आलिया भोगासी....!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:56 PM2018-05-05T18:56:49+5:302018-05-05T18:57:37+5:30

वर्तमान : शिक्षणाने आम्हाला प्रयत्नवाद शिकवावा ही आमच्या समाजाची तशी रास्त अपेक्षा. म्हणून कैक पिढ्या अज्ञानात खपल्यानंतर पुढे या पिढ्यांचा एखादा वारसदार शिक्षण घेऊन दिवस बदलण्याची भाषा करीत असेल, तर आनंद वाटतो; परंतु पिढीजात अंधारातून उजेडाच्या दिशेने चाचपडत आलेला गडी ‘काय उपयोग झाला नाय शिकून’ असे म्हणून पुन्हा ढकलून देत असेल पुढच्या असंख्य पिढ्या अंधाऱ्या बळदात, तर त्या मागील उद्विग्न भावावस्था जाणली पाहिजे. नेमकी ही पराभूत मानसिकता, अंगावर येणारी जीवघेणी हतबलता का आकारला आली. वयाच्या अवघ्या पंचविशीत या पिढीच्या तोंडी ‘आलिया भोगासी असावे सादर’ ही भाषा ऐकून मनाचा दगड होतो. उभं आयुष्य समोर असताना पराभूत मनोवृत्ती आणि हतबलता हे परिस्थितीचे अपत्य त्यांच्या गळ्याभोवती फास आवळत जातात आणि पाहता पाहता ते एक आयुष्य उभं राहण्याच्या आत कोलमडत. म्हणून दारिद्र्याच्या रेट्याने भविष्याचा मोकळा अवकाश गोठलेली; अन् नुकतेच जीवन कळू लागलेली तरणी पोरं ही आज पलायनाची भाषा बोलतात. या विदारक चित्रामागील वास्तव काय हे ‘जागल्या’ नजरेतून पाहिले तर स्पष्ट दिसते. प्रश्न आहे ही नजर आम्ही गमावली तर नाही ना...?

as it happens .... !! | आलिया भोगासी....!!

आलिया भोगासी....!!

googlenewsNext

- गणेश मोहिते

रणरणत्या उन्हात मराठवाड्यात कुठे ही फिरून या नजर पुरेल तिथंपर्यंत उघडी नागडी भुई उन्हात तळताना दिसते. उन्हाच्या ‘झळा’ मृगजळ होऊन दूर पळून जाव्यात, पिकलं पान झाडावरून गळून पडावं तशी गळून जातात ‘हिरवी स्वप्नं’ इथल्या शिवारांची. उघडी बोडखी शिवारं कायमच अंगावर उन्हातान्हात सोसत असतात दुष्काळी घाव बारमाही. तसा ही ‘हिरवेपणा’ त्यांच्यासाठी असतो पाहुणा तोही ‘पानकळा’ बरा झाला तर, अन्यथा दुष्काळी भोग भोगीत सरल्या कैक पिढ्या या प्रदेशाच्या इतिहासात. ‘सालोसाल’ दिवसच इटत चाललेत. तशी करपली माणसं आणि गावं; ओसाड पडला बारदाना. शिवारभर नजर टाकली तर चारदोन नदी काठची ‘हिरवी बेट’ उन्हाळ्यात नजरेला सुख देतात. बाकी माळरानासहित ओढे-नालेही ओसाड असतात बारमाही. कायमची आटली ‘ओल’. कित्येक पावसाळे आले आणि गेले फिटला नाही ‘पांग’ शिवाराचा.

