चंद्र आहे साक्षीला...

By Admin | Published: October 8, 2014 05:30 AM2014-10-08T05:30:34+5:302014-10-08T05:30:34+5:30

गप्पांच्या फडात, मनोरंजक कार्यक्रमात केशरी दुधाचा आस्वाद घेत शहरवासीयांनी मंगळवारी कोजागरी पौर्णिमेचा आनंद लुटला

The moon is witnessing ... | चंद्र आहे साक्षीला...

चंद्र आहे साक्षीला...

googlenewsNext

पिंपरी : गप्पांच्या फडात, मनोरंजक कार्यक्रमात केशरी दुधाचा आस्वाद घेत शहरवासीयांनी मंगळवारी कोजागरी पौर्णिमेचा आनंद लुटला. दुपारनंतरच्या पावसामुळे हवेत निर्माण झालेला गारवा आणि ढगाळ वातावरणातही नागरिकांचा उत्साह कमी झाला नव्हता. ठिकठिकाणी कोजागरीची जोरदार तयारी करण्यात आली होती. विविध मंडळ, उद्यानात, घरोघरी कोजागरीचा उत्साह लुटण्यासाठी तयारी सुरू होती. मराठी व हिंदी गाण्याच्या तालावर तरूणाईने कोजागरीचा आनंद लुटला.
काही ठिकाणी नवरात्राला तर काही ठिकाणी कोजागरी पौर्णिमेदिवशी देवीचे विसर्जन केले जाते. काही मंडळांनी मंगळवारी नवरात्रामध्ये स्थापित केलेल्या देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले. देवीची मिरवणूक काढण्यात आली.
कोजागरीसाठी एसएमएसवर आमंत्रण पाठविले जात होते. निवडणुकीमुळे कोजागरी या वर्षी जोरात साजरी करण्याचे बेत आखण्यात आले. कोजागरीचा आनंद लुटण्यासाठी शेकोट्या पेटवण्यात आल्या. तेथे गरमागरम मसाला दुधाचा आस्वाद घेतला गेला. गाण्याच्या भेंड्या खेळविण्यात आल्या. युवा वर्गाने मोठ्या उत्साहाने कोजागरी साजरी केली. तरुणाईने गाण्याच्या भेंड्या, दांडिया व नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला. दुधाची विक्रमी उलाढाल शहरात दिसून आली. दुधाची मागणी ही संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढली. त्या प्रमाणात आवकही झाली होती. किरकोळ विक्रेते व दूध डेअरीमालक यांच्याकडे दोन दिवस आधीपासूनच बुकिंग सुरू होते. पिशवी मिळणाऱ्या दुधाऐवजी गवळ्यांकडून विक्री होणारे गाईचे व म्हशीचे दूध वापरण्याकडे सर्वांचा कल दिसून आला. एका डेअरीमध्ये १० ते १५ हजार लिटर दुधाची आवक झाली होती. किरकोळ विक्रेत्याबरोबरच मंडळानी व घरोघरीही दूध मोठ्या प्रमाणावर नेण्यात आले.
केशर, पिस्ता, वेलदोडे, बदाम, चारोळी, किसमिस, अंजीर, मणुके या वस्तूंना बाजारात मागणी दिसून आली. किराणा दुकानांचे दर वाढलेले होते. दुधाचे दरही संध्याकाळपर्यंत मागणी वाढत गेली तसे वाढत गेले. ४५ रुपयांपासून ते ७० रुपये लिटरपर्यंत दुधाची मागणी होती. शहरात दुधाची मागणी ही २ ते अडीच लाख लिटर दरम्यान होती. (प्रतिनिधी)

Web Title: The moon is witnessing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.