कृष्णवेड्या राधेसारखी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:48 PM2018-01-19T19:48:22+5:302018-01-19T19:48:53+5:30
ललित : मनांच्या तळाशी खोल... सुप्त... शांत... निष्पाप बकुळकळ्या... तुझ्या उष्ण श्वासाच्या झुळकीनं स्मृतीगंध दरवळला... सुकलेल्या निर्माल्यावर पुन्हा तुझ्या अमृतबिंदूंचं दहिवर पडलं... आणि काळाचा पडदा हा... हा म्हणता विरून गेला... मी तुला दिलेल्या मृदुल-हळव्या क्षणांची... त्या तरल रेशमी भाव-बंधाची सुफळ किंमत तू माझ्या ओटीत कधी घातलीच नाहीस... माझ्या फाटक्या पदरात ते अनमोल दान झेलण्याची माझी तयारी होती... पण... पण, प्रारब्धानं आसवांचं दान माझ्या पदरात बांधाल...
- वैशाली गोस्वामी-कुलकर्णी
तुझ्या वळणाच्या वाटेवरती मी आजही माझ्या ओल्या पापण्यांत रितेपणाचे गीत गात उभी आहे... कारण... मी सौदा कधीच केला नाही परतफेड मागितली नाही... तुझ्या भेटीची आस मात्र, आजही मनात घर करून बसलीय... सुख आणि समाधान या दोन वेगळ्या वस्तू आहेत हे मला पहिल्या प्रथम तुझ्या सहवासानेच तर समजलं... तुझा मोरपिशी स्पर्श क्षितिजापल्याच्या अलौकिक प्रवासाची साक्ष होता. तुझा मधुगंध श्वासा-श्वासांत भरून घेताना गात्र उमलून येत होता... तुझ्या डोळ्यातला दरिया किती गहरा वाटायचा... त्यांत हरवून गेले... विरघळून गेले... कैकदा मी माझी नव्हतेच... अंगभर चांदण फुलांचा सडा पडायचा... ती चांदण फुलं वेचताना, ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या अनुभूतींन मोहरून आले. कित्येकदा..! अशा दिव्य सुखाच्या क्षणांच्या ओंजळी भरभरून दिल्या, नी घेतल्या आपण... अमाप... तृप्त होऊनही अतृप्तीचा मधुरस रेंगाळत ठेवणारी जाणीव जिवाला सुखद वाटायची... दिसला नाहीस कधी, तर जीव अगदी घाबराघुबरा व्हायचा... कासावीस व्हायचा... कंठातला सूर हरवल्यागत व्हायचं... वीणेचा झंकारही अनोळखी व्हायचा... त्याची धूण ऐकू यायची; पण सूर सापडायचा नाही... अस्वस्थपणे काळच ओढून न्यायचा काळजाची लक्तरं, संध्याकाळी... त्या कातरवेळी नुसती हुरहुर... सूर्य बुडून चंद्र नितळ व्हायचा... अंतरंगात नि:शब्द भावनांचं दाटलेलं काहूर...
अचानक़.. श्रावणातला सोसाट्याचा पिसाटवारा सुटला... अंदाधुंद... क्षितिजाकडे तोडून पाऊसधारा कोसळू लागल्या... माझं चंद्रमौळी स्वप्नं उद्ध्वस्त झालं... झपाटून... लपेटून घेतलं जीवघेण्या पावसानं... वेढून टाकलं... तुला... मला... पुन्हा कधीही न भेटण्यासाठी... पण... पण... तुला जीवापासून... जीवनापासून वेगळं कसं रे काढता येईल ? एकत्र राहून ‘एकपण’... ‘अद्वैत’ भोगणं यात काय ते नवल? ते सोपं असतं... सहजशक्य असतं... स्वाभाविक असतं... पण दोन धु्रवांवर अस्तित्व असणार्या तार्यांनी तृप्त मीलनाचे, परम आनंदाचे क्षण भोगणं म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिवापाड केलेल्या प्रेमाचा कडेलोटच ! काळजात... खोल, अगदी तळाशी असलेली ही अव्यक्त जखम चिरंतन भळभळणारी... अव्याहतपणे ठसठसणारी... अश्वत्थाम्यासारखी... तरीही दूर क्षितिजापल्याड वाट पाहत असलेल्या दिव्य-अलौकिक मोक्षाच्या तृप्तीसाठी...
मी...तुझी प्रतिमा उरांत घेऊन फिरत राहील...!
शोधत राहीन तुला मुरारी...!!
कृष्णवेड्या राधेसारखी...!!!
( vaishgoskul@gmail.com )