इथं ‘वांझ’ असल्यासारखा भासतो निसर्ग; मग करतील तरी काय माणसं. ‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे’. म्हणून वस्त्याच्या वस्त्या होताहेत परागंदा सालागणिक. नाशिक, पुणे, मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात उंच उंच इमारतीच्या बांधकामाच्या बाजूला तीन-चार पत्र्यांच्या खोलीतली माणसं कुजबुजली की हमखास मराठवाडी बोलीचा शब्द येतो कानावर. एकीकडे  दसरा, दिवाळी सरत नाही तोच कारखान्यांचा हंगाम सुरूहोतो अन् अर्धी जनता बदलते प्रदेश कोरभर भाकरीसाठी. गावात उरतात ते थकले भागलेले चेहरे आणि पाठीवरच्या दप्तरात भविष्य शोधणाऱ्या पुढच्या पिढ्या. अशाही वातावरणात या पिढीच्या ठायी असतो दुर्दम्य आशावाद पाटी पुस्तकांच्या जोरावर नशीब बदलता येते पण....

कालच भेटला एक ‘राम’. (आडनाव मुळीच सांगत नाही उगाच जातीचा बोध होतो आणि आम्हाला कोरडा उमाळा येतो) रात्रीचे साडेदहा वाजले म्हणून हॉटेलात शिरलो जेवायला. आवरासावर चालू होती. एखाद दोन टेबलावर माणसं जेवत होती. बाकी शांतता. वेटरच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. बहुदा भूक लागली असावी त्याला. इच्छा नसताना टेबल लावावा लागला. पाण्याची बाटली टेबलावर आदळली त्याने. तसं मी म्हटलं याच बिनसले काही तरी. दुसऱ्याला पाठवा सर्विस द्यायला; मी उगीच थाटात बोललो. मग आला कोवळा पोरगा. सतराऐक वर्षांचा असेल. मराठीत बोलला. बीडपासून पंचवीसेक किमी अंतरावर आहे म्हणाला गाव. अमुकतमुक गडाच्या पायथ्याला. पहिल्याने बाटली आदळली म्हणून त्याला झटकले होते. मात्र, माझे मन मलाच खात होते सारखेच. वाटले की तो असा का वागला असेल,त्याला भूक तर लागली नसेल ना. आपलेच चुकले तर नाही ना त्याला समजून घ्यायला. तसा विचार करताना ‘राम’आला. (एरव्ही ‘राम’ नाव बदनाम केले बुवा बाबांनी; परंतु पोरगा प्रामाणिक वाटला) म्हणून चौकशी केली. विचारले त्याला ‘अरे तुम्ही किती वाजता जेवत असता. म्हटला सगळं  संपल्यावर, कधी रात्रीचे अकरा तर कधी साडेअकरा होतात. कस्टमर संपल्याशिवाय आम्हाला नाही जेवता येत, कितीही भूक लागो. मालक कामावरून काढून टाकतो.

विचार केला या कोवळा पोराच्या शारीरिक वाढीसाठी याचा आहार कसा असावा, तो कधी घ्यावा. वगैरे तथाकथित तत्त्वज्ञान येथे गैरलागू ठरते. इथे फक्त भूक शमविण्याचा प्रश्न आहे. रात्रीचे बारा वाजता रोज जेवल्याने शरीरावर काय परिणाम होतील वगैरे हे पांढरपेशी तत्त्वज्ञान खिशात टाकून म्हटले, ‘राम तू शाळेत जातो की नाही? शिकतो का काही? उतरला ‘त्यासाठी तर करतो साहेब काम, अकरावीत अ‍ॅडमिशन आहे गावाकडे, ते पण सायन्सला. कॉलेज गावाकडेच पण बारावी क्लासेससाठी शहरात आलोय. कॉलेजात नीट तास होत नाहीत आणि आमच्या खेड्यात क्लासेस पण चांगले नाहीत. गावाकडे दुसरा काम धंदा नाही. पुन्हा आईबाप मोलमजुरी करतात का? तुला शेतीबाडी नाही का? माझा प्रश्न.

