...इथे जिभेवर बसून आहे जगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:19 PM2018-08-18T19:19:15+5:302018-08-18T19:21:19+5:30
बळ बोलीचे : नवे नवे शब्द एखादेवेळी शास्त्रांत कमी सापडतील. पण, समाजाच्या दैनंदिन जीवनामध्ये नव्या नव्या शब्दांचा पावसाळा मात्र सदोदित बरसणारा असतो. गावाकडचे लोक पुस्तकांचे आधार घेऊन कुठे बोलतात? ते रोजच्या व्यवहारातले बोलतात. व्यवहारातून बोलतात. त्यांची भाषा आणि त्यांचे जगणे म्हणजे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. डिट्टोसारख्या. या माणसांच्या शब्दांना मातीचा गंध असतो. त्यांच्या शब्दांना अनुभवांचे बलदंड बळ असते. त्या शब्दांमध्ये भवतालाचा सारांश असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकांच्या भाषेत सहजता जी असते, ती केवळ प्रभावी आणि मने जिंकून घेणारीच असते. याचा अर्थ असा की, ‘इथे जिभेवर बसून असते जगणे...’
- डॉ. केशव सखाराम देशमुख
सभोवतालची अवघी जैवसृष्टी, प्राणीसृष्टी, कामेधामे या सगळ्या सगळ्या रोजच्या जीवनवाहिनीला गावाकडच्या लोकांनी जे शब्दांचे आणि ‘नवनामांचे’ कोंदण चढवलेले असते ते लाजवाब असे असते. काही खास शब्दांचे दर्शन तिथे कसे घडते ते आता पाहा : शेळीचे पिल्लू इथे ‘पाठ’ या शब्दाने ओळखले जाते. म्हशीच्या पिलाला ‘वघारू’ म्हणून हाक घातली जाते आणि गायीच्या लेकराला म्हणून; गायीच्या लेकीला ‘काऱ्होड’ म्हणण्याचा प्रघात आहे. म्हशीला अजून ‘डोबाड’ हे एक दुसरे नाव आहेच. जीव तोच. पण जरा अधिक सुलभीकरण करत त्या जिवांची नावे बदलून जातात आणि नवा शब्द आपल्या कानात मुक्कामाला येतो. शब्दांचे हे माधुर्य असे गावांनीच समाजाच्या सवयीत मिसळून टाकलेले आहे.
बेडूक या एका उभयचर उडीमारू प्राण्यांची गावाकडं ‘बेंडकोळ्या’ अशी अनेक वचनं झालेली बघायला मिळतात. गांडुळाचा तिथे ‘सिदोड’ होऊन बघायला मिळतात. तिथे डास चावत नसतात. तर ‘चिलटं’ चावतात. सापाचा पण ‘सरोप’ होता; आणि ‘शापाचा’, ‘सराप’ होऊन जातो. संबोधनांचा खूप अचूक वापर करत प्राणीजगतांना बोलावताना किंवा ‘जा’ असे म्हणताना किती किती मोहक, लयदार, तालबद्ध, काव्यात्म शब्दांचा वापर गावलोकांकडून होतो; तो फारच मस्त आणि टवटवीत असाच म्हणायला हवा. उदाहरणार्थ शेळ्यांना ‘थीर थीर’ अथवा कुत्र्याला ‘हाडहाड’ (या ‘हाड’ म्हणण्यात हड्डी, हाडाचा सुप्त अर्थ आहे; तो फारच मार्मिक म्हणायला हवा.) अथवा कोंबड्यांना हाक मारताना ‘आ तीतीती... आ तीतीती...’ असे काढून जे बोलावले जाते; त्यातली काव्यात्मकता केवढी काठोकाठ भरलेली आहे ! बैलांना हाकारताना ‘दी दी दी दी’ असा एक शब्दी एक अक्षरातून छोडासा शब्द उच्चारला जातो आणि बैलाच्या खुरात काही जेव्हा अडकते, अडकलेले काढायचे असते तेव्हा बैलाला उद्देशून ‘उच उच’ म्हणत त्याच्या खुरातली अडगळ काढून टाकली जाते.
