याला जीवन ऐसे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:22 PM2018-04-28T18:22:05+5:302018-04-28T18:23:24+5:30
दिवा लावू अंधारात : नऊ वर्षे झाले या घटनेला. शेवगाव बसस्थानकावर एक ताई भेटली किडकिडीत. कष्टाने कास्ट झालेले शरीर आणि जगण्याच्या चिंतेने खोलवर गेलेले डोळे. चेहऱ्यावरचे त्रासिक भाव कसलीतरी काळजी असल्याचे स्पष्ट सांगत होते. मी आणि भगवान भांगे काहीतरी कामानिमित्त फिरत असताना बसस्थानकावर गेलो तेव्हा आम्हाला ती दिसली. व्याकूळ अवस्था स्पष्टपणे सांगणारे तिचे चेहवरील भाव आमच्या नजरेतून सुटले नाहीत. इकडचे तिकडचे बोलत आम्ही तिला बोलते केले. घरची खुशाली विचारली. डोळ्यात पाणी आणून ती सांगू लागली.
- दीपक नागरगोजे
तिचे किरण श्रावण सागर, असे नाव. मूळची औरंगाबादेत राहणारी. वडिलांची परिस्थिती जेमतेम. किरण आणि भावंडे लहानाची मोठे झाली. पुढे तिच्या भावाबरोबर होटेलमध्ये काम करणारा श्रावण सागर या युवकाशी किरणची ओळख झाली. श्रावण हा मूळचा मध्यप्रदेशातला. पोटाच्या खळगी भरण्यासाठी तो औरंगाबादेत आला. हॉटेलात काम करू लागला. पुढे किरण आणि श्रावणने लग्न केले. श्रावणच्या मूळ गावी किरण कधी गेली नाही. तिकडच्या त्याच्या नातेवाईकांचाही तिच्याशी कधीच संपर्क आला नाही.
रेल्वे पटरीच्या कडेला पत्र्याचे शेड मारून ही दोघी राहू लागली. या छोट्याशा संसारात त्यांना तीन मुले झाली. श्वेता आणि आरती या दोन मुली, तर आनंद हा मुलगा. मुले कळते होण्याअगोदरच असाध्य आजाराने श्रावणला घेरले. एक दिवस पत्नी, तीन मुलांना सोडून तो देवाघरी निघून गेला. श्रावण जाऊन अनेक दिवस झाले; पण त्याचा कुणीही नातेवाईक माध्यप्रदेशातून इकडे आला नाही. यामुळे मुलांची सर्व जबाबदारी किरणवर येऊन पडली. रोज मिळेल ते काम करून कसेबसे लेकरांना जगवतानाच रेल्वे खात्याने अतिक्रमणधारकांवर हातोडा चालवत कारवाई केली. यात किरणचे छोटेशे घरकुल नेस्तनाबूत झाले. संसार आणि छोटी लेकरे उघड्यावर आली. आता जगायचे कसे...? यासह अनेक प्रश्न उभे राहिले. शेवटी वडिलांनी आधार दिला. त्यांच्या छोट्याशा घरातील एक छोटी खोली त्यांनी दिली. किरणने लेकरांना घेऊन या छोट्या खोलीत पसारा मांडला. रोज एक नव्या संकटाला तोंड देत तिची झोप उडाली होती. लेकरांना जगवत होती; पण हे सर्व करताना तिची दमछाक व्हायची.
किरणची ही कथा ऐकून आम्ही गहिवरून गेलो. आम्ही तुझ्यासाठी नक्की काहीतरी करू शकतो, असे तिला सांगितले. ती खुश झाली. तिने बोलावलेल्या दिवशी आम्ही औरंगाबादला गेलो. श्वेता आणि आरती या दोघींना शिक्षण आणि पालनपोषणासाठी आम्ही घेऊन जातो असे सांगितले. ती आनंदाने हो म्हणाली. ‘काळजी करू नको. या दोघींना आता आम्हीच आई-वडील’ असे मी म्हणताच तिचा अश्रूंचा बांध फुटला. आरती, श्वेताला माझ्या स्वाधीन करीत सांभाळा म्हणाली. आजही तो प्रसंग जशास तसा डोळ्यासमोर उभा राहतो.
