जिंदगी धूप, तुम घना साया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 07:14 PM2018-03-17T19:14:08+5:302018-03-17T19:15:29+5:30

ललित : का कुणास ठावूक, पण कुणे एके काळी फुलांच्या अंगभर लपेटून होती विषण्ण ग्रीष्मउदासी.. मनातला वसंत ऐन बहरात असताना! मौनाच्या नीरव रात्रीनंतर उमललेल्या एका संवादकिरणाची ती भुरळ अन् पदरातली ओकीबोकी पहाट केशरून आलेली.. ‘हा प्रवास तुला सुंदर वाटतो का?’ फुलांच्या या  प्रश्नाचं गंधभारलं उत्तर ‘खुप्प सुंदर!’ प्राजक्त टपटपून आला. घमघमून दरवळून गेला अवघा आसंमत.

Life is sunny, you are warm shadow | जिंदगी धूप, तुम घना साया

जिंदगी धूप, तुम घना साया

googlenewsNext

- ज्योती कदम

ही गोष्ट सुरू होते ती डोंगराच्या पार पल्याडच्या आटपाट नगरातून. त्या नगरातली कुण्या अनामिक बागेतली ही फुलं.. जन्मदात्या फांदीवर झोके घेत वसंतगाणी म्हणणारी.. कुण्या अज्ञात दिशेचा वारा.. वाहत येतो नि जातो कैकदा.. ना फुलांना वार्‍याची झुळझुळ जाग ना वार्‍याला फुलांची गंधवार्ता..!
पण एका निसटत्या अलवार क्षणी फुलं रुणझुणू लागली अचानकच! वार्‍याचं झुळझुळणं सगळ्या परागकणांना संमोहित करून गेलं.. वार्‍याच्या येण्याजाण्याच्या गंधवेळा अधोरेखित होऊ लागल्या पाकळी पाकळीवर.. आणि वार्‍यालाही उमगूलागला पाकळ्यांचा उमलता गंध. ख्यालीखुशाली विचारत रेंगाळू लागली दोघेही एकमेकांच्या परसाचं परिघ ओलांडत. हिरव्यागार लुसलुशीत पानावरच्या नितळ दवबिंदूसारखा तो.. अधिकच चकाकत जावा म्हणून ती करीत गेली कस्तुरगंधपेरणी!

ओटीपोटात न जाणो कुठून दाटून येत गेली माया.. त्वचेचे सगळे पोत जागच्या जागी गळून पडले. कात टाकली सगळ्या दिशांनी.. स्वत:च्याही आरपार स्वत:ला शोधण्याचं वेड.. पाकळी पाकळी गळून विरघळून जावी त्याच्यात तरीही उरावंच स्वत:चं असं गंधअस्तित्व. सहअस्तित्वाचं वेडच ते... ओघळून आले काजळथेंब पाकळ्यांचे. चैतन्याच्या अमर्याद वतुर्ळाचं असं विस्तारणं.. सृजित होत गेलं ब्रह्मांडाचं अपार ममत्व. या अशा ममत्वानं भारून जातं जगणं. झुल्यांचे हिंदोळे डोलायला लागतात नि तार्‍यांची कशीश डोळ्यांतून थेंबभर ऊबदार होत साकोळत ठेवते मनाच्या वेडेपणाला. दोन ध्रुवांखेरीज काहीच उरत नाही. उरते ती फक्त विलक्षण पोकळी. मनाचा गाभारा गंधाळून आल्याची ती नीरजाणीव..!

सुरुवातीला प्रवास असतोच की उत्कट मोगरपावलांचा..नाजूक नजाकतीचा..वाटेलाही रिमझिमत ठेवणारा.! हळूहळू ओळखीचे होत जातात रस्ते..त्यांनाही फुटतात कोंब नवीन रस्त्यांचे नि वेल्हाळत जाते प्रवासाची लय.. दूरवर गोठत जातात मनसावल्या कुण्याकाळच्या ओढाळ क्षणांसाठी; पण गवसेल असं वाटत नाही ती प्राणप्रिय पाऊलवाट. कट्टी-बट्टीचा नवाच खेळ ऊन-सावल्यांसारखा कधी अंगणात दाटीवाटी करतो कळतच नाही. शब्द बोथट होतात अर्थहीन अभेद्य कवचांसह आणि मौन मात्र विस्फारत जातं स्वत:चे अगडबंब अंगप्रत्यांग! मौनाच्या पलीकडचं ऐकता आलं तर ऐकून घ्यावं नि समजूनही घ्यावं खरं तर. नितळ पाण्यातलं जमिनीवरचं आपलंच चिमूटभर प्रतिबिंब जमलं तर घ्यावं उचलून जमिनीवरून नि हलकेच मिसळावा केशरगंध.. अनामिकेनं लावावा तो प्राणगंध कुण्या जवळच्या माणसाच्या कपाळावर.. दोन भुवयांच्या अगदी मधोमध! पंचप्राणांचं हे असं औक्षण नि गळून पडतात मौनाच्या सगळ्या तटबंदी त्यांच्या कालातीत चिरेबंदी जडत्वासह.

खरं तर संवादी मौन कसं मस्त साधता येतं स्वत:शीच! क्षितिजापल्याड डुंबत जाणारा केशरसूर्य खुणावत जातो मनाला, तेव्हा दाटून येतात प्रवासी पावलांचे अनिवार ठसे मागे सोडून आलेल्या वाटेवर.. ही वाट गिरकते, मुरकते तर छळतेही कित्येकदा. ‘जिंदगी धूप, तुम घना साया’ म्हणत चालत राहते वाट स्वत:च्या पावलांनी कुण्या दुसर्‍याच्या स्वप्नांची पाऊलवाट. त्या वाटेवरचं ऊनही सावली होऊन मनात घनगर्द दाटून येतं तेव्हा मोरपिसांचं नवीन गाव पापण्यांच्या वस्तीला येऊ लागतं. मौनाची परिमाणं शोधू लागतात नवीन परिभाषा  शब्दांची.. मृत्यूच्या काड्यांनी विणलेलं जगण्याचं घरटं अशाश्वताच्या फांदीवरून कधीही गळून पडेल असं अधांतरी..तरीही ही गंधविण विणत बसलाय काळ..खरंच सुंदर आहे हा काळाचा प्रवास!

( Jyotikadam07@rediffmail.com )

Web Title: Life is sunny, you are warm shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.