म्हटला ‘आहे ना दीड एकर,दीड एकरात काय होते आज सांगा. खायला महाग,तर पैसा कुठून येणार. आम्ही तीन भाऊ एक ट्रॅक्टरवर ड्रायव्हर, एक सालगडी मी लहान,आईबाप ऊसतोड करतात. शेतात यासाली कापूस होता. ‘बोंडअळी’ आली सुपडा साफ झाला. हातात उरली पºहाटी. वडील म्हणतात ‘आमचा जन्म गेला मातडात तू तरी शिक्क बाबा. म्हणून आलो शहरात; पण इथे खर्च फार. क्लासेस लावले साठ हजार रुपये फीस. रुम भाडे वेगळेच. मग खायचं काय? सगळीच पंचायत. म्हणून काम शोधलं. हॉटेलात काम भेटले. आता खाऊन पिऊन पाच हजार पडत्यात हातात. महिन्याकाठी थोडी थोडी क्लासची फीस भरतो आणि रुम भाडे देतो’. आर्थिक विवंचना सांगताना पोरगा गहिवरला नाही, लाजला नाही, हातातल्या कामावर परिणाम सुद्धा नाही. परिस्थितीने निब्बर केला होता. आईबापाला आपल्या शिक्षणाचा त्रास होऊ देत नाही याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत. त्याची शिकायची ऊर्मी मनाला उभारी देऊन गेली.

अन् क्षणभर सकाळी लग्नपत्रिका घेऊन आलेला माजी विद्यार्थी डोळ्यापुढे तरळला. त्याच्याशी झालेला संवाद आठवला आणि पुन्हा बेचैन झालो. आडनावात ‘राजे’ होते म्हणून सहज म्हटले ‘राजे’ काय करताय आता? म्हटला काहीच नाही ‘आलिया भोगासी असावे सादर’ दुसरे काय?
उगी आपलं चालू आहे काही तरी म्हणतो लोकांना; पण करूतरी काय? सगळीच नाकेबंदी झाली माझी. आता असतो आपलं गावाकडेच. म्हटले नोकरी वगैरे? तू तर अभ्यासात हुशार होतास. ‘हो ना एम. ए. झालो.  लगेच  बीएड केले. तालुक्यात एका संस्थेत विना अनुदानावर  दोन वर्षे काम केले हातात रुपया येईना. ‘घरच्या भाकरी खाऊन मामाच्या शेळ्या कुठंपर्यंत राखायच्या’ मग दिले सोडून. गेलो वाळूजला, कंपनीत चिटकलो होतो. तिकडे सहा महिने होतो म्हणून लग्नं तरी ठरले. पण आता गॅप भेटला. मग काय करावं आलो गावाकडं. शहरात काम नाय, गावात काम नाय, चार एकर जमीन, दोन भाऊ,आई-बाप शेतीच करतात. शेतीत परवडत नाही हाताला काम नाही. जावं कुठं करावं काय, वय झालं कंपनी सांगून लग्नं तरी ठरलं, मुलगी पण देत नव्हतं कोणी कंपनी पावली. नात्यातलं नात्यात गुतल म्हणून जमलं नाही तर ते पण अवघड होतं. करू काय? पाहू आता गाव सोडायचा विचार करतोय. आपला भुक्काड भाग काय देणार मला? जातो पुण्या-मुंबईकडे. तिकडे निदान उपाशी तरी मरत नाहीत म्हणतात माणसं. आपल्याकडे गावात पोटसुद्धा भरता येत नाही, उलट शिकून काय उपयोग झाला म्हणून हसतात वरून लोक; त्या पेक्षा दूर जाऊन हमाली का करता येईना; पण गाव सोडावं म्हणतो. निदान लोक हसणार तरी नाही ना तिकडे. माझ्या शिक्षणाला? सांगा पर्याय काय? म्हणून ‘आलिया भोगासी’ आता पर्याय नाही..तितक्यात ‘राम’ बिल म्हणाला अन् मला प्रश्न पडला या कोवळ्या ‘राम’च्या स्वप्नांचे पुढे असे काही तर होणार नाही ना, की तो ही शिक्षण संपल्यावर असेच म्हणेल उद्या ‘आलिया भोगासी’ असावे सादर....!!

( dr.gamohite@gmail.com )

Web Title: as it happens .... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.