काही भागात; दुधावर टपलेले मांजर हुसकावून लावताना किंवा मांजराला हाक घालताना ‘सीबीसीबी’ असा विचित्रच शब्द त्याकरिता उपयोजिलेला ऐकायला मिळतो. झुडपांच्या बेचक्यातून ससा पळवून लावण्यासाठी ‘हुसूक हुसूक’ असा द्विपदी पण लयबद्ध शब्द वापरला जातो. ‘हुसूक’मध्ये ‘हुसकावून लावणे’ हा वाक्प्रयोग दडलेला आढळतो. उच्चार सौकर्य म्हणून आणि त्याच शब्दाचा ध्वनी बदलत जरासा नना शब्द गावबोलीमध्ये जो येतो त्या शब्दाला खास ग्रामगंध आहे. म्हणजे आता हेच पाहा : विंचवाचा ‘इच्चू’ झाला. सरड्याचा ‘सल्डा’ होतो. बैलाचा ‘बईल’ आणि म्हैशीचे ‘मसड’ असे अभिनव, खूप सुगम नाम झालेले ऐकायला मिळते. ग्रामजगरहाटीमध्ये सरपटणारे, अन्य प्राणी बिळात न राहता ‘भडोळ्यात’ राहतात. तर पाळीव प्राणी गोठ्यात राहण्याऐवजी ‘कोठ्यात’ राहतात. इथे ‘गो’ आणि ‘को’मध्ये झालेला वर्णस्थळ बदल मजेशीर आहे.
कापला जाऊन खाऊन टाकला जाणार ‘बोकड’ गावशैलीत ‘बोकड्या’ बनून शिजवला जातो. इथे पाण्यात राहणाऱ्या बिनविषारी सापाला ‘इरळ’ म्हणतात. या झाडांवरून त्या झाडांवर सरसर धावणाऱ्या खारीला इथे ‘खडोळी’ म्हणण्याचा प्रघात आहे. भाषेच्या नित्यनूतन रूपात हे असे इथे माणसांचे जगणे आणि शब्दांचे लावण्य त्यांच्या जिभेवरच बसलेले आहे... उंदरांची संख्या वाढली की त्यांची ‘उंद्रं’ होतात. हरिणांच्या कळपाला ‘हार्नं’ म्हणायची सवय इथलीच. ज्याच्यात कोंबड्या कोंडून ठेवतात; त्या सुंदरशा वस्तूला ‘खुराडं’ असे सुबक नाव आहे आणि पाळीव प्राण्यांना (गाय, बैल, म्हैैस इ.) जिथे जागेवर चारा घातला जातो, त्या चराईला ‘गव्हान’ सारखा शब्द दिला आहे.
धांद, नाडा, चऱ्हाट, सोल, कासरा, येसन, कान्ही, पायखुटी, लोढनं, दावं, चाबूक, पुरानी, काठी, मुचके हे सगळे सगळे इतके सुंदर शब्द पाळीव प्राण्यांच्या सोडबांध करण्याशी आणि त्यांना सांभाळण्यासाठी बंधनयुक्ततेचा भाग म्हणून येतात. मुक्या जिवांना सांभाळणारी तसेच वठणीवर आणणारी ‘ही साधनसंस्कृती’ म्हणायला हवी. ‘एक गाव आणि त्याचे लक्षकोटी आविष्कार’ याप्रमाणे खेडुतांचे भाषेसाठी, संस्कृती जपणुकीसाठी असणारे योगदान हे अनन्यसाधारण अशा श्रेणीत मोडणारे आहे. परंपरेचे वहाते पाणी इथे गढूळ झालेले नाही. ही परंपराच नवशब्दांची जननी आहे. एक पिढी, पुढच्या पिढीला हा शब्दधनांचा आणि वस्तूधनांचा वारसा ‘प्रेमभावे’ सहज सोपविते. या शिकवणीला कोणतीच ‘ट्यूशन फी‘ नसते किंवा मीच हे शिकवले, असा तिथे बोभाटा नसतो. माणसे येतात आणि जातात. पण, खोलवर रुतून बसलेल्या भाषेला इथे मृत्यू नसतो. ‘पिकं ये जा करतात; हंगाम बदलतात; जनता कधी कधी मायग्रेट होते... पण, इथली भाषा मात्र जमिनीच्या देहाभोवती वेल होऊन लगडूनच असते.’
( keshavdeshmukh74@gmail.com )