्सल्य निर्माण होईल.
माणसा-माणसातला हा ऋणानुबंधाचा ठेवा जपणे मी अशी शिकले. यांनी खूप मोठा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. गाडीत हवा भरल्याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून ते हे सर्व करत असतात. देव दयेने आम्हाला कधी कमी पडत नाही. हे घरातून निघतात तेव्हा यांच्या बरोबर दाढी-कटिंगचे सामान आणि कपड्यांचे जोड असतात. अनाथ, वंचित, हरवलेले असे अस्वच्छ, रोगी दिसले तर त्यांची दाढी कटिंग करतात, आंघोळ घालतात, कपडे देतात, एक वेळचे जेवण देतात. एकदा तर एक व्यक्ती राहण्याखाण्यासह आमच्याकडे २२ दिवस होता. नंतर तो बलसाडचा आहे हे कळले. मग त्याचे नातेवाईक येऊन त्याला घेऊन गेले.त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असल्याने ते आम्हाला १ लाख रुपये देत होते; पण घेतले नाहीत उलटपक्षी त्यांना एका आश्रमात दान करावयास सांगितले.
जर तुम्ही दवाखान्याच्या वॉर्डमध्ये रुग्णाला कपडे घालताना यांना पाहिले तर हे त्यांच्या घरचाच सदस्य आहेत असंच वाटेल. रक्ताचं कोणतंही नातं नसतानाही आपलाच जीव म्हणत त्या दुसऱ्या जीवाची काळजी ते घेतात. महामार्गावर जर एखादा अपघात झाला तर मदतीसाठी सगळ्यात पहिला धावणारा व्यक्ती जिजेश असतात. अपघात्यांना धीर देणे, रुग्णालयाची मदत, पोलीस मदत, त्यांना खायला देणे असं सारं सहकार्य करतात. दिवस दिवस त्यांच्याबरोबर स्वत: उपाशी बसतात तेव्हा या लोकांना जिजेश देवदूत वाटत असतात. सामाजिक कार्यात गुरफटलेले जिजेश पैशांचा, दुकान बंद राहण्याचा विचार कधीच करीत नाहीत.
गेल्या काही वर्षांत महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या अनेकांचे यांनी रात्री-अपरात्री जाऊन प्राण वाचवलेले आहेत. एकदा एका वाढदिवसाला हे गेले होते, तिथे मुलांनी केकची केलेली नासाडी, वाढदिवसाच्या नावाखाली केलेली उधळपट्टी पाहून यांना वाईट वाटले, त्या मुलांना त्यांनी तळमळीने समजावल्यानंतर मुलांनाही समाजकारणी वळण लागले. भाड्याने राहत असल्यामुळे सुरुवातीला घरमालकांचा बऱ्याचदा त्रास होई, त्यांना यांचे समाजकार्य, घरात गरजूंना आश्रय देणं मान्य नसे; पण त्याची कधीही चिंता केली नाही. मदत करतच राहिले. मोडक्या तोडक्या भाषेत रजिताला समजून घेत निरोप घेतला तेव्हा मनात आलं.
‘देखकर दर्द किसी का,जो आह निकलती है,बस इतनी सी बात,आदमी को इन्सान बनाती है!’