मैत्र जीवांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:17 PM2018-08-04T19:17:30+5:302018-08-04T19:18:36+5:30

ललित : शाळेत एका बाकावर बसून सगळ्यांच्या नकळत चिंच-बोरांची केलेली देवाणघेवाण मनात रेंगाळत राहते प्रत्येक आंबटगोड वळणावर..मधल्या सुटीत डब्यातल्या खाऊचा एकेक घास सगळ्यांना दिल्याशिवाय पोटच भरत नसतं.. तो तेव्हाचा तृप्तीचा क्षण असा घट्ट गोंदून ठेवलेला असतो मनात.. 

Maternal cousins | मैत्र जीवांचे...

मैत्र जीवांचे...

googlenewsNext

- ज्योती कदम 

लहानपणी ऐकलेली कृष्ण-सुदाम्याची गोष्ट आयुष्याच्या सगळ्याच टप्प्यांवर एक नवा अर्थ घेऊन येते.. निर्गुण निराकार मैत्रीचं सगुण साकार स्वरूप लाभलेली ही दोन्ही पात्रं बालमनावर गारुड करतात ते कायमचंच! गोष्टीतला श्रीकृष्ण आणि सुदामाही मोठे होत जातात आपल्या वाढत्या वयासोबत; पण त्याच गोष्टीतल्या पोह्यांची चव मात्र कायम तशीच रेंगाळत राहते मनात. निर्भेळ, निर्मळ मैत्रीची ती अवर्णनीय चव खास लज्जत आणते माणसांच्या जगण्याला.. कितीतरी खारवलेले, कडुशार क्षण विसरले जातात ते या खास चवीमुळे.. मैत्रीचा सहज सुंदर आविष्कार साध्या सरळ जगण्याची जणू कलाकृतीच करून टाकतो.

शाळेत एका बाकावर बसून सगळ्यांच्या नकळत चिंच-बोरांची केलेली देवाणघेवाण मनात रेंगाळत राहते प्रत्येक आंबटगोड वळणावर..मधल्या सुटीत डब्यातल्या खाऊचा एकेक घास सगळ्यांना दिल्याशिवाय पोटच भरत नसतं.. तो तेव्हाचा तृप्तीचा क्षण असा घट्ट गोंदून ठेवलेला असतो मनात.. चढ-उतारांवरून पळणारी, तर कधी दमणारी पावलं विसावू पाहतात मायेच्या झाडाखाली तेव्हा हेच चिंच-बोरांचे उत्कट क्षण धावून येतात नि कवेत घेतात सगळ्या वंचनांसकट आपल्यातल्या तृषार्त मनाला..

मैत्रीचे ठसे कायमच उमटत जातात आयुष्याच्या वाटेवर.. रंग-रूप-भाषा-जात-धर्म-लिंग यापलीकडे पाहायला शिकवते ते हे एकमेव नातं. बाकी सगळी नाती डकवलेली तरी असतात किंवा जन्मजात आंदनात मिळालेली असतात. तिथे आपल्या आवडी-निवडीचा मुद्दा महत्त्वाचा नसतोच कधी; पण मैत्रीत मात्र स्वयं निर्णयाचा अधिकार खास राखीव असतो प्रत्येकाकडे. आपणच निवडायची असतात आपली मित्रमंडळी आपल्या आवडीप्रमाणे..एकदा का जोडलो गेलो आपण की, मग सुरू होतो नितांत सुंदर प्रवास भावभावनांचा..उत्कट आंतरप्रवाहांचा.. वाहत राहतो आपण आपल्या समविचारी प्रतिबिंबासोबत..

कधी कधी मतभिन्नता दाटून येते, पण काही काळच. धुकं विरतं नि पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ दिसायला लागतं.. एक वळण तर असं येतं की न बोलताच कळायला लागतं एकमेकांच्या मनातलं.. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभाग वाढत जातो. मनातलं सगळं एखाद्या कोऱ्या करतरीत कागदावर झरझर लिहिणं जेवढं सोप्पं असतं तितकंच सोप्पं वाटतं आपलं मन रितं करणं एकमेकांसमोर. कुठलाही आडपडदा न बाळगता रिते होत जातात डोळे.. मन.. भावना. समोरचाही टिपत राहतो सगळ्या भावनांना.. कोणत्याही स्वार्थाशिवाय हे असं टिपकागद होणं फक्त मैत्रीतच शक्य असतं.

आभाळात कितीही उंच भरारी घेतली तरी एका बाकावर बसून वाटून घेतलेली ती अवीट चवीची चिंचा-बोरं विसरताच येत नाहीत. आयुष्य वाहत राहातं..अचानक कधीतरी कुठेतरी कुणीतरी भेटतं..भावना..छंद किंवा विचारांची तार जुळल्या जाते..मैत्रीचं नवं नातं नव्याने जुळलं जातं; पण इथेही तीच चव परत रेंगाळत राहते. सुदाम्याचे पोहे आयुष्यभर शिदोरी बनून मनाची तहान-भूक भागवत राहतात. पात्रांची अदलाबदल होत राहते. कधी कृष्ण तरी कधी सुदाम्याचं पात्र आपल्याला आळीपाळीनं मिळतं; पण पोह्यांची पुरचुंडी तीच असते..चवही तीच असते.

ही सुदाम्याच्या पोह्यांची चवदार गोष्ट..मनाला सुशांत करीत जगण्याचं सखोलत्व अधिक रसपूर्ण करणारी ही गोष्ट कायमच लक्षात ठेवावी अशीच. जगण्याचा कस वाढवणारी. ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे..’ हे माऊलींनी मागितलेलं पसायदान आपणही कायम मागत राहावं असंच. जगण्याला सुवर्णझळाळी देणारं. आयुष्याचं सोनं करणारा मैत्रीचा हा परिस ज्याला लाभला तो भाग्यवान!
( jyotikadam07@rediffmail.com) 

Web Title: Maternal cousins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.