सर्वे संन्तु: निरामया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:39 PM2018-05-05T18:39:04+5:302018-05-05T18:43:27+5:30
स्वत:च आरोग्यदूत बनून, मरणाशिवाय पर्याय नसलेल्या गरीब असाध्य रोग्यांना तसेच विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा ते पुरवू लागले. आतापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळीस रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सरकारी योजनांचा वापर करून मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत.
- प्रिया धारुरकर
प्रत्येक व्यक्तीमध्ये जर सामाजिक उत्तरदायित्व निर्माण झालं तर समस्या दूर व्हायला खरं तर मदत होईल; पण आपल्याकडे याबाबत अजिबातच गांभीर्य नाही. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. हॉस्पिटल्सची संख्या बेसुमार वाढतेय. व्यावसायिक मनोवृत्तीच्या डॉक्टरांच्या चेन्स सर्वदूर दिसून येतात, अशा वातावरणात सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेच आहे; पण ग्रामीण,अशिक्षित, गरीब रुग्ण तर अगदीच हतबल होतोय. अशावेळीच नेमके माझे मिस्टर देवेंद्र गणवीर रुग्णांच्या मदतीसाठी गेल्या १२ वर्षांपासून धावून जात आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांचा दुवा बनत आहेत. श्रद्धेनी,सेवाभावाने कोणती गरज अपेक्षित आहे. त्या गरजेप्रमाणे कोणत्याही अपेक्षेशिवाय ते मदत करतात. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, देवेंद्रच्या आधाराने सुखावतात. याचा मला अभिमान वाटतो, असे नागपूरच्या पोलीस कॉन्स्टेबल असणाऱ्या सुप्रियाताई सांगत होत्या. पेशंटच्या चेहऱ्यावरचे समाधान ही आमची खूप मोठी मिळकत आहे, त्यांचा पयार्याने आम्हा कुटुंबियांचा आत्मिक आनंद आहे.
सुप्रिया पुढे म्हणाल्या, देवेंद्र यांचा स्वत:चा वैद्यकीय सेवेशी काही संबंध नसतानाही ते हे कार्य अविरत करत आहेत आणि माझी त्यांना पूर्णत: साथ आहे. आमचे दोघांचे विचार परस्पर पूरकच आहेत. तसं आमचं अॅरेंज मॅरेज पण आम्हा दोघांच्याही निर्णयाने त्यांनी हे सेवेचं व्रत घेतलंय. मी घर, मुली, कुटुंब आणि माझी नोकरी हे मन:पूर्वक सांभाळत त्यांना साथ देते. आरोग्यसेवेचे व्रत ते ज्या निष्ठेने करतात ते बघून आमच्या मुलींमध्येही सामाजिक जाणिवा विकसित होत आहेत.
देवेंद्र गोंदिया देवरी तालुक्याचे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी २००२ साली ते देवरीहून नागपूरला आले, तेव्हा त्यांना ग्रामीण राहणीमान, गावरान बोलीभाषा यामुळे नागपुरात अडचणी येत. ते बोलू लागले, की मुले त्यांना हसत. मात्र हळूहळू त्यांच्यात मित्र-मैत्रिणींमुळे सुधारणा होत गेली. त्यांना कॉलेज कॅम्पेनिंगच्या काळात नागपूरमधील ‘युवा संस्थे’त काम करण्याची संधी मिळाली. ती संस्था तरुणांमध्ये नेतृत्वगुण जोपासला जावा, आत्मविश्वास वाढावा, वादविवाद-चर्चासत्रांमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा, त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी मूल्याधारित जीवन जगण्याचे शिक्षण देण्यासाठी कार्यशाळा भरवते. यांनी त्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून तीन-चार वर्षे काम केले. तेथेच त्यांच्यात समाजसेवेची बिजे रोवली केली. देवेंद्र ‘धनवटे नॅशनल कॉलेज’मधून बी.ए. २००६ साली झाले. त्यांनी पदवीनंतर नोकरीचा विचार न करता सामाजिक कामात झोकून देण्याचे ठरवले.
वेगवेगळ्या संस्थेद्वारा समाजातील विविध समस्यांवर काम करीत असताना लोकांच्या स्वास्थ्याचा प्रश्न प्रकर्षाने त्यांना जाणवला. मग स्वत:च आरोग्यदूत बनून, मरणाशिवाय पर्याय नसलेल्या गरीब असाध्य रोग्यांना तसेच विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा ते पुरवू लागले. आतापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळीस रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सरकारी योजनांचा वापर करून मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत. ते ‘सत्य सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून आरोग्य शिबिरे भरवतात, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार उपलब्ध करतात. आतापर्यंत ज्या शस्त्रक्रिया त्यांनी गरिबांपर्यंत मोफत पोचवल्या त्यांची किंमत पाच कोटींच्या घरात जाईल. त्यांना या कामात डॉ. अविनाश सावजी यांचे मार्गदर्शन मिळाले हे सुप्रियाताई आवर्जून सांगतात.
देवेंद्रनी डॉक्टर उपलब्ध नाहीत, तेथे डॉक्टरांची टीम नेऊन आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली. त्या शिबिरांतून मूत्रपिंड व मूत्रमार्ग आजार, कॅन्सर, स्त्रीरोग, हृदयरोग, स्तन व गर्भाशय यांचे आजार, लकवा, लहान मुलांचे आजार, जठर व आतड्याची शस्त्रक्रियासारख्या आजारांच्या तपासण्या व आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातात. प्रत्येकाला निरामय,संतुलित आरोग्य प्राप्त व्हावं व यासाठी आपण प्रत्येकाने झटावे. हे त्यांचे म्हणणं आहे.
( priyadharurkar60@gmail.com )