‘सत्यशोधकांचे अंतरंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:04 PM2018-08-04T19:04:00+5:302018-08-04T19:05:17+5:30
बुकशेल्फ : जी.ए. उगले या पैठण-औरंगाबादचा सच्चा सत्यशोधक या धडाडीच्या सत्यशोधकाने सात-आठ वर्षांपूर्वी संकल्प करून हे कार्य सिद्धीस नेले. सव्वासातशे पानांचा सदर ग्रंथ महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे.
- अरुण घोडे
सप्टेंबर १८७३ रोजी सायंकाळी ज्योतीराव गोविंदराव फुले यांच्या पूर्वपुणेस्थित दुकानात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आधुनिक भारताची पहिली क्रांतिकारी संघटना. दलित बहुजनांचीच नव्हे, तर भारतातील सकल पुरोगामी संघटनांची ही मातृसंस्था. थोरांची चरित्रे मराठी वाचकांपर्यंत नेणारे थोर चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘सत्यशोधक समाज’ ही बहुजन समाजाची किंकाळी होय. समस्त भारतीय स्त्रीचे दास्यत्व, शूद्रातिशूद्रांची गुलामगिरी, येथील सनातनी समूहाचे दांभिक वर्चस्व, सत्याची गळचेपी वर्णवर्ग जातीअंत, मानवमुक्ती आदी भारतीय मूलगामी प्रश्नांवर चिंतन-मनन करून एक-दीड शतकापासून या प्रश्नाची उकल झाली नव्हती ती उकल करून प्रसंगी सनातनी लोकांशी दोन हात करून सामाजिक समतेचा अजेंडा दिला.
सामाजिक समतेचा प्रकल्प राबविताना सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष ज्योतीराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी इ.स. १८७३ पासून आतापर्यंत एक क्रांतिकारी सामाजिक इतिहास निर्माण केला. इहवादी, जीवनवादी, विज्ञानवादी तत्त्व अंगीकारून शिक्षणाचा जागर करून खूप मोठी क्रांती केली. प्रामुख्याने खेड्यापाड्यांतील सामान्य माणसाला जननायक केले. हजारो वर्षांपासून दुर्लक्षित लंगोटीवरील शेतकऱ्याला, शेतमजुराला नायक केले. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी मानवमुक्ती- मानव एकतेसाठी असामान्य पत्रकारसृष्टी उभी केली. परखड न्यायनिष्ठुर धर्मचिकित्सेसाठी शेकडो ग्रंथ पदरमोड करून स्वखर्चाने प्रकाशित केले. ईश्वर आणि भक्तादरम्यान असलेले मध्यस्थ दूर करण्यासाठी सत्यशोधक कार्यकर्त्याला पराकोटीच्या खस्ता खाव्या लागल्या. सत्यशोधकाच्या प्रयत्नांमुळे १९२६ मध्ये ‘जोशी वतन’ रद्द झाले.
फुले दाम्पत्याच्या निर्वाणानंतर इ.स. १९११ पर्यंत चळवळ निष्प्रभ झाली. मंदावत गेली. मात्र, संपली नाही. एकोणीसशे अकरानंतर अधिवेशन चळवळीचा आरंभ झाला म्हणून ही चळवळ खळखळत आहे. सत्यशोधक समाजाची २०१८ च्या मेपर्यंत महाराष्ट्र कर्नाटकात ३९ अधिवेशने झाली. ही अधिवेशनांची मालिका म्हणजे समाजाची सार्वजनिक सभा असायची. शिक्षण, शिक्षण संस्था, धर्मचिकित्सा आणि सत्यशोधक समाजाची घटना, प्रसंगी घटनादुरुस्ती व्हायची. यासाठी हजारो सत्यशोधकांनी कार्य केले. रयत शिक्षण संस्था आणि अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्था या सत्यशोधक समाजाची, त्यांच्या कार्यकर्त्यांची देण आहे. सत्यशोधकांच्या असीम त्यागाने ही चळवळ चेतन राखली. चळवळीसाठी हजारो ग्रंथांची निर्मिती केली. प्रसिद्धीपेक्षा सिद्धीत विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या त्यागाचा डांगोरा पिटला नाही. हिमालयासारखे उत्तुंग कार्य दुर्लक्षित राहिले ते केवळ प्रसिद्धी पराङ्मुखतेमुळे आजच्या त्यांच्या वारसदारांना पूर्वसुरींच्या कार्याची इत्थंभूत माहिती नाही.
