वटवृक्ष असा होऊ या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:36 PM2018-03-10T18:36:29+5:302018-03-10T18:37:10+5:30

अनिवार : ज्या मनात ओतप्रोत प्रेम भरून वाहू लागतं ते मन ठायी ठायी परमात्म्याच्या स्पर्शालाही जाणून घेऊ लागतं. त्या मनात करुणाही आपोआप नांदू लागते आणि वात्सल्य ओसंडू लागतं. जे अनेक अनाथांना आईपण देऊ लागतं आणि एकूण व्यक्तिमत्त्वालाच कृतार्थही करतं. हे असेच काहीसे भाव, लक्ष्मीशी बोलताना मला जाणवत होते. तशी अगदी साधीशी पण कृतार्थतेने परिपूर्ण होऊ लागलेली लक्ष्मी, नंदनवन परिवाराची छत्रछाया होऊन वावरतेय. सासू, सासरे, यजमान यांच्याबरोबरीने अनाथालयाचं काम बघतेय. मी तिला विचारलं, तुला कशी काय  या कार्यात रुची निर्माण झाली? तर ती म्हणाली, ताई आपल्या भोगण्यातून आपल्याच आत आपली एक भूमिका नकळत तयार झालेली असते आणि संधी मिळाली तर ती भूमिका आपण जगूही लागतो. असेच काही माझ्याही बाबतीत घडले.

Let it be like a tree | वटवृक्ष असा होऊ या

वटवृक्ष असा होऊ या

googlenewsNext

- प्रिया धारुरकर

ताई आम्ही तिघे भावंडं. आम्ही लहान असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. मोठ्या भावावर जबाबदारी पडली, पण मोठा म्हणलं तरी तेव्हा तो फक्त १२ वर्षांचा, मी ९ वर्षांची आणि धाकटा भाऊ ८  वर्षांचा. अगदीच हलाखीची परिस्थिती. आईबरोबर लिंबोळ्या वेचायला जायचो, त्या विकून कशीतरी गुजराण व्हायची. गरिबी आणि परिस्थितीच्या चटक्यांनी घडत गेले. त्यामुळे दुसर्‍याची वेदना समजून घेण्याची कुवत निर्माण झाली. यांचं स्थळ आलं, त्यांची त्यांनीच स्वत:ला घालून घेतलेली अट होती की गरजू मुलींशीच मी लग्न करील. २०११ साली आमचं लग्न झालं. त्यांनी लग्न ठरत असतानाच सांगितलं होतं की त्यांचं जगणं हे त्यांनी समाजासाठी वाहिलेलं आहे. अर्थातच मलाही हे मान्य होतंच. खूप आनंद झाला आणि त्यांच्या पाऊलवाटेवर चालू लागले. अजून शिक्षण बाकी होतं, मग लग्नानंतर बी. ए. झाले.

माझ्याचसारख्या अनेक पीडित, गरजूंच्या मदतीला माझेही हात आता कामी येणार होते. कोणाचं दु:ख आपल्या निमित्ताने दूर होतं तेव्हा वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं. ती पुढे सांगू लागली, तिचे सासरे विक्रम दराखे हे ग्रामसेवक होते. तेव्हापासून गरजू विद्यार्थ्यांना ते सातत्याने मदत करत असत. त्यांच्या समाजकार्याची आवड त्यांच्या मुलात म्हणजे अजयमध्येही उतरली होती. २०१० पासून आई-वडिलांच्या मदतीने, स्वखर्चाने गरजू, अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला. आजही ४८ मुला-मुलींना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. पुढे यातूनच स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी व आई-वडील यांच्या प्रेरणेतून बुलडाणा- चिखली रोडवर साखळी फाट्यापाशी स्वत:च्याच शेतात ‘छत्रछाया ह्यूमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन बुलडाणा’ची स्थापना करून नंदनवन परिवाराची संकल्पना आकाराला आली व ‘चिमुकल्या वेलींना नवा आकार देऊया, चला मिळुनिया सारे वटवृक्ष असा होऊ या’ म्हणत  १८ विद्यार्थ्यांसाठीचा निवासी प्रकल्पही सुरू झाला. 

वेगवेगळ्या दु:खंचा पोत पांघरूण आलेला प्रत्येकजण. कोणी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचा मुलगा तर कोणाचे आई-वडील अपघातात गेलेले, तर कोणाची अगदीच हलाखीची परिस्थिती. त्यांना आम्ही विश्वास देतो, त्याचं थांबलेलं शिक्षण सुरू करतो. त्यांची आवड ओळखून ते शिक्षण देण्याचा आमचा अट्टाहास असतो. धनुर्विद्या, जलतरण, चित्रकला, कोचिंग क्लास अशा विविध वर्गांना पाठवतो. विशेष म्हणजे हे तज्ज्ञ इथल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देतात. विदर्भ लेव्हलपर्यंत आकाश या विद्यार्थ्याने मजल मारली आहे. तर ऋषिकेश मेडिकल एन्ट्रन्स, ‘नीटची’ तयारी करतोय. काही मुलं हट्टी, जिद्दीची आहेत, पण मुलंच ती. सगळ्यांचं मनोरंजन पण करतात. आम्ही अगदी एकरूप झालो आहोत.

ती ज्या परिस्थितीत वाढली तशीच वेळ इंद्राबाई नावाच्या एका वृद्धेवर आली होती. आई-वडील वारल्यामुळे ५ नातवंडांच्या शिक्षणाची आणि एकूणच पोसण्याची न पेलणारी जबाबदारी येऊन पडली होती. ही वृद्धा गावोगाव फिरून झाडपाला गोळा करून तो चिखलीच्या बाजारात विकून प्रपंचाचा गाडा कसाबसा ओढत होती. याची माहिती कळल्यानंतर छत्रछायाने त्यांना आपल्या परिवारात सामावून घेतलं. मुलांच्या १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. त्यावेळी मला माझेच जुने दिवस आठवत होते. सांगताना तिला भरून येत होतं. कितीदा तरी लोकांच्या अविश्वासामुळे अनेक कटू प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. पण लोकांना आमच्या कामातील सत्यता दिसून येते तेव्हा लोक माफीदेखील मागतात. संघर्ष, समाधान अशा दोन्ही गोष्टी तोलत आमची वाटचाल सुरू आहे. आज टीन शेड आहे, पण लवकरच बिल्डिंग तयार होईल. प्रकल्प मोठा आहे, बरेच उपक्रम राबवायचे आहेत आणि आम्ही यशस्वी होऊ. कारण आमचे सर्व सहकारी, कार्यकर्ते सर्वांची खूप मोलाची साथ आम्हाला आहे.

डॉ. अविनाश सावजींसारखे सुहृद, लोकजागर प्रतिष्ठान व अनेकानेक दानशूर या सर्वांची संस्थेला मदत आणि मोलाचं सहकार्य नेहमीच मिळत असतं. मी ऐकत होते, मनातून या सार्‍यांना नमस्कार करीत होते. त्यांच्या एकूण कार्याचं सार लक्षात येत होतं ते म्हणजे, नो रिलीजन इज हायर दॅन ह्युमॅनिटी. सगळ्या हुशार, होतकरू, गरजू मुलांना असेच मायेचे अंगण लाभो व जगातलं मानव्य वाढत राहो ही सदिच्छा आपण सारेच व्यक्त करूया आणि आपल्यातलं मूठभर आकाश यांना देऊया.
( priyadharurkar60@gmail.com )

Web Title: Let it be like a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.