...किमान वाघाची माहिती व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:12 PM2018-08-04T19:12:39+5:302018-08-04T19:14:11+5:30

प्रासंगिक : २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून हे सांगण्यात येते. मराठवाड्यात कधी काळी वाघाचे अस्तित्व असल्याचे दाखले, संदर्भ देण्यात येतात; मात्र दुष्काळ, वेगाने कमी होणाऱ्या जंगलांच्या प्रमाणामुळे मराठवाड्यातून वाघ नामशेष झाला. आता कधीतरी बिबट्या आल्याचे कानी येते. एवढंच काय ते वाघांच्या प्रजातीचा मराठवाड्यातला वावर. मराठवाड्यात तशी चार अभयारण्ये आहेत. यातील गौताळा अभयारण्यात बिबट्याचा राबता असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले. उर्वरित मराठवाड्यात येडशी-रामलिंग अभयारण्य, नायगाव मयूर अभयारण्य आणि जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. यातील एकाही अभयारण्याचा वाघाशी दुरान्वयेही संबंध नाही. तरीही या अनमोल प्राण्याची किमान माहिती व्हावी.

... to know the minimum of tiger | ...किमान वाघाची माहिती व्हावी

...किमान वाघाची माहिती व्हावी

googlenewsNext

- राम शिनगारे

वाघाचे मानव, मानवीय संस्कृती आणि नैसर्गिक परिसंस्थेत अनन्य महत्त्व आहे. तो पर्यावरणाचे प्रतीक समजला जातो. त्याचे जंगलातील अस्तित्व तेथील परिसंस्था जिवंत असल्याचे प्रमाण मानले जाते. एवढेच काय वाघ हा निव्वळ प्राणी नसून, त्या समूहाचा गाभा आहे. वाघ जगभरातून नामशेष होत असताना भारतातील काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये राबविलेल्या योजनांमुळे वाघांच्या संख्येत भर पडल्याचेही दिसून येते. जगभरात वाघाच्या ८ उपप्रजातींचे अस्तित्व १३ देशांमध्ये असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे. यात वाघांची सर्वाधिक संख्या ही भारतातच आहे. हे किमान दिलासादायक चित्र आहे.

बांगलादेश, चीन, लाओस, भूतान, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, रशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांतही वाघ किंवा त्याच्या प्रजातीचे अस्तित्व आहे. बाली देशातून वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळत नसल्यामुळे तेथून तो नष्ट झाला असावा, असेही अनेक अभ्यासात म्हटले आहे. २०१६ साली झालेल्या प्रगणनेनुसार जगात ३ हजार ८९० वाघ आहेत. यातील तब्बल २ हजार २२६ वाघ भारतात असल्याचे स्पष्ट झाले. त्याखालोखाल रशियात ४३३, इंडोनेशियात ३७१ वाघांचे अस्तित्व आहे.

वाघांची संख्या पाहता ती नगण्य अशीच आहे. ज्या ज्या ठिकाणी हा प्राणी आढळतो तेथील त्याचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी वाघाची शिकार केली जाते. या शिकारीच्या प्रकारामुळे तो वेगाने नामशेष होत असल्याचे निरीक्षण विविध अभ्यासात नोंदवले आहे. वाघाच्या संवर्धनासाठी भारतात पहिल्यांदा माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अस्तित्वात आणली. भारतात हिमालय, गुजरात, पंजाब व हरियाणा वगळता सर्व राज्यांत वाघ आढळतो. पश्चिम घाटात वाघांची सर्वात जास्त संख्या आहे. २०१४ च्या प्रगणनेनुसार, पश्चिम घाटात ७७८ वाघांचे अस्तित्व आढळून आले. यात कर्नाटकात सर्वाधिक ४०६ वाघ नोंदविण्यात आले. त्याखालोखाल मध्य व पूर्वोत्तर राज्यांत वाघांची संख्या ६८८ नोंदवली. ज्यात महाराष्ट्रात १९० वाघांचे अस्तित्व असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रात पूर्वेकडील म्हणजेच विदर्भाचा भाग वाघांसाठी नंदनवन समजला जातो.

राज्यात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यातील भौगोलिकदृष्ट्या अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यानंतर विदर्भातीलच पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून नावाजलेला वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर बोर व्याघ्र प्रकल्प आहे. राज्यातील एकूण सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प हे विदर्भात येतात. यावरून विदर्भातील जंगलाचे स्थान आणि त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेली छाप लक्षात येते. विदर्भाच्या बाहेर केवळ कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पात वाघांपेक्षा बिबट्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहणीत आढळून आलेले आहे.

जागतिक स्तरावर वाघाच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारही त्यात सहभागी होत असताना वाघांच्या शिकारीचा प्रश्न गंभीर बनलेला असल्याचे वारंवार दिसून येत आहे. वाघांची शिकार करणाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेटवर्क असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. यामुळे वाघाचे संवर्धन हे पर्यावरणाचे आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धनच आहे. या प्राण्याला वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, एवढेच. 

( shingareram07@gmail.com)

Web Title: ... to know the minimum of tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.