लोकल प्रयोग, ग्लोबल कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:29 PM2018-03-10T18:29:36+5:302018-03-10T18:30:42+5:30
बुकशेल्फ : नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी उभारलेल्या साखर उद्योग विकास गाथा यावर ‘साखरनामा’ हा ग्रंथ शनिवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाला. या ग्रंथाचा परिचय.
- संजय शिंदे
काही माणसं गावामुळे मोठी होतात, तर काही गावांना तिथल्या कर्तबगार माणसामुळे नावलौकिक मिळत असतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी हे यातील दुसर्या प्रकारचं गावं. भैरवनाथ भगवान ठोंबरे अर्थात बी. बी. ठोंबरे या नावानं विख्यात झालेले ‘आधुनिक भगीरथ’. बीड-लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रांजणी परिसराच्या विकासाची यशोगाथा. माळारानावर साखर अन् वीजही पिकते, अन् शेतकर्यांच्या दारापर्यंत ‘समृद्धी महामार्ग’ पोहोचतो. याचा हा एक अर्थाने इतिहास. पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीस तोड असणारे मराठवाड्यातील ‘शुगर मॉडेल’. रांजणी नावाचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या नकाशावरील ठिकाण भारताच्या नकाशावर गडदपणे दिसू लागले, याची संपूर्ण कहाणीच विद्याधर कांदे पाटील यांनी ‘साखरनामा’तून साकारली आहे. विकासाचे रस्ते सहसा शहराकडून खेड्याकडे जातात; मात्र हा खेड्यातून शहराकडे जाणारा ‘शाश्वत विकासाचा मार्ग’आहे.
‘साखरनामा-एका कटू संघर्षाची गोड कहाणी’ या सव्वादोनशे पानांच्या पुस्तकातील १४ प्रकरणांत ही संपूर्ण ‘यशोगाथा’ मांडली आहे. यामध्ये संघर्षमय जीवनप्रवास, शून्यातून उभारले उद्योगविश्व, नॅचरल यशाची दशसूत्री, दूध व्यवसाय, नॅचरल जलसंधारण योजना : एक आदर्श, उद्योगाचा मूलमंत्र, साखर उद्योग : दृष्टिक्षेप, शेतकर्यांच्या आत्महत्यांचे विस्मरण होऊ नये, शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज या प्रमुख प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय ‘मान्यवरांच्या नजरेतून’मध्ये मान्यवरांच्या प्रतिकिया आहेत. यात कारखान्याच्या उभारणीपासून सोबत असलेल्या ज्ञानेश्वर काळदाते, पांडुरंग आवाड, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, अमर हबीब यांच्यासह राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रस्तावना ग्रंथाला आहे.
१९१८ मध्ये उभारणी सुरू झालेल्या बेलापूर साखर कारखान्यापासूनची शंभर वर्षांची या उद्योगाची वाटचाल त्यांनी मांडली आहे. साखर उद्योगातील हा ‘ठोंबरे पॅटर्न’ असल्याचा गौरवपूर्वक उल्लेख त्यांनी केला आहे. साखर उद्योगासमोरील दुष्काळ, पाणीटंचाई, अवर्षणप्रवण भाग, नैसर्गिक संकटे, अकार्यक्षम व्यवस्थापन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, कार्यक्षमतेचा पूर्व वापर न होणे आदी कारणांमुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. सहकार साखर कारखान्यांसमोरील संकटाचा ऊहापोह शरद पवार यांनी प्रस्तावनेत केला आहे. शिवाजी विद्यापीठात ‘एमबीए’ला असताना बी.बी.ठोंबरे यांनी छोट्या साखर कारखान्याचा ‘प्रोजेक्ट’ सादर केला होता. कारखानानिर्मितीची बीजे या प्रकल्पातच पेरली गेली. नंतरच्या काळात गोदावरी मनार, जय जवान, अंबाजोगाई, मांजरा व वैद्यनाथ आदी साखर कारखाना निर्मिती-विकासात ठोंबरे यांनी मोलाचे योगदान दिले. १९९८ मध्ये साखर उद्योग लायसनमुक्त केल्यानंतर त्यांनी रांजणी या जन्मभूमीत कारखाना उभारण्याचे पाहिलेले स्वप्न साकारण्यास मदत झाली.
खरे तर मराठी माणूस मोठ्या पदावर पोहोचण्याचे स्वप्न पाहतो; मात्र उद्योगपती व्हायच्या नादी लागत नाही, असे म्हटले जाते. ठोंबरे यांचा ‘नॅचरल प्रयोग’ मात्र याला अपवाद आहे. रांजणी परिसरातील माणसं जिरायती शेतीत राबराब राबत होती; मात्र उद्योग करीत नव्हती. संस्था चालवता नव्हती, तर संसाराचा गाडा कसाबसा हाकत होती. आर्थिक व्यवहाराबाबत केवळ तर्काच्या आधारे बोलत होती, हे वीस वर्षांपूर्वीचं वास्तव आज बदललं आहे. ज्या गावात दिवसातून दोनदाच सरकारी एसटी जात असे, आज तिथं गावोगाव चारचाकी आणि घरटी किमान एक दुचाकी आली आहे अन् सिमेंट काँक्रीटची घरही उभारली गेली आहेत. हे बदलले, कारण येथे साखरेबरोबरच को-जनरेशन, वॉटर मॅनेजमेंट प्लांट, डिस्टलरी, बायोगॅस, सोलार, दूध प्रक्रिया उद्योग इथे साकारले आहेत.
‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज’ या नावाने झालेल्या ‘नॅचरल’ उद्योग समूहातर्फे आता साखर, वीज, सौर ऊर्जा, दूध, दुग्धजन्य पदार्थ आदींची निर्मिती होते, तसेच जलसंधारणाची कामे, शाळा, कॉलेज, पतसंस्था, ग्राहक पेठ आदी प्रकल्पही साकारले आहेत. खर्या अर्थाने शेतकर्यांच्या मालकीचा म्हणून ओळखल्या जाणार्या ‘नॅचरल परिवाराची’ वार्षिक उलाढाल पाचशे कोटींपर्यंत पोहोचली आहे, याचे सविस्तर वर्णन ग्रंथात आहे. ‘एन-साई’च्या माध्यमातून २००-२५० गावांतील जवळपास ५० हजार कुटुंबांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समृद्धी आली. या कारखान्याचे शरीर खासगी, आत्मा सहकारी व मेंदू आधुनिक पद्धतीचा आहे. एक यशस्वी कारखाना आणि त्याला पूरक प्रकिया उद्योग, फायदेशीर प्रकल्प उभारल्यानंतर जे यश, कीर्ती व पैसा मिळाला तरी ठोंबरे यांचे पाय जमिनीवर अन् नजर आकाशाकडे आहे. ‘शेतकरी आत्महत्या’ व ‘भकास खेडी’ हे वास्तव बदलण्यासाठी ‘नॅचरल’ने रांजणीत केलेले लोकल प्रयोग आज ग्लोबल बनले आहेत.