मराठीची समृद्धी बोलीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:19 PM2018-02-28T20:19:38+5:302018-02-28T20:20:05+5:30

प्रासंगिक : आपण मराठी भाषा  बोलतो याचा अर्थ आपण  मराठीचं कुठलातरी  प्रादेशिक रूप म्हणजेच कुठली तरी बोली बोलत असतो. खरं तर , भाषा ही फक्त ध्वनिव्यवस्था नसून, ती संस्कृती वहनाचे महत्त्वाचे कार्य  पार पाडत असते. त्या-त्या ठिकाणच्या संस्कृतीचा प्रभाव  त्या भाषेवर पडतो. मराठी भाषेमध्ये अनेक बोलीभाषांचा अंतर्भाव होतो. प्रदेशानुसार मराठी बोलीचे वºहाडी, पुणेरी, कोकणी मराठी, कोल्हापुरी, कारवारी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी व डांगी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत असतात. स्थानिक भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, व-हाडी, बेळगावी, मालवणी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खान्देशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात. मुख्य प्रमाण मराठी भाषेशी नाते कायम ठेवलेली, मराठी बोलीभाषा दर १२ कोसागणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत राहते. 

Marathi richness is in speech | मराठीची समृद्धी बोलीतच

मराठीची समृद्धी बोलीतच

googlenewsNext

- विश्वास सोपानराव मुंडे 

सरकारी कामात व व्यवहारात प्रमाण मराठी भाषा वापरली जाते. प्रमाण भाषा ही सर्वदूर समजते, ती व्याकरणाचे नियम पाळते. याउलट, ग्रामीण भागात व निमशहरी भागात बोलीभाषेचा वापर आढळून येतो. बोलीभाषा या रसरशीत, ठसकेबाज आणि अधिक जिवंत असतात. त्या व्याकरणाचे नियम पाळत नाहीत. बोलीभाषा भावनांना तोलून धरतात. बोलीभाषा त्या भागातील मातीचा सुवास घेऊन वावरत असतात. मराठी भाषा ही अशा अनेक प्राचीन, संपन्न बोलीभाषांनी समृद्ध झालेली आहे. 

विशिष्ट हेल असलेली मराठवाडी बोली ही एक गोड, ठसकेबाज आणि आदरातिथ्याने ओतप्रोत भरलेली बोली असून, तिच्यातही लातूर, बीड, परभणी या भागांत बरेच बदल आढळून येतात. ‘आलाव, गेलाव’ (म्हणजे आलोत, गेलोत) यासारखे शब्द येतात, तर मनसूब, कुडतं (सदरा), मकान, बात, असे  फार्शीतून थेट मराठीत आलेले शब्द आढळतात. ‘आरबळलेला’ म्हणजे घाबरून-गोंधळून गेलेला, असा इतर कुठेही न आढळणारा शब्द ग्रामीण मराठवाड्यात सर्रास वापरला जातो. 

विदर्भात व-हाडी ही अतिप्राचीन बोली आहे. बुलडाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वºहाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ ८०० वर्षांपूर्वीच्या वºहाडी बोलीत लिहिला गेला. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे. ‘काय लेका, येऊन राह्यला, असे शब्दप्रयोग वºहाडीत आढळतात. नागपुरी, झाडी, माडिया, गोंडी बोली, अशा अनेक बोली वºहाडीत आढळतात. झाडी बोलीत एक समृद्ध मराठी नाट्यपरंपरा आहे, जी स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करते. 

उत्तरेकडे अहिराणी ही बोली खान्देशात प्रचलित असून, बहिणाबाई चौधरी यांनी विपुल साहित्यलेखन अहिराणीत केले आहे. भालचंद्र नेमाडे, ना.धों. महानोर यांच्या साहित्यात अहिराणीचा वापर आढळून येतो. अहिराणीत ‘ळ’ चा ‘य’ होतो. ‘आधी हाताये चटके मग मियते भाकर’ या ओळीतून अहिराणी बोली प्रत्येक मराठी मनात घर करून बसली आहे. शब्दामध्ये नाद व लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. मालवणी ही दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी बोली आहे. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. ‘दशावतार’ या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झिल (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा). मच्ंिछद्र कांबळी यांच्या नाटकातून ही बोली आढळते. आगरी बोली ठाणे, रायगड जिल्ह्यांतील आगरी, गवळी व कुणबी तसेच किनारपट्टीवरील कोळी, खारवी, भंडारी व भोई ही बोली बोलतात. ‘आगरी भाषा प्रत्येक गावान बोलतान वेगवेगली; पण आथा आपली भाषा इसरत  चाललेन सगली!’ अशी ती व्यक्त होत राहते. कोल्हापूर भागात बोलली जाणारी कोल्हापुरी बोली ही रांगडी बोली असून, लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव या भाषेवर दिसतो. भाषेत शिव्यांचा ‘प्रेमळ’ वापर आढळतो. ‘असं का डोस्कं फिरल्यागत करतूस?’ अशी प्रेमळ विचारणा केली जाते. 

मराठी भाषा या आणि अशा अनेक बोलींनी समृद्ध झाली आहे. बोलीभाषा ही प्रमाण भाषेला जीवनरस पुरवत असते. वर्तमानात इंग्लिश आणि प्रमाण मराठी भाषेचे आक्रमण यामुळे बोलीभाषा गुदमरून जात आहेत. कदाचित या विविध बोलीभाषा कालांतराने नष्ट होऊन जातील. तद्नंतर आपल्या नातवंडांना, येणार्‍या पिढ्यांना  देण्यासाठी आपल्याकडे फक्त बाराखडी असेल, बाराखडी!
(लेखक औरंगाबादस्थित सहआयुक्त (आयकर) आहेत.)

Web Title: Marathi richness is in speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.