आस उज्ज्वलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:36 PM2018-07-28T18:36:03+5:302018-07-28T18:36:29+5:30
अनिवार : ताई आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या या राशीन गावच्या परिसरात भटका, आदिवासी, पारधी समाज खूप मोठ्या प्रमाणात वस्ती करून आहे. मात्र, जन्मत:च गुन्हेगार समजला जाणारा हा समाज दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, परंपरा यांच्या खाईतच आजही खितपत पडलेला आहे. त्याच त्याच दु:खाला कवटाळून जगतो आहे. शिक्षणाअभावी पुढची पिढीसुद्धा पुन: पुन्हा त्याच आवर्तात भिरभिरते आहे.
- प्रिया धारुरकर
देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, जागतिकीकरण झालेय; पण या भटक्यांच्या रानावनातल्या, माळ-शिवारातला अंधार मात्र अजून संपला नाहीये. माज्या सासऱ्यांना नेहमीच या बद्दल फार वाईट वाटे, यांनी शिकले पाहिजे, यासाठी काही ठोस करावे असेही त्यांना वाटे; पण गरिबी परिस्थितीमुळे त्यांना शक्य होत नव्हते. तरीही जमेल तेवढं ते त्यांच्यापुरतं करीत असत. माझे पती, विजय भोसलेसुद्धा त्याच जाणिवेचे. वडिलांचीच तळमळ त्यांच्यातही उतरलेली. ते बी.ए., बी.एड. झाले; पण शिकतानाच त्यांनी नोकरी न करता सेवाव्रतीच व्हायचे ठरवले होते. या समाजाने दारिद्र्यात आयुष्य का कंठावे हा विचार माज्याही मनात असायचा त्यामुळे मलाही यांचा निर्णय स्वीकारार्ह वाटला.
मला खूप काही कळत नाही किंवा मी खूप शिकलेली पण नाहीये; पण मला नेहमी वाटायचं की, कोणावर कधीच भीक मागायची वेळ येऊ नये आणि कोणा आई-बापांनीही आपल्या मुलाला भीक मागायला पाठवू नये आणि अशाच भीक मागणाऱ्या वंचित मुलांसाठी ‘आदिवासी पारधी समाज विकास संस्था’ यांनी सुरू केली व यातर्फे वसतिगृह चालवण्याचं काम यांनी सुरू केलं. हे म्हणतात शिकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत; पण त्यांना राहणे आणि खाणे योग्य मिळायला हवे. योग्य शिस्त, संस्कार आणि मार्गदर्शन करायला हवे, बाकी आपोआप होत राहील. ही मुलं शिकतील, स्वत: बदलतील. आपल्या समाजालाही बदलवतील. गुन्हेगार म्हणून नकळत त्यांच्या कपाळावर बसलेला शिक्का पुसला जाईल. प्रणिता उत्स्फूर्त बोलत होती आणि मला परवाच घडलेली राईनपाड्याची घटना डोळ्यासमोर येत होती.
ती सांगत होती, लोकसाह्यातून, लोकसहभागातून, अनेक दाते, देणगीदार यांच्या मदतीतून संकल्पाचा हा प्रकल्प पुढे पुढे एक एक पाऊल टाकत आहे. अडचणी येतात काळानुरूप पार होतात. आम्ही मार्गस्थ होत राहतो. खरं तर आम्ही करतोय ते अगदीच मूठभर आहे. हे काम सर्वदूर पसरावे असे वाटते. आम्हाला अजून सरकारी अनुदान मिळाले नाहीये अर्थात त्यावाचून काम थांबले नाहीये; पण मिळाले तर अजून भविष्यातल्या योजना अजून चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी मदत होईल. आता तरी दोन वर्षांपासून आम्ही आमच्या राहत्या घरातच हे वसतिगृह सुरू केलेले आहे.
सध्या आमच्याकडे ७ ते १२, १३ अशा वयोगटातील २५ विद्यार्थी आहेत. १२, १३ अशा वयोगटातील २५ विद्यार्थी आहेत. त्यात १३ मुली आहेत. मी स्वत: यांच्यासाठी जेवण बनवते. एक वेगळाच आनंद रांधताना होत असतो. ही मुलं आवडीने आहे ते खातात. अजिबात त्रास देत नाहीत. या सर्वांसोबत वेळ कसा जातो कळत नाही. ही रेल्वेस्थानकावर भीक मागत हिंडणारी किंवा पुलाखाली वस्ती करून नाही तर सिग्नलपाशी भीक मागणारी मुले लिहू, वाचू लागली आहेत. आपल्या कल्पनेचा विस्तार करू लागली आहेत. विजयजी शिकत असताना या मुलांना नेहमी पाहायचे त्यावेळी यांना फार वाईट वाटायचं. आज मात्र यांना पाहून आमच्याच आयुष्याला काही अर्थ प्राप्त होतोय, असं वाटतं. वसतिगृहातल्या पिंकूला एकदा शाळेत चित्रकलेच्या तासाला ‘निसर्गचित्र’ विषय दिला होता. पिंकूनं खडूच्या माध्यमातून फळ्यावर, डोंगर, वाहती नदी, त्यात मासे, डेरेदार वृक्ष, नारळाचे झाड, फुलं, ढग, पक्षी, टुमदार घर आणि हातात पाटी घेऊन शाळेत जाणारी मुलगी काढली होती. बाकी चित्र सगळी मुलं सहसा काढताच; पण शाळेत जाणारी मुलगी तिने आवर्जून काढली होती. यावरून पिंकूची शिक्षणाची ओढ चित्रात दिसून येत होती. समाजातील उपेक्षित वगार्तील अनेक पिंकू आपल्या मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.
ताई आम्हाला नेहमी एक काळजी वाटते ती म्हणजे पारधी समाजात मुलींची लग्नं लहान वयातच करतात. आता आताच कुठे शिकू लागलेल्या या मुली, त्यांना किमान शिक्षण मिळाले पाहिजे असे मनापासून वाटते. आम्ही त्यांच्या पालकांचे समुपदेशन, प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहोतच.
ती अजून आठवण सांगू लागली, दर शनिवारी संध्याकाळी टीचरकडून इंग्रजीचे धडे घेणाऱ्या मोहिनी, पिंकी, कुंकूम, प्रीती, नेहा रविवारी सकाळी अगदी निवांत खेळत होत्या. तेवढ्यात आमच्या मावशींनी धान्य साफ करायला घेतलं. तश्या सगळ्या चिमण्या खेळ सोडून मावशीच्या भोवती गोळा झाल्या आणि स्वत:हून त्यांना मदत करायला लागल्या. धान्य चाळून घेणे, त्यातील खडे निवडून काढणे, पाखडणे ही कामे मावशीचे बघून बघून मुलींनी अगदी व्यवस्थित केली. वातावरण बदलले की कसा वागण्यात बदल होऊ शकतो, याचं हे एक बोलकं उदाहरणच आहे.ताई मला वाटतं आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन यांच्या किंवा एकूणच वंचितांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक जबाबदारीचे भान जागृत होणे नसेल तर करून देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने जर आपापल्या परीने काही योगदान दिले तर या बालकांबरोबर देशाचे भविष्यही आपोआप आकाराला येईल. चिमुकल्यांच्या उज्ज्वलाची आस धरून कार्यरत असणाऱ्या या दोघांच्याही शुभेच्छांना आपणही शुभेच्छा देऊया.
( priyadharurkar60@gmail.com)