ते फेडतात गतजन्मीचे पाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:52 PM2018-05-19T19:52:20+5:302018-05-19T19:53:07+5:30
विनोद : स्त्रिया सहसा एकट्याने साडी खरेदीला जात नाहीत. सभेमध्ये जसे मांडलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देणारे कुणीतरी लागतेच तसे त्यांना साडी फायनल करताना, ‘अगं घेऊन टाक छान आहे’ असे म्हणणारे एकतरी पात्र लागतच असते.
- आनंद देशपांडे
गतजन्मी पाप केलेल्या पुरुषांना या जन्मी काय व्यवसाय करावा लागत असेल याचा विचार केला, तर याचे उत्तर साडी विक्री दुकानात सेल्समन म्हणून काम करावे लागत असेल असेच येईल. दाखविणे जास्त आणि विक्री कमी असा प्रकार असणाऱ्या साड्यांच्या दुकानातील तमाम कर्मचारी बांधवांना, त्यांच्या अपार सहनशीलतेला प्रथम वंदन. कापड विक्री रेडीमेड शर्ट पॅन्ट आल्यापासून तशी कमीच झालेली आहे; पण साड्यांना अद्याप काही पर्याय सापडलेला नाही. पंजाबी, पतियाळा, प्यारेलल, पलाजो आणि तत्सम परप्रांतीय ड्रेस कितीही आले तरी आमच्या मराठी भगिनींसाठी साडी आणि तिची खरेदी हा अपूर्व उत्साहाचा भाग आहे, यात संशय नाही. बरे, एखादी भगिनी दुकानात उत्साहाने साड्या पाहत आहे आणि तिच्यापेक्षाही उत्साहाने तिचा पती त्यात सहभागी आहे, असे चित्र आम्हीतरी आजवर पाहिलेले नाही. तुमच्या पाहण्यात असे कुणी पतिराज दिसले, तर जरूर आमच्या वतीने त्यांचा परस्पर सत्कार करून टाकावा, ही विनंती.
स्त्रिया सहसा एकट्याने साडी खरेदीला जात नाहीत. सभेमध्ये जसे मांडलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देणारे कुणीतरी लागतेच तसे त्यांना साडी फायनल करताना, ‘अगं घेऊन टाक छान आहे’ असे म्हणणारे एकतरी पात्र लागतच असते. तिच्या प्रत्येक म्हणण्याला होय असे म्हणणारा नवरा जर म्हणाला की, ‘अगं घेऊन टाक छान आहे’ तर तिचा त्यावर विश्वास नसतो. कारण ‘याला कशातले काही कळत असेल’ यावरचा तिचा विश्वास मागेच उडालेला असतो, तर वाचकहो आपला आजचा विषय साडी विक्रेते आणि त्यांचे कौशल्य हा आहे, हे तुम्ही आणि आम्ही लक्षात ठेवले पाहिजे.
दुपारच्या निवांत वेळी साड्यांच्या दुकानातील सेल्समन मालकाची करडी नजर चुकवीत निवांत बसलेले असताना तीन किंवा चार महिलांची टोळी म्हणजे ग्रुप दुकानाच्या पायऱ्या चढताना दिसला, की यांना आपली पूर्वजन्मातील पापे आठवत असतील. घरी वापरायच्या दोन साड्या घेण्यासाठी ‘त्या’ दुकानातील कमीत कमी दोन ढीगभर साड्या पाहतात. कोणतीही साडी समोर टाकली, की टप्पा पडू न देता षटकार मारावा त्या तत्परतेने माऊली ठरलेला डायलॉग उच्चारते, ‘हा रंग माझ्याकडे आहे, दुसऱ्या रंगात दाखवा.’ आता परमेश्वराने जेमतेम सात आणि थोडे आणखी एक्सप्लोर केले, तर दहा बारा रंग निर्माण केले आहेत. त्याला आपण किंवा विक्रेते काका किंवा साक्षात परमेश्वर तरी काय करणार? त्याने निर्माण न केलेले राणी कलर, मांजरबोक्या, लिंबू इत्यादी रंग आमच्या माऊल्यांनी तयार करून ठेवलेले आहेत, त्याला कोण काय करणार? दरम्यान, तीन-चार साड्या शॉर्ट लिस्ट करून ठेवलेल्या असतात.
ज्यामुळे विके्रते काकांची उम्मीद वाढलेली असते. यापैकी दोन तरी खपतील, असे त्यांना वाटत असते. ‘या’ साडीचा काठ, ‘त्या’ साडीचा पदर आणि ‘त्या’ तिसऱ्या साडीसारखे बुट्टे असणारी साडी आहे का, असे या भगिनी विचारतात. दरम्यानच्या काळात शीतलच्या नणंदेच्या अंगावर अशीच साडी होती किंवा रघुराजच्या लग्नात मला अशीच साडी अहेरात आली आहे, वगैरे संवाद सुरूच असतात. शीतलच्या नणंदेची आणि यांची पुसटशी भेट केव्हातरी दोन-तीन वर्षांपूर्वी रेल्वेस्टेशनवर झालेली असते आणि राजूची मुले शाळेत जाऊ लागलेली असतात. अशा साड्यांची मागणी केल्यानंतर ते (मागील जन्मी मोठे पाप केलेले) विक्रेते सद्गृहस्थ चिकाटीने आणखी एक ढीग समोर टाकतात.
यातील एकही साडी पसंत न करता या स्त्रिया आणखी एखादी चॉईस सांगतात. विक्रेता एव्हाना चांगलाच कातावलेला असतो. तो नम्रपणे ‘तशा’ साड्या होत्या; पण परवाच स्टॉक संपला, असे जाहीर करून शस्त्रे खाली ठेवतो आणि शरणागतीचे पांढरे निशाण वर करतो. ग्राहक स्त्रिया विजयी मुद्रेने तेथून उठतात आणि मैत्रिणींसोबत किंवा केंद्रीय निरीक्षकाच्या तटस्थतेने हा प्रकार पाहणाऱ्या पतिराजांसोबत या दुकानाच्या पायऱ्या उतरून दुसऱ्या दुकानाच्या पायऱ्या चढताना दिसतात. या विक्रेत्यांना आम्ही नेहमी आदराने प्रणाम करतो.
( anandg47@gmail.com)