सत्यशोधक समाज म्हणजे महात्मा फुले असे समीकरण सामन्यांच्या ठायी आहे. ज्योतीरावांच्या विचारधनाला गुरू मानून समाजाभिमुख कार्य हजारो सत्यशोधकांनी आजपर्यंत केले. या समग्र चळवळीचा एकमुश्त मागोवा मराठी मुलखाला नव्हता. त्यासाठी इ.स. १९४० पासून प्रयत्नही झाला. एकसंघ समग्र परिचायक इतिहासाचे कार्य रेंगाळले. सदर उणीव गणपत अंबादास तथा जी.ए. उगले यांना सतत सलत होती. जी.ए. उगले या पैठण-औरंगाबादचा सच्चा सत्यशोधक या धडाडीच्या सत्यशोधकाने सात-आठ वर्षांपूर्वी संकल्प करून हे कार्य सिद्धीस नेले. सव्वासातशे पानांचा सदर ग्रंथ महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. ज्येष्ठ लेखक बाबा भांड अध्यक्षीय मनोगतात ते म्हणतात...
‘सत्यशोधकीय प्रकाशन वितरणाची वानवा. सत्यशोधकांच्या वंशजांनी या ग्रंथसंपदेकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा इतिहास पर्यायाने कार्यही उपेक्षित राहिले होते. मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांनी सत्यशोधक वाङ्मयाकडे कानाडोळा केल्याने यापूर्वी हे काम पुरेसे झाले नव्हते. ते काम सत्यशोधक जी.ए. उगले यांनी चिकाटीने पाच-सहाशे सत्यशोधकांची ओळख करून देऊन महत्त्वाचे काम केले.’ हे अंतरीचे बोल सदर ग्रंथाचे सार सांगून जाते. महात्मा कालखंडापासून २०१५ पर्यंत ५९७ सत्यशोधकांचा परिचय सदर लेखकाने करून दिला आहे. या शोधयात्रेत सत्यशोधकाच्या घरी जिथे असतील तिथे गाव, शहर वस्तीत जाऊन त्यांच्या कार्याचा लेखाजोखा परिचय पूर्णत्वास नेला आहे. दूरसंचार चलभाष माध्यमाने अनेक मान्यवरांच्या मुलाखतीस्तव संवाद साधण्याचे काम लेखकाने केले आहे. तब्बल आठ वर्षे सातत्यपूर्वक अखंड भ्रमंती, प्रवास केला. या गवसलेल्या एक-एक चिठोऱ्याचे जतन केले. मराठी मुलखातील क्रांतिकारी चळवळीच्या उपेक्षित मानकऱ्यांच्या इतिहासाला उजाळा देऊन लेखकाने भरीव काम केले आहे.
‘सत्यशोधकांचे अंतरंग’ शीर्षक ग्रंथाआधीही दहा-बारा पुस्तके-पुस्तिका वाचकांसाठी लिहिल्या. सदर पुस्तकातील भूमिकापर चोवीस पाने वाचल्यावर केलेल्या प्रयास प्रयत्नादीची धडपडीची कल्पना येते. या पुस्तकातील कालखंडानुरूप सत्यशोधकाचा परिचय नोंदविला असता, तर अतिशय समर्पक राहिला असता. पहिल्या कालखंडातील सत्यशोधक कृष्णराव भालेकरांच्या चार-पाच महत्त्वाच्या सहयोगी कार्यकर्त्यांचा सत्यशोधकी परिचय लेखकाच्या ओंजळीतून निसटला आहे. शाईवाले घोरपडे, बंडोबा तरवडे आदी. विद्यमान सत्यशोधक आ.ह. साळुंखे, हरी नरके, बाबा आढाव आदींचा परिचय त्रोटक झाला आहे. वर्तमानकाळात लेखक बहुधा रमलेले नसावेत.