कैलाश मंदिर ही राष्ट्रकूट वंशातील अद्वितीय कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:14 PM2018-09-15T18:14:25+5:302018-09-15T18:25:26+5:30
वेरूळ येथील लेण्यांमध्ये असलेले कैलाश मंदिर ही लेणी जगातील अभियांत्रिकीचा आविष्कार असणारी एकमेव अद्वितीय अशी कलाकृती आहे.
- डॉ. शिवाकांत बाजपेयी, उपाधीक्षक पुरातत्वविद, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग
वेरूळ येथील लेण्यांमध्ये असलेले कैलाश मंदिर ही लेणी जगातील अभियांत्रिकीचा आविष्कार असणारी एकमेव अद्वितीय अशी कलाकृती आहे. या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट वंशातील शक्तिशाली राजा कृष्ण (प्रथम) यांच्या कार्यकाळात इसवी सन ७५६ ते ७७५ या कालखंडात झाली.
वेरूळ येथील लेण्यातील प्रत्येक लेणी ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुनाच आहे. यात कैलाश मंदिर पाहिल्यानंतर याची निर्मिती मानवाच्या हातून झाली असेल, यावर विश्वास बसत नाही. या मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम आहे. या अद्भूत अभियांत्रिकी कौशल्य आणि शिल्प पाहण्यासाठी विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडक कोरून या मंदिराची निर्मिती केली. यातही अखंड दगडाचा एक भाग पूर्णपणे तोडून बाजूला केलेला आहे. महादेवाच्या निवासाचे ठिकाण कैशल पर्वत असल्यामुळे त्या मंदिराचे नाव कैलाश ठेवण्यात आले. कोणत्याही मंदिराची निर्मिती ही खालून वर अशी होत असते; मात्र हे जगातील एकमेव मंदिर आहे. ज्याची निर्मिती वरून खाली अशी केलेली आहे. संत ज्ञानेश्वर यांनीही ‘आधी कळस, मग पाया’ असा उल्लेख केला आहे. हे मंदिर द्रविड शैलीचे असून, पट्टडकलस्थित वीरुपाक्ष मंदिरासारखे आहे. ३०८ फूट लांब, १८८ फूट रुंद आणि ९५ फूट उंच असा आकार आहे. अंदाजे ५० हजार टन वजनाचा खडक मंदिरासाठी कोरला आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी २० वर्षे एवढा कालखंड आणि ५० हजारपेक्षा अधिक कामगारांना कष्ट करावे लागले आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण भारतीय शैलीचे असून, आत प्रवेश करताना द्वारपाल आणि डाव्या बाजूला गणेश, उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनी आणि समोर गजाभिषिक्त लक्ष्मी आपणास दिसते. आतमध्ये नंदी मंडपात केवळ नंदीची मूर्ती आहे. मंदिराचा मुख्य भाग असलेल्या उंच अधिष्ठानाच्या दोन्ही बाजूला महाभारत, रामायणातील कथानक कोरलेले आहे. उजव्या बाजूला रावण कैशल पर्वताला आपल्या दोन्ही हातांनी उचलत असल्याचे सजीव चित्रण केले आहे. याशिवाय अनेक दृश्यांत सिंहाचे चित्रण केलेले आहे. मंदिराच्या पृष्ठभागावर अखंड खडक १३१ फूट उंच आणि ३३ फूट रुंद आहे. हा नमुना अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जगभरात असलेल्या मानवनिर्मिती लेण्यांमध्ये कैलाशसारखी लेणी कोठेही पाहायला मिळत नाही. या लेणीच्या प्रत्येक ठिकाणी आपणाला नक्षीकाम पाहायला मिळते. हे नक्षीकाम अतिशय आखीव-रेखीव पद्धतीने झालेले आहे.