चंद्रसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:05 PM2018-02-10T19:05:09+5:302018-02-10T19:07:13+5:30
अनिवार : उदात्त विचारांनी प्रेरित होणं, त्या विचारात जगणं आणि ते विचार कृतीत आणून त्यावरून सातत्यानं वाटचाल करत राहणं तसं अवघड व्रत; पण निर्धार पक्का असेल तर अडचणींवर, संकटावर मात करणं सहज होत जातं आणि त्यातही आपला आयुष्याचा जोडीदारसुद्धा बरोबर असेल, तर या खडकाळ वाटादेखील मुक्त हसतात. अनाथ वंचितासाठी हक्काची सावली देणारे 'चंद्रसावली सामाजिक प्रकल्पाचे’ सुनील झोरे त्यांचा अनुभव सांगत होते. कृतार्थतेने त्यांचं बोलणं ऐकत ऐकत त्यांची पत्नी रंजना अगदी प्रामाणिक असं तिचंही मनोगत सांगू लागली.
- प्रिया धारूरकर
खरं तर ती एक चारचौघींसारखी सामान्य गृहिणी. सासू-सासरे, मुलं-बाळं, संसार यात रमलेली. फारशा महत्त्वाकांक्षा नसलेली. संसारातल्या अडीअडचणीेवर मात करत सुखानं जगणारी. सुरळीत सारे काही चालू होते. मात्र, सुनीलजी लोकजागरच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांशी जोडले गेले. बाबा आमटे, गाडगेबाबा या थोरांच्या विचारांनी त्यांच्यात आमूलाग्र बदल होत गेला आणि प्रकाशवाटा वाचताना तर त्यांचं ध्येयही निश्चित झालं. मग त्यांनी रंजनाच्या सामाजिक जाणिवा विकसित कशा होतील याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यासाठी तिलाच नाही तर आई-वडिलांसह अनेक सामाजिक प्रकल्पांना भेट दिली. कोण किती आणि कशा कशा प्रकारे आपलं आयुष्य वंचितांसाठी वेचतंय हे बघताना, अनुभवताना रंजनाही या वाटचालीत हळूहळू मार्गस्थ झाली.
त्यांच हे अनाथाश्रम चालवणं म्हणजे ‘लष्कराच्या भाकर्या भाजणं’ असं वाटणार्या अनेकांनी सुरुवातीला तिला या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला; पण तिची भूमिका ठाम होती आणि यात तिला ‘शांतीवन’चे दीपक व कावेरीताई नागरगोजे तसेच आरती पालवे, डॉ. खुरपे यांच्याकडून देखील ही जबाबदारी ती पेलू शकेल हा आत्मविश्वास मिळाला आणि मार्गदर्शन देखील मिळालं.
ती सांगत होती प्रकल्पभेटी घेताना अनेक सामाजिक प्रश्न समजले. आपण वावरत असलेला समाज आणि आपल्याच आसपास असणारा पण आपल्याला सहज न दिसणारा न जाणवणारा हा उपेक्षित, निराधार, अनाथ हाल अपेष्टा सोसणारा चिमुकल्यांचा प्रदेश पाहून मन सुन्न होतं. यांची एकवेळ पोटभर जेवणाचीच ददात तिथे यांच्या शिक्षणाचे काय? सुनीलजींच्या मनातली अशांतता तिच्यातही रुजत गेली. आपला मदतीचा हात या चिमुकल्यांचं आयुष्य सावरू शकतो या विश्वासानं आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ही ती सज्ज झाली. चंद्राची सावली जशी शीतल असते तशी शीतल सावली यांना मिळावी म्हणून प्रकल्पाचे नाव चंद्रसावली, असं तिने आवर्जून सांगितलं. आम्हाला अजून शासकीय अनुदान नाही, पदरमोड करूनच मुलांच्या निवार्हाची सुरुवात केली. हळूहळू मदतीचे हात येत गेले, येत आहेत. यांच्यासाठी झोळी पसरून काही मागताना अजिबात कमीपणा किंवा लाज वाटत नाही. ज्या किंवा जे कोणी स्वेच्छेने जेवढं देतील तेवढं स्वीकारायचं आणि ‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही’ म्हणत चालू लागायचं.
आज त्यांच्याकडे २२ मुले आहेत. हा प्रकल्प जालना जिल्ह्यात एरंडवडगाव, पो. सेवली येथे चालवला जातो. रंजनाचीच मुलं अजून लहान आहेत, त्यांची जबाबदारीही तिच्यावर आहे म्हणून जाणीवपूर्वक अजून मुलींचा प्रवेश आश्रमात घेतला नाही; पण आणखी काही दिवसांनी मात्र ग्रामीण भागातील गरजू, निराधार मुलींच्या शिक्षण व पालनपोषणासाठी स्वतंत्र सावित्रीसदन उभारण्यात येणार आहे.
तिला या सर्व कार्यात तिच्या सासू-सासर्यांची मदत तर आहेच; पण तिचे वडीलदेखील त्यांच्याबरोबर पूर्णवेळ या कार्यात आहेत. आश्रमातल्या मुलांना ते गोष्टी सांगतात, त्यांचं प्रबोधन करतात. त्यांना योगा शिकवतात. त्यांची एकूण सगळीच टीम नि:स्पृह भावनेनं राबत असते. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्यातही गणित हा विषय मुलांचा खूप आवडता आहे. इथे डिजिटल क्लासद्वारे ई लर्निंगच्या माध्यमातून मुलांच्या विशेष वर्गाचे आयोजनसुद्धा केले जाते. वागण्यात, बोलण्यात स्वयंशिस्त आहे. सणवारांना रंजनाताई स्वत:च्या हातचे गोडधोड करून खाऊ घालते. त्यांना तिच्या आणि एकूणच सगळ्यांच्या प्रेमामुळे, त्यांचे पोरकेपण कळूनपण येत नाही. कदाचित त्यामुळेच मुलांच्या वावरण्यात आत्मविश्वास जाणवत होता. रंजनाताई आणि सुनीलजी यांची उत्स्फूर्त आणि खूपच उत्साहपूर्ण अशा वातावरणातली ही भेट मलाच खूप ऊर्जा देऊन गेली. तेथून निघताना मी गुणगुणत होते तिथेच वाचलेली प्रार्थना...
‘मोडलेल्या माणसांची दु:ख ओली झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणती ना जात त्यांची कोणता ना धर्म ज्यांना, दु:ख भिजले, दोन अश्रू माणसाचे माणसांना’.
( priyadharurkar60@gmail.com )