श्वेता आणि आरतीला घेऊन आम्ही शांतिवनला आलो. श्वेता आठवीत, तर आरती सहावीत शाळेत जाऊ लागल्या. मुली खूप गोड आणि हुशार. सर्व काही समजावून घेणा. अभ्यास करणा, थोरामोठ्यांशी आदराने वागणा; पण दोघींचीही शरीरे किडकिडीत, कुपोषित. श्वेता अधूनमधून सारखी आजारी पडायची. एका रात्री २ वाजेच्या सुमारास ती मोठ्याने ओरडू लागली. पोट खूप दुखत होते. आम्ही घाबरून गेलो. शांतिवनसाठी नि:शुल्क सेवा देणारे डॉ. दीपक देवकते यांना बोलावले. डॉक्टर धावत आले. श्वेताला होणारा त्रास पाहून त्यांनी डॉ. अनिल बारकुल यांना फोन केला. त्यांनी बीडला घेऊन येण्याचे सांगितले. आम्ही सर्व जण बीडला हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी तपासले. श्वेताला अपेंडिक्स होता. लगेचच आॅपरेशन करावे लागेल; अन्यथा तो फुटू शकतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बारकुल शांतिवनचे विश्वस्त; पण आॅपरेशनची सुविधा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नव्हती. तेवढ्या रात्री त्यांनी डॉ. सी.एस. गायकवाड यांना बोलावून आॅपरेशन केले. पहाटे पाचपर्यंत आॅपरेशन झाले. त्रास कमी झाला. आम्ही चिंतामुक्त झालो. संपूर्ण रात्र जागून काढली. कावेरी रात्रभर श्वेताजवळ बसून होती. सकाळी तिला आईची आठवण झाली. आईला भेटायला बोलवा, असे म्हणू लागली. तेव्हा कावेरीने किरणला फोन केला. श्वेताचे आॅपरेशन झाले आहे. तुमची आठवण काढतेय ती, तुम्ही भेटायला या...! ‘तिच्याकडे बीडला येण्यासाठीही पैसे नव्हते. कुणाकडूनतरी उसने पैसे घेऊन या, इथे आल्यानंतर मी देईल तुम्हाला, असे कावेरी म्हणाली. तेव्हा कुठूनतरी बसभाड्यापुरते पैसे घेऊन किरण आली. आईला भेटल्याचे समाधान लेकराच्या आयुष्यात सर्वांत मोठे असते. श्वेताला ते मिळाले.
पुढे श्वेताची दहावी झाली. आरती आठवीत आली. ८७ टक्के मार्क्स मिळवून श्वेता दहावीत उत्तीर्ण झाली होती. दरम्यानच्या काळात एक घटना घडली. अगोदरच मानसिक ताणतणावाखाली असणा किरणलाही काविळीची लागण झाली. पैसे आणि काळजी घेणा माणसाअभावी तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. ती अंथरुणावर पडली ती कायमचीच. तिला परत उठता आले नाही. श्रावणसारखेच तीही या तीन लेकरांना सोडून देवाघरी निघून गेली. तिच्या जाण्याची बातमी शांतिवनात समजली. कावेरी आरती आणि श्वेताला घेऊन औरंगाबादला गेली. अश्रूंनी भरलेल्या नयनांनी या चिमुकल्यांनी आपल्या आईला कायमचा निरोप दिला. बापाच्या निधनाने पोरकी झालेली लेकरे आईच्या जाण्याने अनाथ झाले. देवसुद्धा किती वाईट असतो. ज्यांना देतो त्यांना सर्व काही भरभरून आणि ज्यांच्याकडून घेतो ते इतके की ते रस्त्यावर येतात.
श्वेताला ८७ टक्के मार्क्स मिळाले म्हणून आम्ही खुश झालो. तिला तिच्या पायावर उभे करायचे आम्ही ठरवले. सुरेश जोशी आणि शशिकांत चितळे यांना श्वेताबद्दल सांगितले. राज पटवर्धन यांनी मदत केली. पुण्यातील प्रसिद्ध आपटे प्रशालेत श्वेताला प्रवेश मिळाला. चितळे काकांनी तिची हॉस्टेल आणि जेवणाची व्यवस्था विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात केली. पुण्यातील नामांकित कॉलेज, राहण्यासाठी उत्तम व्यवस्था आणि पाठीशी शांतिवन उभे राहिले. मग काय श्वेताने संधीचे सोने केले. तिने टूर्स अँड ट्रॅव्हलिंगचा कोर्स पूर्ण केला. श्वेता हुशार आहे. उत्तम संवादाची कला मुळातच अवगत असल्याने तिला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. आम्हा सर्वांना प्रचंड आनंद झाला. आता आरती बारावीत असून, ती शांतिवनमध्येच राहते. ती पण खूप हुशार आहे. चांगला अभ्यास करतेय. तिलाही तिच्या पायावर उभे राहायचेय. समाजात अगदी आपल्या आजूबाजूला अशा घटना नेहमी घडत जातात. आई-वडिलांच्या जाण्याने चिमुकल्यांचे जगणे रस्त्यावर येते. वेळीच त्यांना कुणीतरी आधार दिला, तर आधार देणाच्या बोटाला धरून ही लेकरे रांगायला लागतील, मग चालायला आणि मग धावायला. उमेद तर प्रत्येकात असते; पण परिस्थितीने केलेल्या आघाताने ते खचून गेलेली असतात. गरज असते त्यांना कुणाच्या तरी आधाराची. मग तो आधार देणारा रक्ताच्या नात्यातीलच असावा, असे काही नाही. ज्याला दिसेल त्याने तो द्यावा. मग एक श्वेता स्वत:च्या पायावर उभी राहील आणि रक्ताच्या नात्याच्याही पलीकडचे एक पवित्र, असे एक नाते तयार होईल जे सर्व श्रेष्ठ असेल आणि सर्वांत सुंदर असेल. जसे श्वेता, आरती आणि मी...!
( deepshantiwan99@gmail.com )